Thursday, April 29, 2010

कविराजांना दिसलेला महाराष्ट्र

- डॉ. सुधीर मनोहर मोंडकर

"महाराष्ट्र' हे नाव उच्चारताच, आमच्या मराठी भाषिक राज्याचा ऐतिहासिक, भौगोलिक नि सांस्कृतिक बाज नजरेसमोर उभा राहतो. पण हाच महाराष्ट्र येथील कविरायांना कसा दिसला? असा त्रिमिती बाज त्यांनी आपल्या काव्यातून रंगवलाय का? की काही वेगळ्या छटा त्यांनी दाखवल्या आहेत?श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांच्या "महाराष्ट्र गीतात' येथील संपन्न भूमीचे दर्शन घडते. गगनभेदी पर्वत, विस्तृत जलायशय, भव्य प्रसाद, संपन्न शेती, चारित्र्यवान माणसांनी वसलेली घरे यांनी महाराष्ट्र बनलाय. विक्रम नि वैराग्य हे याच ठिकाणी नांदतात. जरीपटक्‍याच्या जोडीला भगवा डोलतोय. शक्ती-युक्ती, धर्म-राजकारण यांची विधायक युती झाल्याने महाराष्ट्राची कीर्ति त्रिखंडात पसरलीय. सदर महाराष्ट्र गीताच्या अपूर्व गेयतेमुळे मराठी रंगभूमीवर नांदीचे भाग्य या गीताला लाभले नि ज्याच्या-त्याच्या तोंडी ते घोळू लागले -

बहु असोत सुंदर संपन्न की महा।
प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा।।


कोल्हटकरांचेच पट्टशिष्य राम गणेश गडकरी ऊर्फ गोविंदाग्रज हे आपल्या काव्यात महाराष्ट्र रंगवताना म्हणतात, हा देश दगडासारखा कणखर, फुलासारखा कोमल, करवंदीसारखा काटेरी आणि बकुळप्राजक्तांनी फुललेला आहे. बुद्धी व भक्ती यांच्या युतीने तो फुलला आहे. गोदा, कृष्णा, भीमेच्या जलाने महाराष्ट्राच्या पाषाणदेहाला स्नान घातले आहे. डोंगरदऱ्यात वसलेले शिवशाहीचे गडकोट त्याच्या पराक्रमाची साक्ष देत आहेत, तर संतशाहीर त्याचे गुणगान आपल्या कवनाद्वारे करत आहेत. या काव्याचा प्रभाव एवढा की, 83 व्या मराठी संमेलनात अमिताभ बच्चनसारख्या अमराठी कलाकाराला ह्या गीताच्या पंक्ती सादर कराव्याशा वाटल्या -

मंगलदेशा। पवित्र देशा। महाराष्ट्र देशा
प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा।।


"महाराष्ट्र लक्ष्मी' ही विनायकांची कविता. भक्तिभावाने महाराष्ट्राचे गुणगान करताना ते म्हणतात -

महाराष्ट्र लक्ष्मी माते जगी धन्य वाटे।
यशोगीत तिचे गाता मनी हर्ष दाटे।।


असा हा महाराष्ट्र परचक्राने ग्रासलेला, पारतंत्र्यात खितपत पडलेला, दुष्काळाने गांजलेला असला तरी संकटातही ताठ कण्याने मान उंच करून पाहतोय. आपल्या जीवनात महाराष्ट्राने जे दिव्य सोसलेय, त्यामुळे त्याचे भवितव्य उज्ज्वल असणार आहे.महाराष्ट्रात परस्परविरोधी भूभाग पाहावयास मिळतात. कोकणभूमी ही आंबा, सुपारी, साग, नारळ यांनी लगडली आहे, तर घाटावरचा भाग कळकीचे बेट, करवंदी-बाभळ-बोरी यांसारख्या वृक्षराईंनी बहरलेला आहे. अशा भूमीचे स्तवन करताना एक शाहीर म्हणतो -

हिरवे हिरवे सारे रान
कुठे नागवेली पान
कसा पिकला गं गहू हरभरा!
हा शाळू मक्‍याचा तुरा
महाराष्ट्र देश सुंदरा!


डॉ. सुधीर फडके विरचित व शाहीर अमर शेखांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या सभांमध्ये आपल्या पहाडी आवाजात पुढील गीत सादर केले-

जनतेच्या सत्तेची ज्योत जागती।
गर्जा संयुक्त महाराष्ट्र भारती।।


मराठी माणूस मग तो कोकणी, घाटावरचा, नागपूर-विदर्भाचा असो सारे महाराष्ट्रासाठी एक होतात. शेतकरी, कामगार हे सारे जाती-धर्माची बंधने तोडून अन्यायाविरुद्ध लढतात. हे केवळ महाराष्ट्रासाठीच नव्हे, तर देशासाठीदेखील! या "अमर' गीताने साऱ्या महाराष्ट्राला जाग आणली नि संयुक्त महाराष्ट्र मिळवण्यास उद्युक्त केले.जानेवारी 1956! संयुक्त महाराष्ट्र चळवळीची ऐन रणधुमाळी. समितीच्या नेत्यांची धरपकड सुरू झाली. आचार्य अत्रे प्रथम मुंबईच्या आर्थर रोड तुरुंगातत व नंतर ठाण्याच्या तुरुंगात. त्यांच्या डोक्‍यात त्या वेळी फक्त "संयुक्त महाराष्ट्र' भरला असल्याने दुसरे काही लिहू म्हटले तरी त्यांना लिहिता येईना. गडकऱ्यांच्या या पट्टशिष्याला "महाराष्ट्र गीताचे' अनुष्टुभ सुचले. चार महिन्यानंतर 5 एप्रिल 1956 ला ते तुरुंगातून सुटले, ते संयुक्त महाराष्ट्राचा लढा यशस्वी करू अशा आत्मविश्‍वासपूर्ण निर्धाराने! "नवयुग'च्या कचेरीत आल्यावर पुढील महाराष्ट्र गीताने उभ्या महाराष्ट्राला वंदन करून आपल्या वृत्तपत्रीय कामकाजाचा त्यांनी श्रीगणेशा केला-

महाराष्ट्र तुझ्या पायी असो साष्टांग वंदन।
तुझ्यासाठी झिजो माझ्या देहाचे चंदन।।


या गीतात महाराष्ट्र म्हणजे संतांचे माहेर नि वीरांची कर्मभूमी. त्याला निर्मून सारी पृथ्वी धन्य झालीय. या भूमीतील काटेकुटे हे फुलांच्या बिछान्यागत, तर कणीकोंडा हा गोड मांड्यासारखा अत्र्यांना वाटतो. अत्र्यांची ही उत्कट महाराष्ट्रभक्ती म्हणजे न्यारी देशभक्तीच होती, असे तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांचे मत होते.संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे भीष्माचार्य सेनापती बापट यांनी महाराष्ट्र नि भारत यांच्यातील अतूट संबंधाचे वर्णन करताना म्हटलेय -

महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले।
मराठ्याविना राष्ट्र गाडा न चाले।
खरा वीर वैरी पराधीनतेचा।
महाराष्ट्र आधार या भारताचा।।


महाराष्ट्राने पारतंत्र्यास आपला खरा वैरी मानले. त्यामुळे देशमुक्तीसाठी टिळक, सावरकर, आंबेडकर यांनी आपल्यापरिने प्रयत्न केले. 1962 मध्ये चिनी आक्रमणानंतर तत्कालिन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण संरक्षणमंत्री म्हणून दिल्लीला गेले आणि संकटग्रस्त भारताला आधार दिला. "भारते जन्म दुर्लभम्‌। महाराष्ट्रे तु अतिदुर्लभ्‌।।' अशा महाराष्ट्रात आपण जन्मलो, म्हणजे किती भाग्यवान!

मराठी अभिमानाचे शिवधनुष्य - 1

"माझ्या मऱ्हाटीची बोलू कौतुके, अमृतातही पैजा जिंके" असं वर्णन करणारी मायमराठी आज कोणत्या स्थितीत आहे? एक मातृभाषा म्हणून ती कितीजणांच्या मौखिक सामर्थ्याचा स्वाभिमान ठरून कितीजण तिला अभिमामानं मिरवतात? कुणी तिला डाऊनमार्केट म्हटल्यानं काही "मराठी" टाळक्‍यांचं डोकं सणकलं नि साकारू लागलं मराठी अभिमानगीताचं स्वप्न... नवे सूर लेऊन नि नवा स्वरसाज चढवून हे गीत आपल्या भेटीस येत आहे 27 फेब्रुवारी या मराठी भाषा दिनी ! त्याचं काऊंट डाऊन सुरू झालेय आतापासून.... या गीताचे एक स्वर शिलेदार संगीतकार-गायक कौशल इनामदार यांच्याशी या मराठी अभिमानगीताविषयी साधलेला हा संवाद.
मुलाखत- राधिका कुंटे
--------------------
अभिमानगीताचा जन्म व्हायला नेमकी कोणती घटना कारणीभूत ठरली? कारण एवढं मोठं शिवधनुष्य पेलायला फक्त तात्कालिक कारण पुरेसं होतं, असं वाटत नाही. मराठी भाषेविषयी तुमच्या जाणिवेत-नेणिवेत काही ना काही घडामोडी नक्की घडत असणार. त्याविषयी सांगा.

