Tuesday, April 27, 2010

मराठी विद्यापीठ श्री क्षेत्र रिद्धपुरासच होणे औचित्यपूर्ण

-प्रा. पुरुषोत्तम नागापुरे
नुकत्याच पुणे येथील अ. भा. मराठी साहित्य संमेलनात महाराष्ट्रात मराठी आंतरराष्ट्रीय विश्‍वविद्यालय स्थापन करण्यात यावे, असा ठराव पारित करण्यात आला. त्याचे सर्व मराठी भाषकांनी मनःपूर्वक स्वागत करावे, अशी ही घटना आहे. पुढे त्या ठरावात असे नमूद करण्यात आले की ते विद्यापीठ अंबेजोगाई येथे स्थापन करण्यात यावे. ठरावातील हा अर्धा भाग प्रादेशिक अभिनिवेशातून जोडण्यात आलेला आहे, हे उघड आहे. कारण आजवर मुकुंदराज आणि विवेकसिंधू यासंबंधी जेवढे संशोधन झालेले आहे त्यात बहुतेकांनी अंबेजोगाई हा पक्ष साधार नाकारलेला दिसून येतो. विवेकसिंधूचा लेखनकाळ ज्ञानेश्‍वरांच्या नंतरचा असून लेखन स्थल हे विदर्भातील आहे आणि मराठी भाषेतील अनेक ग्रंथ श्री क्षेत्र रिद्धपूर येथेच लिहिले गेलेले आहेत, असे अनेक संशोधकांनी साधार ठरविलेले आहे. त्यामुळे मराठी विद्यापीठाच्या स्थापनेचे कार्य श्री क्षेत्र रिद्धपूर येथेच व्हावे, हे रास्त ठरेल.विवेकसिंधूचे संशोधनविवेकसिंधूचे साक्षेपी संशोधक डॉ. कृ. पा. कुळकर्णी यांच्या शब्दात सांगावयाचे झाले, तर त्यांचा एक उताराच या पक्षाचे उत्तर देण्यास पुरेसा आहे. तो येथे देत आहे.ते म्हणतात, "मग अंबेजोगाई हा पक्ष उद्‌भवण्याचे कारण कोणते? तो पक्ष का उद्‌भवावा? श्री चक्रधरांच्या वेळी हा पक्ष उद्‌भवला नसला पाहिजे. कारण त्यांच्या तेथील वास्तव्याच्या उल्लेखात खोलनायकाचे अंबे असा या स्थळाचा निर्देश आहे. मुकुंदराजाचे किंवा जैतपाळाचे किंवा जोगाईचे अंबे असा उल्लेख नाही. ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. यावरून हे स्पष्ट आहे, की त्यांच्यावेळी मुकुंदराज, जोगाई, जैतपाळ या कोणाचाही संबंध अंबे या गावाशी नव्हता. तेव्हा हा अंबेजोगाई पक्ष श्री चक्रधरांच्या नंतर कृष्णदयार्णवाच्या म्हणजे शके 1596-1662 च्या अगोदर कधीतरी, तसेच दास विश्रामातील आख्यायिकेवरून रामदासांच्याही अगोदर उद्‌भवला असल्याचे दिसते.कृष्णदयार्णवाच्या आरतीत आणि आत्मारामाच्या दास विश्रामातील आख्यायिकेत हा पक्ष अभिप्रेत आहे; परंतु तेथे एक गोष्ट खटकते आणि ती ही, की या दोघांनीही अंबेजोगाईमधील मुकुंदराजाच्या समाधीचा उल्लेख केला नाही. इतके कशाला? दासोपंत हे तर खुद्द अंबेजोगाईचेच ना? परंतु त्यांच्या प्रचंड ग्रंथसंभारात मुकुंदराज किंवा जयपाल किंवा विवेकसिंधू याचा कशाचाही