Wednesday, April 28, 2010

महाविद्यालयातील मराठी

ऋतुजा सावंत
आजची पिढी ऐकणारी आहे, पाहणारी आहे, पण वाचणारी नाही. त्यामुळे आधीच इंग्रजी माध्यमातील शिक्षण आणि पाश्‍चात्त्य संस्कृतीचा प्रभाव यामुळे मराठी भाषेची सरमिसळ ही ओघाने होतेच. हिंदी आणि इंग्रजी मिश्रित मराठी महाविद्यालयीन विश्‍वात बोलले जाते. स्वच्छ आणि अस्खलित बोलणारा येथे अपवादानेच आढळतो. पण मराठमोळे सणही येथे तेवढ्याच उत्साहात साजरे केले जातात. म्हणजेच मराठी भाषेपेक्षा महाराष्ट्रीय संस्कृतीची आवड मुंबईतील महाविद्यालयांत दिसून येते.
---
सध्या होत असलेल्या मराठीच्या आंदोलनांमुळे मराठीची जागरूकता वाढली आहे. मोबाईलच्या स्क्रिनसेव्हरवर एखादी मराठी कविता ठेवण्यापासून प्रेमकवितांचे सुलेखन केलेले टी-शर्ट वापरण्याची फॅशन हे त्याचेच प्रतीक. तरुणांचे हे मराठी प्रेम यंदाच्या महोत्सवांदरम्यानही दिसून आले. साठ्ये, रुपारेल यांसारख्या महाविद्यालयांत महाराष्ट्राची संस्कृती जोपासण्याचा प्रयत्न केला होता. एल्फिन्स्टन महाविद्यालयाच्या आजी-माजी विद्यार्थ्यांच्या "पर्णिता' संस्थेतर्फेही महाराष्ट्र उत्सव रवींद्र नाट्य मंदिरात रंगला. तब्बल 86 महाविद्यालयांनी यामध्ये सहभाग घेतला होता. या साऱ्यामागे राजकीय प्रभाव मोठ्या प्रमाणावर जाणवतो. मराठीची आवड अनेकांना असली तरी आत्मियता असणारे थोडकेच आढळतात. भाषेसाठी महाविद्यालयातील मराठी वाङ्‌मय मंडळे प्रयत्नशील असतात. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा आणि मराठीचा त्यांना खऱ्या अर्थाने अभिमान वाटावा याकरिता विविध उपक्रम राबविले जातात. वक्तृत्व, प्रश्‍नमंजुषा, काव्यवाचन स्पर्धा अशा पारंपरिक स्पर्धांबरोबरच बदलत्या काळानुसार अनेक अभिनव कार्यक्रमही होतात. पण एकूणच आजूबाजूचा परिसर आणि शिकण्याचे, ऐकण्याचे साधन बहुतांशी अमराठी असल्याने मराठीच भाषा बोलण्याचा आग्रह अजूनही महाविद्यालयात होताना दिसत नाही. वाचन संस्कृतीही तितकीशी खोलवर रुजलेली नाही. अभ्यासाला नेमलेली पुस्तके आणि संदर्भाची पुस्तके सोडून अवांतर वाचणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी झाली आहे. संगणकाची स्क्रिन एका क्‍लिकसरशी माहितीचे विश्‍व साकारते. म्हणून वाचनालयात बसून तासनतास विविध पुस्तके संदर्भासाठी चाळण्यासही विद्यार्थी तयार नसतात. त्यामुळे चांगली भाषा कानावरही पडत नाही आणि वाचनातही येत नाही. म्हणूनच भाषेची सरमिसळ क्रमप्राप्त आहे. वाङ्‌मय मंडळाला मात्र महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळतो. केवळ मराठी विषय घेतलेलेच नव्हे तर इतर विषयांचे विद्यार्थीही या मंडळाशी संलग्न असतात. इंग्रजी वातावरणात स्वत:ला व्यक्त करण्याचे व्यासपीठ म्हणजे मराठी वाङ्‌मय मंडळ, अशी विद्यार्थ्यांची मानसिकता आहे. रुईया महाविद्यालयात चिपळूणकर व्याख्यानमाला, न. र. फाटक स्मृती व्याख्यानमाला, श्री. पु. भागवत व्याख्यानमाला अशा कार्यक्रमांची माहिती केवळ माहिती फलकावर वाचून विद्यार्थी कार्यक्रमांना गर्दी करतात. विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लागावी आणि वाचकदृष्टी अधिक व्यापक व्हावी याकरिता डी. जी. रुपारेल महाविद्यालयात पुस्तक परीक्षण मंडळ स्थापन करण्यात आले आहे. अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत विद्यार्थी एखाद्या पुस्तकाचे परीक्षण करतात. त्यावर चर्चा होते. तसेच मराठीची आधुनिक तंत्रज्ञानाशी सांगड घालून करिअरविषयक मार्गदर्शन करणाऱ्या अनेक कार्यशाळा येथे घेतल्या जातात. मराठी विषय घेऊन करिअरचे अनेक मार्ग त्यातून सुचविले जातात. या