- कोणतीही घटना घडण्यासाठी एक तात्कालिक कारण असतं आणि एक कारण असतं की जे सतत तुमच्यामध्ये झिरपत राहिलेलं असतं. ते शोधण्याचा प्रयत्न करण्यासाठी थोडंसं भूतकाळात डोकवावं लागेल. माझं शिक्षण झालं इंग्रजी माध्यमातून. माझा बराचसा मित्रपरिवार हा कॉस्मॉपोलिटिन आणि शिक्षणाची काही वर्ष पाचगणीत घालवली, जिथलं वातावरण पूर्णपणं कॉस्मॉपोलिटिन होतं. पण माझ्या घरात मराठी नि संस्कृतचं वातावरण पहिल्यापासून होतंच. आई-वडिल दोघंही चांगलं मराठी वाचणारे. सहावी-सातवीत असताना मी आईच्या मामांनी लिहिलेली म्हणजेच भा. द. खेर यांनी लिहिलेल्या कादंबऱ्या "सेतुबंधन" आणि "कल्पवृक्ष" वाचल्या होत्या. तिथनं मराठी वाचनाची गोडी मला लागली. वाचनाची आवड होतीच. खूप इंग्रजी वाचन तर खूप होतं. पण कॉलेजमध्ये जाईपर्यंत माझ्यावर मराठीचा- मराठी संगीताचा असा कोणताच प्रभाव नव्हता, जितका माझ्यावर हिंदी संगीताचा होता.
भाषेचा काही प्रश्‍न आहे असं काही मला जाणवलं नव्हतं. माझा मराठी शब्दसंग्रह चांगला होता. पण पहिल्यांदा मराठीविषयक जाणिव कॉलेजमध्ये असताना निर्माण झाली. मी कॉलेजला असताना गोनीदांचं "कुणा एकाची भ्रमणगाथा" हे पुस्तक वाचलं होतं. माझ्या जाणत्या वयात वाचलेली ती पहिली कादंबरी. तेव्हा असं वाटलं की, "अरे, हे जे काय सांगताय ते आपल्या आयुष्याशी थेट निगडित आहे आणि आपण मराठी वाचलं पाहिजे. मराठी न वाचून आपलं फार नुकसान होतंय..." याच सुमारास माझी चेतन दातारशी ओळख झाली - नाटकाच्या निमित्ताने. तो रुपारेलची नाटकं बसवायचा. एक वर्ष असा योग आला की, मला एकांकिका लिहावी लागली. तिला बक्षीस मिळालं. दुसऱ्या दिवशी चेतननं मला एनसीपीएला बोलवून घेतलं. म्हणाला,"तुला सर्वोत्कृष्ट लेखनाचं बक्षीस मिळालंय. आता तुला असं वाटतंय का की आपण लेखक झालो?" मला तेव्हा कळलं होतं की काही प्रश्‍नांना उत्तरं द्यायची नसतात. गप्प बसून राहायचं असतं. तसं मी केलं. "तुला लिहायचं असेल तर परंपरा माहिती पाहिजे", असं म्हणत त्यानं शंभर नाटकांची यादी डिक्‍टेट केली. त्यात मराठी-हिंदी नाटकांपासून जागतिक रंगभूमीवरच्या नाटकांचा समावेश होता. त्यानं मला एनसीपीएच्या लायब्ररीची मेंबरशीप बक्षीस म्हणून दिली. आतापासून सुरुवात कर. त्या दिवशी मी पिंटरचं नाटक वाचलं नि त्याची कामाची वेळ संपली. दुसरं नाटक उद्या वाचायचं ठरवून आम्ही एनसीपीएपासून गिरगावपर्यंत चालत चालत गेलो. तेव्हा आम्ही पिंटरच्या नाटकावर तर बोललो, पण "किचकवध" का वाचलं पाहिजे, देवल किती चांगले नाटकककार होते, गडकरींच्या भाषेचं महत्तव काय, तेंडुलकरांनी काय बदल केले, राजीव नाईक काय लिहितो, असा पटच उभारला.
चेतनच्या सल्ल्यानुसार वाचन चालूच होतं. सोबतीला संगीतातले सगळे मित्र होतेच. धडपड चालू होतीच. पुढं माझ्या रचनांचा कार्यक्रम करायचं ठरलं नि माझ्या वडिलांनी त्याला "अमृताचा वसा" असं नाव सुचवलं. सुरेश भटांच्या कवितेतला हा शब्द होता. तेव्हा मी वडिलांना विचारलं की "वसा" म्हणजे काय? ते म्हणाले व्रत ! तेव्हा मला "वा काय नाव सुचलंय", असं बरं वाटलं हतं. पण जेव्हा मी कार्यक्रम केला तेव्हा एका अर्थाने मी माझ्या परंपरेची ओळख करून घेत होतो. कारण त्यात बालकवीपासून ग्रेसपर्यंत अनेक कवींच्या रचनानांना मी नव्यानं चाली लावल्या होत्या. म्हणजे मी आणि माझे मित्र परंपरा समजून घेत होतो. जे चेतननं नाटकाबद्दल सांगितलं होतं, तेच आम्ही एका परीनं कवितांबद्दल- भाषेबद्दल करत होतो. तेव्हापासून कवी, साहित्यिक, गीतकार यांच्याशी माझा संपर्क वाढू लागला. आपला आणि मातृभाषेचा संबंध सखोल हवा, ही जी माझ्या मनात भावना रुजली होती, ती भावना अधिकाधिक फोफावत गेली. रुजली नि वाढतच गेली...

कोण म्हणतो मराठी गाणी डाऊनमार्केट? (भाग 2)

संगीतकार-गायक कौशल इनामदार यांच्याशी या मराठी अभिमानगीताविषयी साधलेला संवाद.
मुलाखत- राधिका कुंटे


तुमच्या मनात मराठी भाषेविषयीची भावना रुजली हे खरं. पण मग भवताली असं काय घडत होतं की ज्यानं तुम्ही अस्वस्थ झालात? अशा कोणत्या घटना घडल्या ज्यांनी मराठी भाषेच्या अस्तत्वावर ओरखडा उमटला?