उल्लेख नाही. दोन्ही व्यक्‍ती काही सामान्य नव्हत्या. एक तर तेथील ब्रह्मदर्शी राजा आणि दुसरा तर प्रत्यक्ष ब्रह्मद्रष्टा. जर त्यांचा या अंबेजोगाईशी संबंध असता, तर ओघाने म्हणा, प्रामुख्याने म्हणा, वंदन-नमन रूपाने म्हणा किंवा स्थानिक अभिमानाने म्हणा, पूर्वसुरी म्हणून म्हणा त्यांचा कृतज्ञतापूर्वक निर्देश करताना दासोपंत राहिले नसते. असा ज्या अर्थी स्पष्ट निर्देशच नाही, त्या अर्थी मुकुंदराजाची अंबेजोगाईची सांगड त्यांच्यानंतर घातली गेली असावी, हे डॉ. कृ. पा. कुळकर्णी यांचे मत स्पष्ट, तितकेच वस्तुस्थितीचे निदर्शक आहे, हे उघड आहे.अंबेजोगाई हे ग्रामनामच अलिकडचेविवेकसिंधू हा ग्रंथ आजच्या अंबेजोगाई या गावात निर्माण झाल्याचे जे मानण्यात येते त्या गावाचे नाव शके 1220 पर्यंत तरी नामांतरित झालेले नव्हते. सर्वज्ञ श्री चक्रधरांची तेथील वास्तव्याची नोंददेखील खोलनायकाचे अंबे अशीच आहे. वर आपण पाहिलेच की विवेकसिंधूचे साक्षेपी संशोधक डॉ. कृ. पा. कुळकर्णी यासंबंधी लिहितात की, "जेव्हा जयत्पालास उपदेश करण्यास मुकुंदराज शके 1913 साली गेले तेव्हा जयत्पाल उपदेश स्थळ भोपाळ नगरी ठरते. अंबेजोगाई ठरत नाही.' हे अनेक पुराव्यांनी डॉ. कुळकर्णी यांनी स्पष्टपणे सिद्ध केलेले आहे व ते स्पष्ट आहे. कारण त्या काळी महाराष्ट्रात सिंघनाची सत्ता होती व सिंघनाचा सेनापती हा अंबेजोगाईचा खोलनायक किंवा खोलेश्‍वर हा होता, हा महाराष्ट्राचा इतिहास आहे. त्यामुळे अंबेजोगाई हे नामांतर खोलेश्‍वराच्या नंतरचे आहे हे उघड आहे.विवेकसिंधू हा ग्रंथ मराठीतील आद्यग्रंथ नव्हेच विवेकसिंधूच्या रचनाकाळासंबंधीही बराच संभ्रम आहे. विवेकसिंधूच्या काही प्रतींत रचनाकाळासंबंधी पुढील ओवी आढळते.शके अकराशे दाहोत्तर। साधारणनाम संवत्सर।।तै राजा शारंगधर। ग्रंथ उभार तैजाला।।1या ओवीच्या लेखनात अनेक पाठभेद आहेत.परंतु त्यात शके 1110 हा काल निर्देश एकाच प्रकारे नोंदविलेला दिसून येतो, हे खरे या ओवीला प्रमाण मानावयाचे तर विवेकसिंधू रचनाकार हे डॉ. रा. चिं. ढेरे आणि डॉ. य. खु. देशपांडे म्हणतात तसे, सर्वज्ञ श्री चक्रधरांचे म्हणजे हरिनाथाचे प्रशिष्य ठरणे शक्‍य नाही, अशी शंका डॉ. रा. चिं. ढेरे यांनी नोंदवून पुढे ते म्हणतात की, "या संबंधीचे अन्य दुवे इतके दृढ आहेत, की अगदी अत्यल्प प्रतींतच आढळणाऱ्या या कालनिदर्शक संदिग्ध नोंदीची प्रतिष्ठा त्यामुळे मुळीच टिकत नाही. या ओवीच्या आढळासंबंधी डॉ. कृ. पा. कुळकर्णी यांनी