Wednesday, April 28, 2010

जागतिक नकाशावर मराठीचं स्थान गौण ः वसंत आबाजी डहाके

संजय पाखोडे

आज जागतिक मराठी भाषा दिवस. आजच्या या जागतिकीकरणात मराठीचे स्थान काय, हा प्रश्‍न सर्वसामान्यांसह सर्वांनाच विचारावासा वाटतो. खरंच झपाट्यानं बदलत असलेल्या या जमान्यात जगाच्या पाठीवर मराठीचे स्थान आहे काय? या सर्व प्रश्‍नांची उत्तरे शोधण्याचा आम्ही प्रयत्न केलाय. महाराष्ट्रातील थोर विचारवंत आणि ज्येष्ठ समीक्षक वसंत आबाजी डहाके यांच्याशी आमचे प्रतिनिधी संजय पाखोडे यांनी मराठी भाषा या विषयावर केलेली ही खास बातचीत. वसंत आबाजी डहाके यांचे आतापर्यंत अनेक कविता संग्रह आणि समीक्षा ग्रंथ प्रकाशित झाले आहेत. त्यांच्या चित्रलिपी या काव्यसंग्रहाला नुकताच साहित्य अकादमीचा पुरस्कारही मिळाला आहे.
----प्रश्‍न ः आज जागतिक मराठी भाषा दिन आहे. अन्य भाषांच्या तुलनेत मराठी भाषेचं आज काय स्थान आहे?
वसंत आबाजी डहाके ः भारतीय भाषांमध्ये मराठी भाषेचं फार महत्त्वाचं स्थान आहे. इलेक्‍ट्रॉनिक माध्यमांच्या या युगात आज किती तरी मराठी वाहिन्या प्रसारित होत आहेत. मराठी चित्रपटांना चांगले दिवस आले आहेत. पूर्वी ज्या चित्रपटगृहांमध्ये फक्त हिंदी आणि इंग्रजी चित्रपट लागायचे, त्या ठिकाणी आता मराठी चित्रपट लागतात. कलात्मक आणि व्यावसायिकदृष्ट्या मराठी चित्रपट, मराठी मालिका यांना चांगले दिवस आले आहेत. थोडक्‍यात, मराठी भाषेचं महत्त्व आता पटायला लागलं आहे. ही भाषा महत्त्वाची आहे याची जाणीव लोकांना व्हायला लागली आहे. महाराष्ट्राविषयी विदेशी नागरिकांना कुतूहल निर्माण झालं आहे. गेल्या काही वर्षांत विदेशी संशोधक मराठीविषयी शोध घेण्याचा प्रयत्न करतोय. महाराष्ट्र आणि मराठी लोकसंस्कृती काय हे जाणून घेण्याची तळमळ विदेशी संशोधकांमध्ये आहे. त्यामुळे मराठी भाषेचं महत्त्व दिवसेंदिवस वाढतच आहे.
----प्रश्‍न ः मराठीविषयी सारखी चिंता असते, की काळाच्या ओघात ही भाषा नष्ट होईल काय? वाचनाचं प्रमाणसुद्धा कमी होत आहे.
वसंत आबाजी डहाके ः ही चिंता लोक उगाच करीत असतात. भाषिक वर्तमानपत्रांची संख्या जर आज बघितली, तर मराठी वर्तमानपत्रांचीच संख्या अधिक असल्याचं लक्षात येतं. महाराष्ट्रातील विविध वर्तमानपत्रांच्या जिल्हा आणि शहर आवृत्या बघितल्या, तर मराठीचा मोठा वाचकवर्ग आजही आहे. म्हणजे मराठी भाषा फक्त बोललीच जात नाही, तर मराठी भाषेचं वाचनाचं प्रमाणही सर्वाधिक आहे. आता मी सातारा, कोल्हापूर आणि गडहिंग्लज या भागात फिरलो. तेथील लोकांनी सांगितलं, की मराठी वाचनाची आवड आहे त्याहून अधिक वृद्धिंगत होत आहे. त्यांनी सांगितलं, की दोन दिवसांपूर्वी लागलेल्या एका पुस्तक प्रदर्शनातून दोन कोटी रुपयांच्या पुस्तकांची विक्री झाली. याचा अर्थ स्पष्ट आहे, की मराठी भाषेत प्रकाशित होणारं साहित्य वाचकांच्या पसंतीला उतरलं आहे आणि वाचकांच्या संख्येत वाढ झाली आहे. हा सर्व अनुभव बघितला, तर मराठी भाषा ही दुय्यम राहिलेली नाही. भारतीय भाषांमध्ये तिचं एक महत्त्वाचं स्थान निर्माण झालं आहे. दहा वर्षांपूर्वी विचारवंतांनी मराठी भाषेविषयी चिंता व्यक्त केली होती; ती परिस्थिती आता बदललेली आहे.