- मराठी भाषा मनात रुजल्यावर तिच्याबाबत मी अधिक सजग होऊ लागलो. भोवतालच्या परिस्थितीचा अंदाज येऊ लागला. उदाहरणच द्यायचं झालं तर दादरसारखं खूप मराठी माणसं असणारं ठिकाणसुद्धा बदलत होतं. म्हणजे फक्त भाषाच नाही, मराठी संस्कृतीचं एक वातावरण असतं तेही हळूहळू बदलू लागलं होतं. मुंबईचं लखनौ झालं तरी काही हरकत नाही पण ज्याची काहीच संस्कृती नाही, असं एक मोनोकल्चरल तयार होऊ लागलं होतं. त्यानं मी प अस्वस्थ होत होतो. नवीन मराठी गाण्यांच्या कार्यक्रमाला म्हणावी तेवढी गर्दी होत नाही. मराठी माणूस नॉस्टेलजियातच अधिक रमतो. नवीन रचना मराठी प्रेक्षकांना अजिबात आवडत नव्हत्या, असं नाही. पण कार्यक्रमाला एका ठराविक वयाचेच प्रेक्षक असत. दुसरीकडं केदार पंडित, सलील कुलकर्णी, जितेंद्र अभ्यंकर, अजय-अतुल, अवधूत गुप्ते, मिलिंद जोशी अशी नवीन रचनाकारांची पिढी तयार होत होती.
झ्या असं लक्षात आलं की माझ्याहून लहान असणाऱ्या मुलांना मराठी बोलण्याचा एक प्रकारचा गंड आहे. आख्ख्या पिढीचा मातृभाषेशी हवा तेवढा संपर्क नाही. साधं उदाहरण घ्या- महाराष्ट्रगीत आणि त्याची किमान माहिती आपल्यापैकी कितीजणांना असते? हे विचार डोक्‍यात येत होतेच. सोबत घडत होत्या अगदी छोट्या वाटणाऱ्या घटना... लग्नासाठी ब्लेझर खरेदीला मी हुतात्मा चौकात गेलो होतो. तिथल्या दुकानातल्या म्हताऱ्या सेल्समनला मराठी माहित असेल या हिशोबानं मी विचारलं की,"ब्लेझर्स कुठं मिळतील?" त्यांनी "ऑ?" केलं. मी पुन्हा विचारल्यावर त्यांनीं माझ्याकडं एक दृष्टिक्षेप टाकला नि दिशा दाखवली. मी वळलो नि त्यांनीं त्यांच्या असिस्टंटला सांगितलं - "नजर रखना!" मग माझ्या ते लक्षात आलं हे केवळ मराठी बोलण्यामुळं झालं. मी काही केवळ या एका घटनेवरून निष्कर्ष काढत नाही. पण मला हा अनुभव आला याचं काय करायचं? असा अपमान कुणाचाही होतो, पण तो का झाला याचा मला तर्क नको का लावायला? हळूहळू ही परिस्थिती मला सगळीकडं जाणवायला लागली. टॅक्‍सी ड्रायव्हर, रिक्षा ड्रायव्हर, भाजीवाले... दैनंदिन व्यवहारात मी मराठी बोलतोय म्हणजे चुकीचं करतोय, असा फिल देऊ लागले. त्यात मराठीभाषिकही होते. भाषा टिकायची असेल तर टिकेल नाही तर मरेल, असं काही लोक म्हणतात. त्यांना ते परवडणार असेल मला नाही. कारण मी त्या भाषेत काम करतोय. कारण आपल्यामागं एक परंपरा उभी आहे- मराठीची. मला काहीतरी केलं पाहिजे, असं मला वाटलं, हे या गीतामागचं मूळ कारण.
पहिला मुंबई फेस्टिव्हल 2005मध्ये झाला. त्याच्या उद्‌घाटन सोहळ्यात मी संगीतबद्ध केलेली प्रार्थना 63 मुलांनी म्हटली. त्या पाच मिनिटांच्या प्रार्थनेखेरीज नाना पाटेकरांचं भाषण वगळता मराठीचं एकही अक्षर त्या स्टेजवरून उच्चारलं गेलं नाही. मुंबई कॉस्मोपॉलिटिन शहर असलं तरी तिथं बहुसंख्य मराठी नागरिक आहेत ना? नंतरच्या फस्ट्‌÷िहललाही सगळे मराठी कार्यक्रम नर्दुला टॅंक मैदानावर झाले होते नि इतर कार्यक्रम गेट वेला झाले होते. अगदी काळाघोडा फेस्टिव्हलमध्येही मराठीला स्थान नव्हतं. इंग्रजी वृत्तपत्रांत मराठी सांस्कृतिक जगत कुठं येतच नाही. हल्ली काही इंग्रजी वृत्तपत्रांत या बातम्या येऊ लागल्या आहेत. पण 27 फ्रेब्रुवारीच्या मराठी दिवसाचा उल्लेखही फारसा येत नाही. मराठी माणसाच्या विश्‍वात घडणाऱ्या घडामोडींची फारशी दखलही घेतली जात नाही, ही खंतही मनात होतीच.
एका रेडिओ स्टेशनसाठी काम करताना मराठी बेदखल होतेय, हे जाणवून तिथल्या अधिकाऱ्याला विचारलं की, "तुम्ही मराठी गाणी का नाही लावत?" तो म्हणला, "हमारी पॉलिसी हेै." पॉलिसी म्हणजे मुद्दामून अवलंबलेलं धोरण. मी म्हटलं,"काय आहे तुमची पॉलिसी?" तो म्हणाला,"मराठी गाणी लावायची नाहीत." महाराष्ट्रात राहून मराठी गाणी लावायची नाहीत, अशी पॉलिसी आहे? भारतातल्या इतर कुठल्या शहरात अशी पॉलिसी आहे? कोईमतूर ,कोलकत्ता, बंगलोरध्ये त्या त्या भाषेतली गाणी न लावायला तुम्ही धजावाल का?, असं विचारलं. तो फक्त हसला. माझ्या मनात आलं हीदेखील एक प्रकारची हिंसाच नाहीेए का? इथं स्थानिकांना कुणी जुमानत नाही. ही पॉलिसी ठरवून झालेय. मराठी गाण्यांसाठी रिक्वेस्ट आली तरीही ते ती गाणी लावत नव्हते. मी म्हटलं,"मुंबई कॉस्मॉपॉलिटिन आहे, असं म्हणता तरी तुम्ही सर्रास पंजाबी गाणी लावता. मग मराठी लावणार नाही अशी पॉलिसी का?" तो म्हणाला, "आमच्या वरिष्ठांना वाटतं की मराठी गाणं लावलं तर एक डाऊनमार्केट फिल येईल..." हे सगळं घडत असताना मनात विचार आला की आपण काय करू शकतो? मी संगीतकार आहे, मी गाणं करीन. एक मराठी अभिमानगीत असेल, ज्यामुळं काहीही डाऊनमार्केट वाटणार नाही. हे गीत एवढं मोठं करायचं की कुणाची टाप नाही होणार त्याला डाऊनमार्केट म्हणण्याची ! इतर कुणी नाही तरी मराठी माणूस बोलणार नाही. कारण मराठी भाषा जागतिक भाषा आहे. भारत, इस्त्रायल, अमेरिका नि मॉरिशिअसमध्ये मोठ्या प्रमाणावर मराठी बोलली जाते. एवढंच कशाला नासाने अंतराळात पाठवलेल्या यानात 51 भाषांत रेकॉर्ड केलेल्या भाषेत मराठी भाषेतल्या संदेशाचा समावेश केला आहे. मग ही भाषा डाऊनमार्केट कशी होईल? मधल्या काळात एक प्रसंग घडला व्होडाफोनबाबत. व्होडाफोनची अशी पॉलिसी होती की आम्ही मराठी बोलणार नाही, अशी पॉलिसी होती. अजूनही त्यांच्या काही हेल्पलाइन्स तसेच अडेलतट्ट
ू आहेत. अरेरावी करतात की आम्ही मराठी बोलणार नाही. "अगर आप को अंग्रेजी आती हैं तो उस में बोलिए नहीं तो हिंदी में बात किजिए" असं म्हणायचे. ही कुठली भाषा? असा विचार व्यक्त केल्यावर अनेकजण अनेकपरीनं मला समजावायचा प्रयत्न करतात. भाषा ही माणसाशी निगडित आहेच. ती वेगळी कशी काढणार? "मूळ भाषिकत्व हाच भारताच्या अखंडतेचा मोठा गुण आहे," असं शशी थरूर अलीकडंच म्हणाले होते. व्होडाफोनबद्दल मी ब्लॉगवर लिहिल्यावर व्होडाफोनने आठ दिवसांत मराठीत बोलणं सुरू केलंदेखील !

साकारतंय एक अभिनवगीत... मराठी अभिमानगीत... (भाग 3)

संगीतकार-गायक कौशल इनामदार यांच्याशी या मराठी अभिमानगीताविषयी साधलेला संवाद. मुलाखत- राधिका कुंटे

अभिमानगीत तयार करण्याचं ठरल्यावर कविवर्य सुरेश भटांचीच कविता निवडण्यामागचं नेमकं कारण काय?

- "मराठी अभिमान गीता"साठी मी काही कविता चाचपून बघितल्या होत्या."महाराष्ट्र गीत" त्यापैकी एक. असं लक्षात की "महाराष्ट्र गीता"चा आणि मराठी माणसाचा रोजचा संबंधच उरलेला नाहीये. कर्नाटकचं उदाहरण घ्या. कर्नाटकाची निर्मिती, कानडी भाषेच्या प्रवासाबद्दल खूप लेख, लघुपट, माहितीपट, चित्रपटही आहेत. पण आपल्याकडं "संयुक्त महाराष्ट्र चळवळी"च्या पार्श्‍वभूमीवर असणारी एखादी प्रेमकथाही आढळत नाही. मग तुम्हांला त्या इतिहासाची माहिती मिळणार कशी? तसंच "महाराष्ट्र गीता"बद्दल झालंय, असं मी एका कार्यक्रमात म्हटल्यावर एक बाई म्हणाल्या," ते आहे- गर्जा महाराष्ट्र माझा..." मी म्हटलं, "नाही. बहु असोत सुंदर संपन्न की महा..." बरं ते लिहिलंय श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांनी हेही माहित नसतं. इतकीही माहिती नाही, असं म्हटल्यावर मग त्याचा संगीतकार नि गायक कोण याचा प्रश्‍नच उद्‌भवत नाही...
प्रत्येक समाजामध्ये आणि काळामध्ये प्रतीकं ही फार महत्त्वाची कामं करतात. "महाराष्ट्र गीत" आलं म्हणजे तुम्ही महाराष्ट्राप्रेमी आहात, असा त्याचा अर्थ होत नाही. पण महाराष्ट्रप्रेम व्यक्त करण्याचं, मराठीचा अभिमान व्यक्त करायला हवा. "अभिमान" हा फक्त मिलिटन्टच नसतो. तर तो अत्यंत प्रेमळ असतो. हा अभिमान व्यक्त करण्यासाठी साधनं पाहिजेत. अशा वेळी काही प्रतीकं काम करतात. त्यात संगीत येतं. तसंच "महाराष्ट्र गीता"चं आहे. माझ्या लक्षात आलं की हे गीत कुणालाच फारसं माहित नाही. ते माहित करून घ्यावं, असंही दिसत नाही. या गाण्यात असं काय आहे की ते आपण म्हणतच नाही... खरं तर काही नाही. फार सुंदर कविता आहे ती. पण त्यातली मराठी भाषा आता वापरात नाहीये. "अटकेवरी जेथील तुरंगि जल पिणें" अटक हिंदुस्थानात राहिलं नाही. "तुरंगी" म्हणजे "घोडे" हे माहिती नसतं. पाण्याला आपण जल म्हणत नाही. त्यामुळं ही वापरात नसलेली भाषा आहे. ती पुन्हा आपण सामावून घेऊ शकतो. भाषेच्या संदर्भातच काही वेळा वेगवेगळी विधानं केली जातात. काहीजण म्हणतात मराठी शब्द कठीण असतात. मग आपण इंग्रजी शब्द कसे व्यवस्थित उच्चारतो? उदाहरणार्थ- आपण "डिस्ट्रिब्युशन" म्हणू शकतो. यात आहेत की दोन जोडाक्षरं. मग "वितरण" आपल्याला का बरं अवघड वाटावं? आता बोली भाषेतले शब्दही वापरात आले पाहिजेत. एका व्याख्यानात श्‍याम मनोहरांनी सांगितलं होतं, "हल्ली माझ्यापुढचा एक प्रश्‍न आहे, तो म्हणजे मराठी भाषेमध्ये गंमत येत नाही." त्यावर ते सध्या काम करतायत. हा प्रश्‍न त्यांनी लावून धरलाय. हे वाक्‍य माझ्या डोक्‍यात फिट्ट बसलं होतं. जेव्हा सुरेश भटांचं काव्य मी परत वाचलं, यानिमित्तानं... तेव्हा माझ्या डोक्‍यात चाल निर्माण झाली ती दोन ओळीची... "लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी. जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी". ही चाल डोक्‍यात बरेच दिवस होती. काव्यनिवडीबाबतचा प्र
श्‍न निर्माण झाला नि हे काव्य पुढ्यात आलं तेव्हा वाटलं की हे करेक्‍ट आहे. एकदम बरोब्बर ! याचाच तर आपण शोध घेत होतो. हेच गाणं का नको घेऊ या? कारण अतिशय ओघवती नि सोपी मराठी भाषा आहे ही... "लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी. जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी. धर्म पंथ जात एक जाणतो मराठी. एवढ्या जगात माय मानतो मराठी. येथल्या नभामधून वर्षते मराठी. येथल्या पिकांमधून डोलते मराठी. येथल्या नद्यांमधून वाहते मराठी. येथल्या चराचरात राहते मराठी." तशा बऱ्याच कविता होत्या डोळ्यांसमोर. उदाहरणार्थ- "मराठी असे आमुची मायबोली.", "माझ्या मराठी मातीचा लावा कपाळास टिळा" ही कुसुमाग्रजांची. तिचा समावेश या सीडीत करण्यात आलाय. शिवाय "कणखर देशा पवित्र देशा" ही वसंत बापट यांची कविता आणि इतरही अनेक कविता वाचल्या. पण यात भाषेबद्दल सांगणारी कविता नव्हती. तर महाराष्ट्राबद्दल सांगणारी होती. म्हणून मग कविवर्य सुरेश भटांचीच "लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी," ही कविता निवडली...