विवेकसिंधूच्या विचिकित्सक आवृत्तीच्या प्रस्तावनेत असे म्हटलेले आहे की, कालाचा निर्देश करणारी ओवी काही पोथ्यात आढळते, तर काहीत (बऱ्याच पोथ्यात) ती आढळत नाही. आम्ही पाहिलेल्या (म्हणजे कृ. पा. कुळकर्णी यांनी पाहिलेल्या) 92 पोथ्यांपैकी फक्त दोनच पोथ्यांत आम्हास ही नोंद आढळली. या प्रतीत ते प्रकरण 18 च्या शेवटी व समासात व डाव्या बाजूस लिहिले आहे व दुसरी सारंगधर राजाच्या संबंधीची ओवी पानाच्या उजव्या समासात लिहिली आहे. या दोन्ही ओव्या लेखकाने मागाहून रुजवात घेताना किंवा दुसऱ्या एखाद्या पोथीत आढळल्यावरून शोध म्हणून लिहिल्या असाव्यात. दुसऱ्या प्रतीत मात्र या दोन ओव्यांमुळे संहितेतच क्रमाने आलेल्या आहेत. महाराष्ट्र सारस्वतकार श्री. भावे यांना या ओवीच्या एका पोथीत व नागपूरचे प्रो. डोळके यांना तीसपैकी पाच पोथ्यांत आढळल्या. श्री. गोगटे यांना तर या ओव्या कोणत्याही पोथीत आढळल्या नाहीत. ज्या अर्थी या ओव्या काही अत्यंत थोड्या प्रतीतच आढळतात, त्याअर्थी या ओव्या मागाहून मूळ पोथीत अंतर्भूत केलेल्या असाव्यात. याची रचना मूळ मुकुंदराजकृत नसून कोण्यातरी शिष्याची असावी.या दोन ज्येष्ठ संशोधकांनी ही मते नोंदविलेली आहेत. या चर्चेचा समारोप करताना पुण्याचे डॉ. रा. चिं. ढेरे म्हणतात, "प्रा. कुळकर्णींनी या ओवीच्या आढळासंबंधी केलेली चर्चा पाहता, ही कालनिर्देशक ओवी विचारात घेण्याची आवश्‍यकताच नाही, हे स्पष्ट दिसते. तसेच विवेकसिंधूच्या भाषेचा विचार करता, त्या दृष्टीनेही विवेकसिंधुकार मुकुंदराज हे ज्ञानेश्‍वर पूर्वकालीन ठरणे अशक्‍यच आहे. विवेकसिंधुकाराची भाषा ज्ञानेश्‍वरी किंवा महानुभावी प्राचीन वाङ्‌मयाच्या भाषेइतकी प्राचीन नाही. मध्ययुगीन एकनाथ कालीन मराठी भाषेसारखी ती दिसते, हे खरे आहे. हा स्पष्ट अभिप्राय नोंदविणाऱ्या डॉ. कृ. पा. कुळकर्णी यांनी स्पष्टपणे विवेकसिंधूची उत्तरकालीन निर्मिती स्पष्टपणे नोंदविलेली आहे.डॉ. रा. चिं. ढेरे पुढे म्हणतात, "या ओवीत निर्दिष्ट असलेल्या काळाचा तपशीलही सुसंगत नाही. त्यातील शक संवत्सराचा मेळ बसत नाही. म्हणजे अल्पप्रचलित्व, अंतर्गत विसंगती आणि विवेकसिंधूच्या भाषिक स्वरूपाचा पार्श्‍वभूमीवरील कृत्रिमत्व अशा दोषांनी स्वतःच बाधाग्रस्त झालेली ही ओवी श्री चक्रधर-हरिनाथ-एकत्वाच्या संदर्भात मुळीच बाधक ठरू शकत नाही. तिला अकारण प्रतिष्ठा देऊन शक-संवत्सराचा मेळ बसविण्यासाठी सारे भारतीय जोतिर्विज्ञान वेठीस धरण्याची मुळीच आवश्‍यकता नाही. सत्याचे एकदा अनावरण झाले की ते साऱ्या भ्रांती कोशांना फोडून आवेगाने बाहेर पडते. त्याला मग कोणीही रोखू शकणार नाही. आपण केवळ निर्मळ मनाने त्याला सामोरे जावे, यातच आपल्या बुद्धीचे खरे सार्थक आहे,' असे स्पष्ट मत डॉ. ढेरे यांनी चक्रपाणी ग्रंथात लिहिलेले आहे.