महाविद्यालयात साहित्याचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी भाषेचे खेळ घेतले जातात. मात्र हे प्रयोग केवळ विषय घेतलेल्या 40 ते 50 विद्यार्थ्यांपुरताच मर्यादित राहतात. खरंतर असे प्रयोग प्रथम वर्षापासून घेणे गरजेचे आहे. मात्र वेळेच्या मर्यादेमुळे ते शक्‍य होत नाही, अशी खंत काही मराठी प्राध्यापकांनी व्यक्त केली. के. जे. सोमेय्या महाविद्यालयात तर मराठी भाषा आणि वाङ्‌मय मंडळ आहे. भाषेशी संबंधित विविध उपक्रम येथे राबविले जातात. अनंत भावे, मंगेश पाडगावकर अशा दिग्गज साहित्यिकांनी मंडळाची धुरा आपल्या खांद्यावर घेतली होती. अनेक नवनवे प्रयोग या महाविद्यालयात केले जातात. उद्‌घाटन कार्यक्रमाला एखादी साहित्यविषयक संकल्पना घेऊन कार्यक्रम सादर करतात. विद्यार्थ्यांनी मराठीचा खराखुरा अभिमान बाळगावा यासाठी त्यांना मराठीच्या विविध विषयांवर माहिती गोळा करण्यास सांगितली जाते. या माहितीचे संपादन करून वर्षातून तीन वेळा "आशय' नावाचे हस्तलिखितही काढले जाते. हे हस्तलिखित संदर्भासाठी वाचनालयात असते. तसेच वर्षभरात 12 महाविद्यालयीन आणि 3 आंतरमहाविद्यालयीन स्पर्धा घेतल्या जातात. काळाच्या काहीशी मागे गेलेली कथाकथन स्पर्धाही होते. या उपक्रमांना विद्यार्थ्यांचा प्रतिसाद मिळत असला तरी ते उपक्रम खोलवर रुजताना दिसत नाहीत. त्याची कारणेही समर्पक आहेत. सरमिसळ मराठी भाषा उद्देशपूर्वक बोलली जात नाही. शिकण्याचे माध्यम इंग्रजी असल्याने ते शब्द आपल्या नकळत लक्षात राहतात आणि ओठांवर येतात. यात मराठीची मोडतोड करण्याचा अजिबात उद्देश नसतो. असे बोलण्यात गैर काहीच नाही, पण आपण बोलणाऱ्या इंग्रजी शब्दांचे मराठी शब्द माहीत असणे आवश्‍यक आहे, या मताचा एक तरुण वर्ग महाविद्यालयात आहे; तर अगदी शुद्ध आवर्जून मराठी बोलायला जमणारंच नाही. ते आजच्या जगात शक्‍यही नाही. तसं बोललं तर इतर जण टिंगलटवाळीही करतात. बदलत्या जगानुसार आपण पोशाखापासून राहणीमानापर्यंत सगळ्या गोष्टी बदलल्या, मग या साऱ्यात भाषेत बदल होणं स्वाभाविकच आहे, असे काही तरुणांचे म्हणणे आहे. महाविद्यालयीन तरुणांची मराठी भाषा बिघडण्यामागे आजूबाजूचे अमराठी वातावरण असले तरी मराठी अभ्यासक्रमातही बदल होणे गरजेचे आहे, असे काही प्राध्यापकांचे मत आहे. वर्षांनुवर्षे मराठीच्या अभ्यासक्रमाचे एकच स्वरूप आहे. कालानुरूप त्यात बदल केला तर विद्यार्थ्यांची मराठी भाषा सुधारण्यास नक्कीच मदत होईल. भाषिक कौशल्य वाढीस लागण्यासाठी अनुरूप अभ्यासक्रम तसेच बातमी, कार्यक्रमांचे स्क्रीप्ट लिहिण्याचे तंत्र अभ्यासक्रमात समाविष्ट करावे, अशी मागणी काही प्राध्यापकांनी विद्यापीठाकडे केली होती. मात्र त्यावर अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही. अभ्यासात या गोष्टी आल्या की विद्यार्थी त्या आपोआपच आत्मसात करतात, असे प्राध्यापकांनी सांगितले. उद्याचा नागरिक म्हणून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकडे पाहिले जाते. तो महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारा आहे. त्यामुळे त्याने महाराष्ट्राची मायबोली उत्तम आणि अस्खलित बोलणे गरजेचे आहे. त्यासाठी सर्वच स्तरांतून जोरादार प्रयत्न करायला हवेत. हा लढा सोपा नसला तरी अशक्‍य नाही. कारण मराठीची आवड या तरुणाईत आहे. आवडीचे रूपांतर आत्मियतेत करायचे आहे. मराठी भाषेसाठी विविध उपक्रम काही मूठभर विद्यार्थ्यांपुरता मर्यादित न राहता ते व्यापक प्रमाणावर राबविले पाहिजेत. विद्यापीठापासून प्रसारमाध्यमांपर्यंत साऱ्यांचाच सहभाग त्यासाठी महत्त्वाचा आहे.

No comments:

Post a Comment