कवितेची निवड झाली. चाल डोक्‍यात आली हे खरं पण फक्त तेवढ्यानं भागत नसतं. मग प्रश्‍न येतो तो पैशांचा. हा प्रश्‍न कसा काय सोडवलात?

- सगळा खर्च मलाच करायला खूप आवडलं असतं. माझ्यासाठी ती आनंदाची नि अभिमानाची गोष्ट होती. पण त्याचा एवढा सगळा व्याप पाहता मी एकट्यानं खर्च करणं अशक्‍य होतं. बरं विषय असा होता की कुठलाही प्रायोजक लगेच तयार झाला असता त्यासाठी. कारण राजकीय दृष्टायसुद्धा मराठीचा विषय ऐरणीवर होता. पण प्रायोजक घेतला तर हे गाणं कमर्शिअल प्रॉडक्‍ट झालं असतं. मनात हेतू होता माणसं जोडायचा नि तेही भाषेच्या निमित्तानं. त्यासाठीचं माध्यम होतं संगीत. समजा दोन हजार लोकांनी पाचशे रुपये दिले - तेही देणगी म्हणून नाही तर सहभाग म्हणून तर? मायकल जॅक्‍सनची सीडी 500 रुपयांना घेतो, तसं भारतात निर्माण झालेलं सगळ्यात भव्य गाणं घ्यावं विकत. माझ्याकडून कमिटमेंट अशी की ती सीडी मी घरपोच पोचती करार. ही कल्पना माझ्या डोक्‍यात आली, तेव्हा माझी एक मैत्रिण समोरच बसली होती. तिच्याशी बोलल्यावर तिनं पटकन हजार रुपये काढून दिले... माझ्या लक्षात आलं की या गोष्टीत ताकद आहे. लोकांनाही वाटतंय की असं काही व्हावसं वाटतंय... मग हे माझ्या कार्यक्रमांतून सांगायला लागलो. मित्रांना फोन केले. म्हणालो, "हे देणगीसाठी आवाहन नव्हे तर या चळवळीत सहभागी होण्याचं आमंत्रण आहे." मला उत्तम प्रतिसाद मिळाला. तरीही ठरवल्याप्रमाणं दोन हजार लोकांकडून पैसे जमवू शकलो नाही. जवळपास साडेतेराशे लोकांकड पैसे गोळा करू शकलो. अजूनही दीड-दोन लाख रुपये कमी आहेत. अर्थात आठ लाख रुपये जिथं जमले तिथं दोन लाख रुपये मला खर्च करायला काहीच वाटत नाही. या संदर्भातली एक आठवण आहे. "मौज" प्रकाशनाच्या कार्यक्रमात सुभाष देसाईं हे ऐकून म्हणाले,"आपण काहीतरी करू या." त्यांनी ते उद्धव ठाकरे यांना सांगितल्यावर लगेच तिसऱ्या दिवशी त्यांनी मला शिवसेना भवनात बोलावून घेतलं. ते म्हणाले, "तुमचा हा प्रकल्प छान आहे. तुमची आमच्याकडून काय अपेक्षा आहे?" मी म्हटलं, "सर, पाचशे रुपये द्या." त्यावर ते हसले. म्हणाले, "मी तुम्हांला अकरा लाख रुपये देतो." तेव्हा माझ्याकडं चाळीस हजार रुपये जमा झाले होते. 10 लाखाच्या बजेटपैकी 11 लाख माझ्यासाठी खूप मोठी रक्कम होती आणि क्षणभर मला तो मोह झालाही की यामुळं आपले सगळे प्रश्‍न सुटतील. तेही तसंच म्हणाले. त्यांचा हेतू चांगलाच होता. त्यांना प्रकल्प आवडला होता. ते म्हणाले,"तुम्ही कशाला वणवण दारोदार भटकताय? पैसेच हवेत ना तुम्हांला आम्ही देतो. तुम्ही एक मेला हे गाणं आम्हांला द्या." पण माझ्या मनात विचार आला की, "पैसे मिळतील, प्रश्‍न सुटतील. पण मनात जो हेतू आहे लोक जोडण्याचा, तो पूर्णत्वास जाणार नाही. ते शिवसेनेचं गाणं होईल." मी तसं उद्धव ठाकरे यांना सांगितलं. म्हटलं, "सर, तुम्ही पाचशे रुपये दिलेत आम्हांला तर हवेच आहेत." आता राजकारणी नकोत, असं म्हणायचे दिवस गेलेत. कुणालाही बाहेर ठेवायचं नाही. आता सगळ्यांनी मिळून प्रयत्न केले पाहिजेत. म्हणूनच मनसे, शिवसेना, कॉंग्रेसचे - सगळ्यांचेच कार्यकर्ते पाचशे रुपये देतात. अशा प्रकारची ही सगळ्यांची मदत आणखी कुठं मिळणार? ही मंडळीही कुठं एकत्र दिसणार?, असं मला वाटतं. म्हणून मी उद्धवजींना म्हटलं की ,"यात पुढाकार सामान्य माणसाचाच राहावा. तुम्ही पुढाऱ्यांनी आमच्या मागं उभं रहावं. आमची उमेदही वाढेल." ते म्हणाले,"तुमचं म्हणणं मला पटतंय. शिवसेनेकरता हा प्रकल्प मागितला कारण हा चांगला प्रकल्प आहे. आम्हांला आवडलं असतं. पण तुम्ही म्हणाल तशी आम्ही तुम्हांला मदत करू." त्यामुळं मग शिवसेनेच्या स्थानीय लोकाधिकार समिती नि कार्यकर्त्यांपर्यंत
पोचायला त्यांनी मदत केली. अशीच मदत मनसेच्या रमेश प्रभूंनी केली. त्यांनी त्यांच्या परिसरातल्या लोकांना प्रकल्पाची माहिती सांगितली. या गाण्यामध्ये शिवसेना आणि मनसेच्या कार्यकर्त्यांचा हातभार लागला, जे कोणत्याही व्यासपीठावर शक्‍य झालं नसतं. असं होत होत पैशांचा प्रश्‍न सुटू लागला. ठरवलं होतं त्याच मार्गानं आम्ही जात होतो. पण वेळ लागला. आधी 1मे 2009 रोजी सीडीचं प्रकाशन करायचं होतं, पण तेव्हा अर्धेही पैसे जमले नव्हते. अनेक अडीअडचणी येत गेल्या. शिवाय सगळ्या गायकांपर्यंत पोचेपर्यंतही काही काळ गेला. गायक-वादकांना प्रकल्पाची सविस्तर माहिती दिली. मग आम्ही चार दिवस मुंबईचा मोठ्ठा स्टुडिओ- आजीवसन स्टुडिओ बुक केला. एखाद्या मतदान केंद्रासारखं चाललं होतं- गायकाला वेळ असेल, तेव्हा त्यानं यावं नि त्याची ओळ गाऊन जावी. तिथल्या फ्लोअर मॅनेजरनं माझा सहकारी मंदार गोगटेला विचारलं की, हा काय प्रकार आहे? एवढे मोठमोठे गायक येतायत नि तुम्हांलाच पैसे देतायत, हे कसं काय? मग त्यालाही सांगितलं. बऱ्याच गायकांनी पैसे तर घेतले नाही, उलट काहींनी पाचशे-पाचशे रुपये काढून दिले होते... 10 नोव्हेंबरला सुचलेल्या या प्रकल्पाला जवळपास सव्वा वर्ष होतंय. साकारतंय एक अभिनवगीत... मराठी अभिमानगीत...