या प्रकारचे साक्षेपी संशोधन करणाऱ्या या पुण्याच्या दोन दिग्गज संशोधकांच्या स्पष्ट, निर्भिड, तितक्‍याच निर्मळ मताशी सहमत होण्यास महाराष्ट्रातील कुणीही साक्षेपी तितकाच सत्यान्वेशी संशोधक तयार होईल, अशी खात्री आहे.तरीही काही प्रादेशिक अभिनिवेशाने पीडित तथाकथित साहित्यिक खोलनायकाचा अंबे या गावाचे नामांतर जोगाईचे अंबे करण्याचा प्रयत्न करतीलही. त्यांचा अट्टहास हा प्रादेशिक मताने दूषित झालेला असेल; परंतु महाराष्ट्रातील तटस्थ, विचार करणाऱ्या संशोधक, साहित्यिक, राजकीय क्षेत्रातील निराग्रही पुरुषांना डॉ. कृ. पा. कुळकर्णी, डॉ. रा. चिं. ढेरे तसेच विदर्भातील डॉ. सुरेश डोळके आणि डॉ. मु. रा. जोशी यांच्या मताचा आदर ठेवून विवेकसिंधूचे जन्मस्थान विदर्भातील धर्मक्षेत्र आहे, हे मान्यच करावे लागेल. मग ते खेडले, भोपाळ, राजुरे, रोहिणखेडे, आमजय किंवा अंभोरे असो की अन्य कोणते वैदर्भिय धर्मक्षेत्र असो.डॉ. य. खु. देशपांडे यांनी आमजय हेच विवेकसिंधूचे जन्मस्थान मानले व त्यासच डॉ. रा. चिं. ढेरे यांनी मान्यता दिली. तशीच या ग्रंथाची भाषा ही ज्ञानेश्‍वरोत्तर काळातील असल्याचे डॉ. ढेरे यांचे मत डॉ. कृ. पा. कुळकर्णी यांनी प्रस्थापित केले. ही वस्तुस्थिती मराठी विद्यीाठ स्थापन करताना विचारात घ्यायलाच पाहिजे. एवढीच एक अपेक्षा ठेवून आम्ही मराठीच्या सर्व प्रकारच्या वाङ्‌मय प्रकाराची जेथे जाणीवपूर्वक निर्मिती करण्याचे कार्य केले गेले त्या श्री क्षेत्र रिद्धपूर येथेच मराठी विद्यापीठाच्या स्थापनेचे कार्य व्हावे, ही रास्त अपेक्षा करतो.मराठी सारस्वतांची जन्मभूमीमराठी वाङ्‌मयाचा इतिहास पाहता, असे स्पष्टपणे दिसून येते की, महानुभाव पंथीय थोर सारस्वतांनी संस्कृतातील सर्व उपलब्ध वाङ्‌मय प्रकार मराठीत आणण्याची जिद्द ठेवली होती. त्यामुळेच त्यांनी तत्त्वज्ञानाला मराठी भाषेत स्वतंत्र परिभाषा निर्माण केली, हा सन्मान भारतातील इतर कोणत्याही प्रादेशिक भाषेला अजूनही उपलब्ध झालेला नाही. भारतीय तत्त्वज्ञान आणि दार्शनिक विचार हे केवळ संस्कृतच्या कडीकलुपात अडकून पडले होते. ती बंदिस्ती मराठी भाषिक साहित्य विशारदांनी श्री चक्रधरस्वामींच्या कृपेने तोडली आणि त्यामुळे प्रचंड तितकीच समृद्ध तात्त्विक आणि दार्शनिक चिंतनाची वाङ्‌मय सरिता मराठीत उपलब्ध झालेली दिसून येते. यात तत्त्वज्ञानाची सुलभ मांडणी सार्थ करून स्वतंत्र भाष्य आणि महाभाष्य ग्रंथांचा अंतर्भाव होतो.