-----प्रश्‍न ः मराठी विषयातून पारंगत अभ्यासक्रम (एम.ए.) पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना भवितव्य नाही, असा विचार विद्यार्थ्यांमध्ये रुजत आहे.
वसंत आबाजी डहाके ः मराठी विषयातून एम. ए. करणाऱ्या विद्यार्थ्यांनी डोळ्यापुढे शिक्षक किंवा प्राध्यापक व्हायचंय हा विचार न ठेवता त्यांच्या शिक्षणाला व्यावसायिकतेची जोड द्यावी. वृत्तपत्रीय शिक्षणाची जोड देऊन मराठीतून प्रकाशित होणाऱ्या वृत्तपत्रांत साहित्यनिर्मिती अथवा जाहिरातीच्या माध्यमातून काही तरी नवं शिकावं, ज्याचा फायदा त्यांना निश्‍चितच मिळेल.
----प्रश्‍न ः आजच्या जागतिकीकरणाच्या युगात मराठी भाषेचं स्थान काय? इंग्रजीच्या तुलनेत मराठी भाषा स्पर्धेत टिकेल काय?
वसंत आबाजी डहाके ः इंग्रजी भाषेला आज जगात महत्त्वाचं स्थान आहे. ज्या देशांमध्ये इंग्रजी भाषा हद्दीबाहेर होती किंवा इंग्रजी भाषा बोलली जात नव्हती, अशा देशांमध्येसुद्धा इंग्रजी भाषेतूनच शिक्षण घेतलं जात आहे, ही वस्तुस्थिती आहे, कारण इंग्रजी भाषा ही आंतरराष्ट्रीय ज्ञान-विज्ञानाची आणि व्यापाराची भाषा झाली आहे. मराठीला इंग्रजीसारखं जागतिक पातळीवर न्यायचं असेल, तर मराठीचे स्थान आपल्याला जगाच्या पाठीवर निर्माण करावं लागेल. जगातल्या बहुतेक भाषांमधली साहित्यनिर्मिती आणि वाङ्‌मय इंग्रजी भाषेत उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे भारतीय भाषांमधील वाङ्‌मयाचंदेखील इंग्रजीत भाषांतर होऊन ते साहित्य इंग्रजीत उपलब्ध आहे; मात्र जागतिक आणि भारतीय भाषांमधील वाङ्‌मय मराठीत पाहिजे त्या प्रमाणात आलं नाही. त्याचप्रमाणे मराठी भाषेतील वाङ्‌मय आणि साहित्यनिर्मितीचं भाषांतर जागतिक आणि भारतीय भाषांमध्ये झालेलं नाही, त्यामुळे मराठी भाषा जागतिक स्तरावर पोहोचू शकत नाही. त्यामुळे आपल्या वाङ्‌मयातील श्रेष्ठत्व जागतिक स्तरावर कळू शकत नाही; मात्र मराठी भाषेतील साहित्यनिर्मितीचं जगातील सर्व भाषांमध्ये भाषांतर व्हायला पाहिजे. त्यामुळे जागतिक नकाशात मराठीचं स्थान गौण आहे ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही.
----प्रश्‍न ः मराठी भाषेवरून सध्या महाराष्ट्रात राजकीय वाद सुरू आहेत. मनसे किंवा शिवसेनेसारखे प्रादेशिक पक्ष आणि कॉंग्रेस, राष्ट्रवादी, समाजवादीसारखे राष्ट्रीय पक्ष मराठीच्या अस्मितेवरून राज्यात भांडतायत.
वसंत आबाजी डहाके ः जवळपास सर्वच राजकीय पक्षांनी मराठी भाषेला आपापल्या जाहीरनाम्यात महत्त्वाचं स्थान दिलं आहे. याचा अर्थ असा, की या सर्व राजकीय पक्षांना मराठीचं स्थान काय हे कळलं आहे. आतापर्यंत हा विषय अजेंड्यावर नव्हता; मात्र लोकांच्या दृष्टीनं हा विषय महत्त्वाचा झाला याची जाणीव सर्वच राजकीय पक्षांना झाली आहे. प्रत्यक्षात हे सर्व राजकीय पक्ष मराठी भाषेकरिता काय करणार हे काहीच स्पष्ट झालेलं नाही. याबद्दल त्यांची ठोस भूमिकाही जाहीर नाही, पण मराठी भाषा महत्त्वाची आहे, याची राजकीय पक्षांना जाणीव झाली हे निश्‍चित आहे. राजकीय लोकांनी भाषेकरिता काही करावं ही अपेक्षा चूकच आहे, कारण भाषेकरिता जे काही करायचं असतं ते अभ्यासकच करतात, परंतु राजकीय लोकांनीही मराठीकडे लक्ष देणं हे एक चांगलं लक्षण आहे.

No comments:

Post a Comment