श्रीमंत गाणं (भाग 4)

संगीतकार-गायक कौशल इनामदार यांच्याशी या मराठी अभिमानगीताविषयी साधलेला संवाद.
मुलाखत- राधिका कुंटे


"मराठी अभिमान गीता"चं संगीत कसं आकारलं ?
- मराठी अभिमान गीता"च्या संगीताची प्रक्रिया अतिशय इंटरेस्टिंग होती. आर. डी. बर्मन म्हणायचा की, "चाल केली म्हणजे गाणं होत नाही. त्यावर काही संस्कार करावे लागतात." त्याचाच नेमका शब्द आहे "नर्चर करावं लागतं". तशी संधी या गाण्याच्याबाबतीत आपोआपच मिळाली. कारण वर्षभर एक गाणं करणं हा समृद्ध करणारा अनुभव होता. काय होतं की, तुम्ही ती चाल मनात रेंगाळू देता मनात. पहिल्या दोन ओळी केल्यानंतर खूप वेळ गेला. त्यामुळं चाल मनात रेंगाळत होती. बऱ्याचदा लोकांना वाटतं की हा काहीच करत नाहीये. दोन ओळी करून बसलाय आपला. तर ते तसं नसतं. आपण इतर काही गोष्टी करत असलो तरीही त्याचा विचार सतत आंतरमनात कुठंतरी चालू असतो आणि ते एका क्षणी सुचतं. सुचायला तो एकच क्षण असतो, पण त्याच्यावरचं जे सतत चालणारं काम असतं, ते वेगवेगळ्या फॉर्म्समध्ये चालू असतं. तसंच या गाण्याबद्दल झालं, जे शब्दांत सांगणं कठीण आहे. "लाभले अम्हांस भाग्य बोलतो मराठी" याचा सूर कसा असावा, यावर विचार झाला. नंतर बऱ्याच लोकांनी गाणं ऐकल्यावर सांगितलं की आमचं रक्त सळसळत नाही हे गाणं ऐकून ! हे रक्त सळसळण्याचं गाणं नाहीच. ते आनंदाचं गाणं आहे. मराठी म्हटल्यावर फक्त शिवाजी नि तलवारच का आठवावी? मराठी ही सुंदर नि प्रेम व्यक्त करणारीही भाषा आहे. सुरुवातीला चाल ऐकल्यावर नि नंतर पूर्ण गाणं बसल्यावर ते ऐकणाऱ्या माझ्या मित्रांना हे पटलं. कारण मला ते मिलिटन्ट होऊ द्यायचं नव्हतं.
"रुपगंधा" या पुस्तकात ही कविता आहे. त्या पुस्तकात जी कविता आहे, त्यात सुरेश भटांनी नंतर चार ओळी वाढवल्या होत्या. त्या ओळी होत्या- "पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी. आपुल्या घरीच हाल सोसते मराठी. हे असे कितीक खेळ पाहते मराठी. शेवटी मदांध तख्त फोडते मराठी." या रक्त सळसळणाऱ्या ओळी आहेत. पण "अभिमान गीतात" त्या असाव्यात की नाहीत, याबद्दल माझ्या मनात खूप द्वंद्व झालं. याला मी चाल केली. पण हे गाण्यात घ्यावं का, ते रत नव्हतं. "पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी. आपुल्या घरीच हाल सोसते मराठी" या अीो आहेत, चिरंतन राहाव्यात का? अभिमन गीत का करावं, तर ते चिरंतन रहावं म्हणून. ही परिस्थिती सत्य आहेही. पण ती असावी नि रहावी, असं कुणालाच वाटणार नाही. त्यामुळं याबद्दल खूप विचार करून शेवटी मी ते गाळलं. याला दोन कारणं होती- "संयुक्त महाराष्ट्र चळवळी"च्या वेळी ही कविता लिहिली गेलेय. तेव्हा भटांनी या ओळी लिहिल्या नव्हत्या. त्यानंतर त्यांनी त्या लिहिल्या. त्यामुळं एका अर्थाने जी मूळ कविता होती तीच ठेवणं मला श्रेयस वाटलं. दुसरं म्हणजे ही परिस्थिती काही चिरंतन नाहीये नि ती नसावीही, म्हणूनसुद्धा मी ध्वनिमुद्रणामध्ये या ओळी घेतल्या नाहीत. मी काही वेळा कार्यक्रमांतून त्या म्हणतो. तेव्हा टाळ्याही पडतात. पण टाळ्या पडू नयेत खरंतर. कारण ही अभिमान वाटावी अशी गोष्ट नाहीये... हा सगळा विचार करताना रात्रीची झोप उडाली होती की लिहिलेल्या ओळी गाळाव्यात का नाही?...
कवितेच्या ओळी गाळण्याबाबतची एक आठवण आहे. कुसुमाजांच्या "पृथ्वीचं प्रेमगीत"ला मी चाल केली होती. त्यातलं शेवटचं कडवं मी गाळलं. ते होतं- "अमर्याद मित्रा तुझी थोरवी अन्‌, मला ज्ञात मी एक धुलि:कण, अलंकारण्याला परी पाय तुझे. धुळीचेच आहे मला भूषण." पुढं मी कुसुमाग्रजांकडं गेलो असताना त्यांना "नवलाख तळपती"ची चाल ऐकवली. ते म्हणाले ,"वा छान. आणिक काय केलंयस तू माझ्या कवितांपैकी?" मी अगदी घाबरत म्हणालो, "पृथ्वीचं प्रेमगीत" केलंय." ते म्हणाले,"ऐकव." मी ते ऐकवलं. अत्यंत शांतपणं ते ऐकत होते. शेवटचं कडवं न घेता मी गायलो, तेव्हा ते उठले नि मला मिठी मारली. म्हणाले, "फार सुरेख चाल केलेस तू. फक्त एकच विचारू का, शेवटचं कडवं का गाळलंस?" या प्रश्‍नाची मला भीती वाटत होती, कारण आपण कवीसमोरच त्याच्या कवितेचं शेवटचं कडवं म्हटलं नव्हतं. मी म्हटलं, "मी सांगतो. माझं चुकत असेल तर मला सांगा. मला वाटतं की या ओळी तात्पर्यासारख्या येतात. संगीतात एखादी गोष्ट येते, तेव्हा तात्पर्य सांगायची गरज राहत नाही. म्हणून मी ते गाळलं. "गमे की तुझ्या रुद्र रुपात जावे, मिळोनी गळा घालुनिया गळा, तुझ्या लाल ओठातली आग प्यावी, मिठीने तुझ्या तीव्र व्हाव्या कळा", याच ओळीवर या गाण्याला सुंदर अंत मिळतो." यावर त्यांनी क्षणभर विचार केला नि म्हणाले, "तुम्ही तसंच ठेवा." तो माझ्या आयुष्यातला खूप काही शिकण्यासारखा अनुभव होता. आपल्या कलाकृतीकडं तटस्थ राहून बघायला या लोकांकडून शिकलं पाहिजे, असं वाटलं. तसाच विचार भटांच्या कवितेच्या ओळी गाळताना येत होता, की असं आपण करू शकतो का? विचारचक्र चालूच होतं. सुरेश भटांचे चिरंजिव चित्तरंजन भट त्यांच्याशी मी याविषयी बोलत होतो. ते म्हणाले, "तू हवं तसं कर." बऱ्याच लोकांशी मी यावर चर्चा केली. उलटसुलट मतं होती. शेवटचं कडवं म्हटल्यावर टाळ्या यायच्या. त्यामुळं जवळच्या मित्रांचं म्हणणं होतं, तू घे
च ते. शेवटी मी निर्णय घेतला की नाही घ्यायचं. तो एक फार कठीण निर्णय होता.
सुरुवातीला जवळपास 120 गायकांची यादी काढली होती. त्यातले 112 गायले. 24 ओळी असल्याने चांगल्या गायकांना तुम्ही पाच-सहाजण मिळून एक ओळ गा, असं सांगण्याची कठीण वेळ माझ्यावर येणार होती. सगळ्यांच्या सोलो ओळी नाही ठेवता येणार, पण या अभिमान गीतातला त्यांचा सहभाग अतिशय महत्त्वाचा असेल, असं वाटलं. हे असं वाटतं हे ज्येष्ठ गायकांना सांगणं तर फारच कठीण होतं. पण ते सांगितल्यावर सगळ्यांनी छान सहकार्य केलं. कुठल्या गायकानं कुठली ओळ गावी, याबद्दल खूप विचार झाला. गाणं आख्खं लिहून काढलं. कुठली ओळी किती वेळा येणार तेही लिहिलं. पुरुष-स्त्री, पुरुष-स्त्री, कोरसमध्ये अशी विभागणी केली. त्याच्या कमलेश भडकमकर, मिथिलेश पाटणकर, मंदार गोगटे नि मी अशा चारजणांत प्रती वाटल्या. गायकांची यादी देऊन प्रत्येकाला मतस्वातंत्र्य दिलं. मग त्यातल्या समान ओळी-गायक कोणत्या ते ठरवलं. त्यात काही वेगळेपणा असेल तर तसं का, अशी चर्चा करण्यात बरेच दिवस गेले. पहिली ओळ ठरली ती अमूकच गायकानं गावी- ती म्हणजे मुग्धा वैशंपायन या चिमुडीची ! मला सगळ्या गाण्याचा ग्राफ पहिल्यापासून दिसत होताच. सगळे एकत्र ओळ गातील, तेव्हा क्षणिक शांततेनंतर एका लहान मूलाचा आवाज यावा, तो मुग्धाचा असावा, असं वाटलं. सगळ्या गायकांना एकेक ओळ आहे. फक्त मुग्धा, आर्या, रोहित, प्रथमेश नि कार्तिकी यांना तीन ओळी आहेत. कारण शेवटी आपल्याला पुढं बघायचंय, मराठी टिकवणारे ते आहेत. त्यांच्या मनात आत्तापासून मराठीबद्दल आत्मीयता निर्माण झाली नि न्यूनगंड नसेल तर आपण जिंकलो ! यातून बऱ्याच गोष्टी सुचवल्या जातात, की आपण पुढं बघतोय. तरुण पिढी गातेय, त्याचा त्यांना अभिमान नि आनंद आहे. जुन्यामध्ये रेंगाळून उपयोग नाही, तर नवीन पाहिलं पाहिजे, हेही दिसतं, जे महत्त्वाचं आहे. काही ओळी लागोपाठ होत्या. उदाहरणार्थ- "आमुच्या कुलाकुलात नांदते मराठी, येथल्या फुला
फुलात हासते मराठी." पकी पहिली ओळ जरा सिनिअर गायिकांनी गायली तर त्यातूनही बऱ्याच गोष्टी सुचवल्या जातात. एक आईपण येतं, कुटुंबाचं फिलिंग येतं. ही ओळ संगीत चितळे, अनुजा वर्तक, वर्षा भावे नि भाग्यश्री मुळे यांनी गायलेय. पुढची ओळ तरुण मुलींनी गावी, म्हणून अनघा ढोमसे, सायली ओक, आनंदी जोशी न मधुरा कुंभार यांना दिली. आवाजातून यातला फरक कळतो नि त्याची लगेच गंमत कळते. पहिली ओळ कुणाच्या आवाजात असावी? यावर विचार चालू होता. खरंतर पहिली ओळ लताबाईंनी गावी, असं माझ्या खूप मनात होतं. त्यांना विचारलं तेव्हा त्यांचं ऑपरेशन झालं होतं, नंतरही आम्ही प्रयत्न केले, पण तेव्हा नाही जमलं. पण मग कुणाचा आवाज? तर तो "मराठी " आवाज असावा. "मराठी" म्हटल्यावर कोण आठवतात, तर रवींद्र साठे ! मग त्यांनी ती पहिली ओळ गायली. असं ते एकेक एकेक ओळीचा विचार ठरत गेलं. मग "आमुच्या घराघरात वाढते मराठी"त माधव भागवत-सुचित्रा भागवत. "येथल्या कळीकळीत लाजते मराठी"यासाठी एक तरुण गायिकाच पाहिजे. "येथल्या तरुलतात साजते मराठी"साठी अगदी टिनएजर मुलीपेक्षा थोडी मोठी गायिका पाहिजे, असं ते सगळं ठरत गेलं. "येथल्या दरीदरीत हिंडते मराठी"साठी फोकचा आवाज हवा. त्यात उमप बंधू,अशोक हांडे, अच्युत ठाकूर नि अजय-अतुल गायलेत. "येथल्या वनावनात गुंजते मराठी" या ओळीसाठी ज्याच्या आवाजात वजन नि गुंजन आहे, तो हवा. मग शंकर महादेवनचा आवाज वापरला. ते सगळं विचारपूर्वक घडत गेलं. मग आर. डी. बर्मन जे म्हणतो, की गाण्यावर संस्कार झाले पाहिजेत, तर एरवी ते फक्त संगीतकारांकडून होतात. इथं अनेक संगीतकारांचे अनेक गायकांचे संस्कार या गाण्यावर होत गेले. म्हणून ते अत्यंत श्रीमंत गाणं झालंय, ते केवळ सुरेश भटांचे शब्द आणि इतक्‍या सगळ्या लोकांच्या मनापासून असणाऱ्या इन्व्हॉलमेंटमुळं...