एका इंग्रजी गृहस्थांनी मराठी इंग्रजी भाषेचा पहिला शब्दकोष निर्माण करण्याची शेखी मिरविण्यासाठी म्हटले होते की मराठी भाषा शेतकरी- कामकरी लोकांची बोलीभाषा आहे. त्यामुळे त्यात साहित्यनिर्मिती होऊ शकलेली नाही. म्हणून मी हा शब्दकोष तयार केला आहे. अशी आढ्यतादर्शक नोंद करण्याची संधी त्यांना मिळाली नसती, तर त्यास महानुभावीय शब्दकोषाचे दर्शन घडले असते. श्री चक्रधरांचे सूत्र पाठावर स्थळ वाङमय निर्माण केले गेले. ते तर शब्दांचे अर्थ सांगणारे शब्दकोषच होते. त्यानंतर सात प्रमुख काव्य ग्रंथावर प्रचंड मोठे टिपग्रंथ तयार करण्यात आलेले आहेत. हरिराज पुसदेकर आणि दत्तराज मराठे यांचे टिपग्रंथ हे मराठी भाषेतील विस्तृत शब्दकोशच आहेत. त्याशिवाय ते शब्दोत्तरी कोशही आहेत.मराठी भाषेला व्याकरण देण्याचे कार्यही महानुभवांनी केले आहे. इ.स. 1925 मध्ये मुंबई विद्यापीठात मराठी व्याकरण तयार करणारी समिती बसलेली होती. ही मराठी भाषेच्या इतिहासातील नोंद लक्षात घेतली, तर महानुभावीय साहित्य विशारदांच्या कर्तृत्वाचे मोल लक्षात येते.मराठी भाषेत काव्यालंकार शास्त्रही प्रचंड प्रमाणात निर्माण करण्यातही महानुभावीय साहित्य शारदेचे पुजारी मागे राहिले नाहीत. त्या साहित्य विशारदांनी न केवळ कथा, काव्य आणि गद्य पद्य निर्माण केलेले असून त्यांनी मराठी भाषेला विविधांगांनी सजविलेले आहे.सयमक आणि निर्यमक काव्य रचनाही त्यांनी केल्या होत्या. पंडित हयग्रीवाचार्याचा गद्यराज गद्य काव्याच्या इतिहासात सर्वप्रथम नोंदवावा लागतो.इतक्‍या विविधांगी साहित्य रचनेचे महान कार्य करणाऱ्या या साहित्य विशारदांनी आजपर्यंत सहा हजार स्वतंत्र ग्रंथांची रचना गेल्या सातशे वर्षांत केली आहे. त्या रचनेचे समृद्ध साहित्य भांडार हस्तलिखिताच्या स्वरूपात आजही रिद्धपुरात उपलब्ध आहे. अशी स्वतंत्र साहित्य संस्कृती निर्माण करून ठेवणाऱ्या महानुभावीय साहित्याच्या राशी आजही जेथे उपलब्ध आहेत, त्या श्रीक्षेत्र रिद्धपूर येथेच मराठी भाषेचे पहिले विद्यापीठ स्थापन व्हावे ही अपेक्षा मराठी जनांनी, साहित्यिकांनी आणि जाणत्या राज्यकर्त्यांनी पूर्ण करावी, ही अपेक्षा व विनंती करून थांबतो.

No comments:

Post a Comment