उत्फूर्त प्रतिसाद (लेख- 5.)

संगीतकार-गायक कौशल इनामदार यांच्याशी या मराठी अभिमानगीताविषयी साधलेला संवाद.
मुलाखत- राधिका कुंटे



अभिमानगीत जडणघडण होताना, ते संगीतबद्ध करण्याच्या सुरेल प्रवासात कोणकोणते अनुभव आले?

- जनमानसानं "मराठी अभिमानगीता"ची कल्पना अतिशय उत्स्फूर्तपणं उचलून धरली. तिला दाद दिली. एक आठवण सांगतो... एका कार्यक्रमात एक आजीबाई आल्या माझ्याकडं आणि त्यांनी माझ्या हातावर पाचशे रुपये ठवले. अगदी प्रेमानं म्हणाल्या, "मी फार काही देऊ शकत नाही. पण हा माझा खारीचा वाटा." मी सांगितलं, "आज्जी, हा सेतू खारीच बांधायत सगळा आणि हा खारींनीच बांधलेला सेतू आहे. कारण माकडं खरोखर काही करत नाहीयेत आपल्याकडं." त्यावर त्या मिश्‍किलपणं हसल्या. त्यांनाही त्यातला विनोद कळला... मध्यंतरी माझे लाडके ज्येष्ठ संगीतकार खळेसाहेबांना कार्यक्रमाचं निमंत्रण देण्याकरता गेलो होतो. गप्पा मारताना ते म्हणाले, "माझी तब्येत तेवढी बरी नाही". मी म्हणालो, "कार्यक्रमाचं निमंत्रण द्यायला आलो होतो. पण तुमची तब्येत..." ते म्हणाले, "अरे, सोड ते. यासाठी मी येणार. मी परका नाही." म्हणालो "मी ने-आणायची व्यवस्था करतो." ते म्हणाले "तसं नको, मी येईन", असं म्हणत त्यांनी पाचशे रुपये काढून दिले. मी म्हणलो, "आम्ही थांबवलंय आता पैसे घेणं." ते म्हणले,"माझे घ्यायचेच." एका कार्यक्रमात एक "स्पेशल" मुलगा कार्यक्रमाला आला होता. त्याला हे कळतं होतं की हे खूप काहीतरी भारावून जाण्यासारखं आहे. कारण मी आवाहन केलं नि गाणं गायलो. त्याला लोकांनी टाळ्या वाजवून प्रतिसाद दिला. त्यानं उत्साहात देणगीदारांचा पत्ता लिहायचा होता, ते कार्डं घेऊन अर्धवट भरलं. मग तो बहुधा पैसे मागायला त्याच्या आईवडिलांकडं गेला असावा. त्यांना कदाचित ते पटलं नसावं किंवा हे काय यानं काहीतरी भरून आणलं असं काही वाटलं असावं. त्यांनीं त्याला सांगितलं असावं की हे कार्डं तू परत कर... ते घेऊन तो आमच्याकडं आला नि ते परत केलं. आम्ही मात्र ते कार्डं ठेऊन दिलंय. कारण त्याची इच्छा हेच त्याचे पैसे आहेत. आता आम्ही त्याला सीडी पाठवून देणार आहोत. सीडीसाठी देणगी देणाऱ्या साडे
चौदाशे मान्यवरांत त्याचं नाव आहे... म्हणूनच आम्ही असं ठरवलं कुणी पाचशे दिले, कुणी हजार कुणी आणखीन... पण कुणी किती पैसे दिलेत ते लिहायचं नाही. कारण पाचशे रुपयांची किंमत कुणाच्या लेखी किती असेल ते आपण नाही ठरवू शकत. त्यामुळं आपणही काहीतरी या गाण्यासाठी करावं असं वाटणारे आणि ते करणारे कितीतरी लोक पुढं आले नि त्यांनी मदतीचा हात दिला.
सांगायला अतिशय आनंद होतो की, आपल्याकडचे मराठी गायक -"मराठी" म्हणजे जे मराठी गातात ते सगळे - त्या साऱ्यांना आपल्या भाषेची जाण आहे. कणव आहे. तिच्याविषयी खूप काही वाटतं त्यांना म्हणून सांगू? त्यामुळं मला एकही असा अनुभव आला नाही की, हे काय आहे? का करायचं? असा एकही अनुभव आला नाही. "मला काही बुवा हे मान्य नाही," असं म्हणणारं कुणीही भेटलं नाही. हा अगदी शंभर टक्के प्रतिसाद होता. काही अनुभव भारावून टाकणारे होते. उदाहरणार्थ- आरती अंकलीकर, सावनी शेंडे, बेला शेंडे, शौनक अभिषेकी ही मंडळी पुण्याहून आली होती- फक्त एक ओळ गाण्याकरता ! नुकत्याच आरतीताई होत्या. म्हणाल्या, "माझं शेपूट तू ठेवलंयस की नाही?... तू शेपटांचाच वाघ केलास." ही खूप छान मार्मिक कॉमेंट होती ती की, "शेपट्यांचा वाघ केलास..." इतर गायकांचेही खूप चांगले अनुभव आहे. स्वप्नील बांदोडकर, अवधूत गुप्तेंनी पैसे गोळा करण्यापासून सगळं केलं. स्वप्नील पत्रकार परिषदेला आला होता आम्हांला पाठिंबा द्यायला की आम्ही तुझ्यामागं उभं आहोत. ही खूप मोठी गोष्ट आहे की, जो आज मराठीतला स्टार सिंगर आहे, तो आज अशा उपक्रमाला जाहीर पाठिंबा देतोय....
एक चांगल्या प्रस्थापित गायिका रेकॉडिंला आल्या होत्या. त्यांनी मला असं विचारलं की,"चांगलं आहेस. हे गाणं तू करतोयस. पण तुला असं वाटतं का खरंच की यानं काहीतरी होईल? मी गाईनही." त्याप्रमाणं त्या आल्या नि गायल्याही. तेव्हा मी त्यांना विचारलं होतं की शेवटचं तुम्ही कधी एक ओळ गाण्याकरता बाहेर गेला होतात?" कारण त्या प्रस्थापित मोठ्या गायिका आहेत. तर त्यांनी विचार केला आणि त्या हसल्या. मी त्यांना म्हटलं, " हे बघा, ही शक्ती आहे या गाण्याची! तुमच्यासारख्या मोठ्या गायिकासुद्धा एक ओळ गाण्याकरता येतात. का येतात? फक्त मी तुम्हांला बोलवलं म्हणून का? तर नाही. तुमचं मराठीवर प्रेम आहे. मराठीनं तुम्हाला ए ओळ गायला बोलवलंय. तुम्ही हा विचारच केला नाहीत की, मी प्रस्थापित गायिका आहे वगैरे. तुम्ही आलात. सगळ्यांमध्ये मिसळलात नि हीच या गाण्याची मोठी शक्ती आहे." गाण्याचं रेकॉर्डिंग आजीवसन स्टुडिओत झालं. तिथल्या मंदार आणि अवधूत वाडकर यांची नावं घेतलीच पाहिजेत. सुरेश वाडकर यांच्या या साऊंड इंजिनिअर पुतण्यांनी मला लाखमोलाची मदत केली. त्यांनी स्टुडिओचं वातावरण घरासारखं ठेवलं. त्यांनी हे काम जितकं माझं आहे, तितकंच आपलं म्हणून केलं. अवधूतनं तर पाचशे रुपयांच्या देणगीचं कार्ड रेकॉर्डिंग मशीनवरच सगळ्यांना दिसेल असं ठेवलं होतं की जे पाहून लोकांनीही पैसे द्यावेत. एकूण 112 गायकांपैकी अवधूत-मंदारनं मिळून जवळपास 100 आवाज रेकॉर्ड केले. तेसुद्धा एक कठीण काम होतं. एवढ्या गायकांचे वेगवेगळे आवाज एकाच गाण्यासाठी रेकॉर्ड करणं नि तेही वेगवेगळे रेकॉर्ड करणं ही सोपी गोष्ट नाही. प्रत्येकाची वेळ वेगवेगळी होती, प्रत्येकाच्या आवाजाचा पोत वेगळा असतो, त्याप्रमाणं माइकिंग करावं लागतं, लेव्हल ठेवावी लागते. तांत्रिकदृष्ट्याही ते अत्यंत आव्हानात्मक काम होतं. ते एकदाही कोणतीही सबब न सांगता प्रायोरिटी देऊन ते पूर्ण केलं.
चेन्नईत रहमानचा स्टुडिओ बुक करण्यासाठी मला मुरुगन मोहन नावाचा तिकडचा एक कम्पोजर आहे, त्यानं मला तिकडं सगळं अरेंज करून दिलं. स्टुडिओ बुक करण्यापासून ते इल्लया राजाचे सगळे वादक बुक करण्यापर्यंत सगळंच. तोवर त्याला हे माहित नव्हतं की मी हे कशासाठी काय करतोय वगैरे. चेन्नईला गेल्यावर स्टुडिओत गाणं सुरू व्हायच्या आधी प्रभाकर या व्हायलोनिस्टनी माझी त्यांच्या टीमशी ओळख करून दिली. तेव्हा मुरुगनही सोबत आला. एकानं विचारलं हे फिल्मसाठी आहे गाणं? मी म्हटलं नाही. या गाण्याचं कारण असं असं आहे. तेवढ्यात मुरुगन आणि वादकानं उत्स्फूर्तपणं पाचशे रुपये काढून दिले. म्हणले, "हे आमच्या राज्यात कधीच झालं नसतं." अशी वागणूक त्यांच्या भाषेला मिळणंच शक्‍य नाही. ही एक मनोमनी साठवलेली आठवण तर आहेच, शिवाय हा एक प्रकारचा मानसिक बळ देणारा अनुभव आहे. मराठीसाठी, तिच्यासाठी चालेल्या या उपक्रमाला त्यांनी दिलेली ही दाद होती. भाषिक अस्मितेविषयी दक्षिणेच्या लोकांना खूप भान आहे. कमला हसनने एका मुलाखतीत मराठीत काम करायचंय असं म्हटलं होतं. तो म्हणाला होता,"मराठीत खूप टायलेंटेण्ड लोक आहेत. त्यांना स्वत:च्या भाषेविषयी तमिळ लोकांनाहून अर्धी जरी अस्मिता जागृत असती तर त्यांनी अख्खी इंडस्ट्री उभी केली असती..."
शंकर महादेवन या गाण्यात गायला तो तर फार मस्त किस्सा झाला. आमची खूप जुनी मैत्री आहे. तो कंम्पोजर होण्याधीपासून माझ्याकडं गातोय. म्हणून त्याला फोन केला की मी असं गाणं करोत, त्यात एक ओळ तुला गायचेय. तो काहीही आढेवेढे न घेता लगेच हो म्हणला. त्याच्या सोईनुसार मी यशराज स्टुडिओत रात्री आठ वाजता गेलो. मी तिथला बी स्टुडिओ बुक केला. तिथले साऊंड इंजिनिअर विजय दयाळ यांनी इन्स्ट्रुमेंटल व्हर्जनमध्ये गिटारची ओळ वाजवलेय. मी गेलो तर संकर निघालो होता, त्याच्या लक्षात राहिलं नव्हतं. आमचा फोन होईपर्यंत तो जुहूला पोहचला होता. राहतो वाशीला. स्टुडिओ अंधोरीत. क्षणभर वाटलं आज काही रेकॉर्डिंग होत नाही. पण तो म्हणला नाही, परत येतोय... आल्यावर विचारलं काय गायचंय? तू काय करतोयस? त्याला सगळी कहाणी सांगितली. तो म्हणला ऐकव... मी ऐकवलं नि त्याच्या डोळ्यातनं पाणीच आलं. तो मागं वळला म्हणला,"कौशल यू हॅव अचिव्ह इम्पॉसिबल!" मग गायला. इतकं अप्रतिम गायला तो... "येथल्या वनावनात गुंजते मराठी" ही ओळ गायला. बाहेर येऊन म्हणाला की, "हरिहरनला तू विचारलंस का?" म्हटलं आमची ओळख नाहीए."तो म्हणाला, मी बोलतो. त्यानं दुसऱ्या दिवशी लक्षात ठेऊन हरिहरनला फोन करून सगळं सांगितलं नि मला तसा एसएमएस केला. स्टुडिओतून जाताना तो म्हणला,"या गाण्यासाठी तू माझा विचार केलास,त्यासाठी आभार." एवढ्या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या गायक-संगीतकाराला हे वाटलं नि या गाण्यानं त्याला हेलावून टाकलं. हे मी इतर मित्रांबरोबर शेअर केलं पाहिजे, म्हणून हरिहरनचं नाव सुचवलं. त्याच्या घरी स्टुडिओतला सगळा जामानिमा घेऊन गेलो. त्याच्या जिममध्ये ते सेट केलं. त्याला सगळं सांगितल्यावर तो म्हणाला, "मी गाईनच. रेडिओ कंपनीचं तू सांगितलंस, पण फक्त मराठी नाही तर हिंदुस्थानी संगीताबद्दल त्यांना अनादर आहे. मी याबाबतीत अत्यंत रॅडिकल आहे." मग ते नुसतं गायल
ेत नाहीत तर स्वत:हून आलाप घेत ऍडिशन्सनही केल्या. "येथल्या चराचरात राहते मराठी" अशी ओळ होती. या ओळीनंतर मध्ये एक गॅप होती नि मग मुग्धाची ओळ सुरू होत होती. तिकडं त्यांनी फक्त "मराठी" अशी वरनं तान घेतली. की त्यातून "येथल्या चराचरात राहते मराठी" हा फिलच मिळतो. असे सगळ्या गायकांचे संस्कार या गाण्यावर होत गले.
रेकॉर्डिंगला सगळ्यात कमी वेळ लागला असेल तर तो मुलांना! अतिशय मनापासून ते गायलेत. गाण्यावर- भाषेवर त्यांचं प्रेम अत्यंत निखळ असतं. त्यामुळं मुग्धा, कार्तिकी, आर्या, प्रथमेश नि रोहित जे गायलेत ते इतकं सुरेल नि मनापासून गायलेत की अनेकांनी सांगितलं हे ऐकून अंगावर काटा येतो किंवा रडू येतं... कारण ते मनापासून बोललं गेलंय. ते रेकॉडिंग ठाण्यात रोहित प्रधानच्या स्टुडिओत केलं होतं. तोही एक मस्त अनुभव होता. सुरेश वाडकरांकडूनही खूप ऍक्‍टिव्ह पाठिंबा मिळाला. त्यांना थ्रोट इन्फेक्‍शन झाल्यानं तब्येत बर नव्हती. आम्ही त्यांना चला सांगायला गेलो की आवाज खराब आहे म्हणायचे. मग अमेरिकेला जायचं ठरलं. त्यांच्या सगळ्या व्यापातून त्यांना ही एक ओळ गायचं काय लक्षात राहिल? पण ते जायच्या दिवशी संध्याकाळी स्टुडिओत आवर्जून आले नि गाऊन गेले. इतकं सुंदर गायले... की क्‍या बात हैं ! असा सगळ्याच गायकांनी आपापल्या ओळींवर आपापला ठसा उमटवलाय. ज्यांची मातृभाषा मराठी नाही, ते गायकही अतिशय प्रेमानं गायले. हम्सिका अय्यरचंही मला कौतुक वाटतं. ती माझ्याबरोबर चेन्नईला आली होती. आज ती एवढी मोठी गायिका आहे... पण हे मी करतो म्हणून भाषेचा मला त्रास होऊ नये, याची काळजी घेतली. रिक्षापासून म्युढिशिअन्सना समजावण्यापर्यंत सगळीकडं ती तमिळमध्ये बोलायची. तिच्या आईवडिलांनीही खूप मदत केली. हे काही मी तिच्या मातृभाषेसाठी करतोय, असं नाही. पण हे मातृभाषेकरता करतोय, हाच इन्टिमेट महत्त्वाचा आहे... असे खूप चांगले अनुभव आले, किती किती म्हणून सांगू? आठवणींचं आभाळ अगदी भरून आलंय...

जन्म मराठी अस्मितेचा! (भाग 6)

मुलाखत- राधिका कुंटे.

"लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी..." या मराठी अभिमानगीताचे सूर उद्या ठाण्याच्या दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये अभिमानानं गुंजणार आहेत... असंख्य रसिकांच्या मनात निनादणार आहेत. मराठीला डाऊन मार्केट म्हणणाऱ्यांना संगीतकार-गायक कौशल इनामदार यांनी हे सडेतोड उत्तर दिलंय. अर्थात मराठीच्या अभिमानाचा हा प्रवास इथं संपणार नाही. ही तर केवळ नांदी आहे, मराठीप्रेमाची, मराठी अस्मितेची, मराठीच्या अस्तित्वाची... मग काय देणार ना साथ?...

---
अभिमानगीताच्या निमित्तानं "मराठी अस्मिता" या संस्थेचा जन्म झाला, त्याविषयी सांगा. या गीताच्या सीडीचा प्रकाशन समारंभ अगदी उद्यावर येऊन ठेपलाय. त्यामुळं आत्ता या क्षणी तुमच्या मनात कोणत्या भावना उमटताहेत...

- मराठी अभिमानगीताच्या निमित्तानं "मराठी अस्मिता" या संस्थेचा जन्म झाला. या संस्थेच्या आधारस्तंभांपैकी तीनजण आहेत माझे मित्र- उन्मेष जोशी, महेश वर्दे आणि मंदार गोगटे ! या तिघांनी मला या गीताच्या कामात अत्यंत मोलाची साथ दिली. त्यांची आणि आणखीनही इतर मित्रमंडळींची साथ मिळाली तर "मराठी अस्मिता"तर्फे आणखी खूप मोठे आणि भव्य असे प्रकल्प करण्याचं माझ्या मनात आहे. उदाहरणार्थ- चांगलं साहित्य, चांगलं काव्य पुढच्या पिढीपर्यंत अधिक परिणामकारक रितीनं पोहचवू शकता येईल. मराठी भाषेविषयी तरुण मनांत असणारा न्यूनगंड पूर्णपणं मिटवायचाय. मराठी डाऊनमार्केट भाषा वाटू नये, म्हणून खूप प्रयत्न करावे लागणार आहेत, ते आम्ही करणार आहोत. मनात आहे की खूप भव्य असे प्रकल्प मराठीसाठी करावेत, की ज्यामुळं जागतिक पातळीवर आपल्या भाषेचा उल्लेख होऊ शकेल. रहमान ऑस्करच्या स्टेजवर जाऊन तमीळमध्ये बोलला होता. आपण दादासाहेब फाळके यांच्या नावाच्या निमित्तानं भारतातर्फे आंतरराष्ट्रीय पातळीवरचे पुरस्कार द्यायला लागू, असं झालं पाहिजे. हॉलिवूडच्या कलावंतांना दादासाहेबांच्या नावानं पुरस्कार घेताना गौरव वाटायला हवा. याच भावी उपक्रमांपैकी एक म्हणून पुढल्या वर्षी मोठ्या प्रमाणावर संगीताचा भव्यदिव्य कार्यक्रम आयोजण्याचं मनात आहे. यात मराठी कलाकारांसोबत काही आंतरराष्ट्रीय स्तरांवरचे कलाकारही असतील. त्यात आंतरराष्ट्रीय स्तरावरील संस्था नि व्यक्तींचाही सहभाग असेल. मराठी लोकांनी मराठी चित्रपट काढून ते बहुभाषिक करता येतील, असे अनेक प्रकल्प सध्या मनात आकारत आहेत.
हे सगळं मी बोलतोय तरी आत्ता या क्षणी माझ्या मनातली खळबळ तुम्हांला कशी काय समजणार? असं म्हणतात ना की खरं शौर्य हे मृत्यूला सामोरं जायला लागत नाही तर आयुष्याला सामोरं जायला खरं शौर्य लागतं... आत्ता मला अगदी त्याचा प्रत्यय येतोय. कारण जे कठीण काम होतं ना ते झालंय. सव्वा वर्षात इतक्‍या सगळ्या लोकांना एकत्र करून, जणू काही एक लाख सदुसष्ट वेळा आपली भूमिका विविध लोकांसमोर सातत्यानं मांडण्याचा सगळा कठीण काळ उलटलाय. आता सगळं उंबऱ्यावर आलंय... जे आता फक्त ओलांडायचंय... या सव्वा वर्षात वाटत नव्हती एवढी भीती आता वाटतेय... हे सारं कसं होईल, सत्तावीस तारखेनंतर हे गाणं किती पसरेल... कारण आत्तापर्यंत कसं सगळं माझ्या हातात होतं, सगळं मीच करत होतो. आता गाणं पसरायचंय म्हटल्यावर ते माझ्या हातात राहणार नाही. ते आता महाराष्ट्रात... कदाचित जगात जाईल... सध्या माझ्या मनात कलावंत म्हणून नेहमीच सगळ्यांना वाटणारी धाकधूक राहायला आलेय. की मी केलेलं काम सगळ्यांना आवडेल का? त्याला मराठीप्रेमींकडून कसा प्रतिसाद मिळेल? वगैरे. सुरुवातीला मला असं वाटलं होतं की, ज्या दिवशी हे सगळं पूर्ण होईल, त्या दिवशी किती समाधान वाटेल. ते समाधान मला वाटत नाहीये. मला असं वाटतंय की ही आता सुरुवात आहे नि आणखीन बरंच काम राहिलेलं आहे. समजा आपण एखादा माहुलीचा डोंगर चढून गेलो की आपल्याला वाटतं की क्‍या बात हैं... आपण खूप काही मिळवलंय. पण आपण समोर बघतो तो आणखीन मोठा रायगड उभा असतो, तो सर केल्यावर दिसतं की यावरही आणखीन हिमालय आहेच... तसं माझं आत्ता होतंय की क्षेत्रफळ टप्प्यात आलंय, पण अजून बरंच अंतर पार करायचंय...
आयुष्यात पहिल्यांदा असं काहीतरी झालं असेल की वैयक्तिक आयुष्यात काहीतरी अचिव्ह करायचंय म्हणून मी हे केलेलं नाही. असं करण्यातली मौज खूप असते तशीच नि तेवढी जबाबदारीही जास्त असते. वैयक्तिकरित्या एखादं काम करायचं झालं नि त्यात यश किंवा अपयश आलं तर ते सगळं आपल्याला सोसायचं असतं किंव एन्जॉय करायचं असतं. इथं असं नाही होणार. इथं माझ्यासोबत खूप लोक जोडले गेलेत आणि हे सगळं पुढं न्यायचं असेल तर मला अजून उत्साहाची नि प्रोत्साहानाची गरज आहे. मला आता कळंतय की समनाजातल्या खूप मोठ्या व्यक्ती इतकी विनयशील का असतात. मोठ्या अचिव्हर्सना वाटत असणार ही तर अगदीच छोटी गोष्ट आहे. सव्वा वर्ष हा काही आयुष्यभरातला स्पॅनच नाहीये. याहीपेक्षा खूप मोठी कामगिरी करणारे लोक असतात. ते इतके विनयशील असतात... हा मला एक जमिनीवर आणणारा अनुभव होता. कारण माझ्या लक्षात आलंय की करायला अजून खूप काही आहे. लोक एखाद्या ध्येयासाठी आयुष्य वेचतात... मग सव्वा वर्ष काय आहे? त्यामुळं मला या सगळ्याची भीती वाटतेय.
हे सगळं आता पुढं जायला पाहिजे. ते इथवरच थांबून उपयोग नाही, असंही वाटू लागलंय. त्यामुळं विचार करता करता मला सई परांजपे यांच्या एका चित्रपटातल्या पात्राच्या तोंडीचं एक वाक्‍य आठवतंय की- "कलाकार की बैचैन आत्मा..." हा "बैचैन आत्मा" का असतो, ते मला आता कळतंय. अजूनही कितीतरी करण्याजोग्या गोष्टी बाकी आहे, हे कळंतय. त्यामुळं पुढं काय करता येईल, याचा विचार सुरू झालाय. आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषांत पंधराव्या क्रमांकावर असणारी मराठी भाषा केवळ कोषांत गुरफटून चालणार नाही, तर तिचं सामर्थ्य सगळ्यांना कळायला हवं. मराठी लहान आणि तरुण मुलांना मराठीची महती कळायला हवी. आपल्या मातीत राहून आपल्याला जग जिंकता येतं, हा आत्मविश्‍वास तरुण पिढीच्या मनात निर्माण होऊन आपल्या भाषेविषयी प्रेम आणि आत्मीयता निर्माण व्हायला हवी. असं झालं तर मग आपलं नि आपल्या भाषेचं भविष्य उज्ज्वलच आहे. भाषा समृद्ध झाली की संस्कृती समृद्ध होते. संस्कृती समृद्ध झाली की आपलं आयुष्य समृद्ध होतं कारण आपण आणखीन श्रीमंत होऊन जातो, आयुष्यातली रुची वाढते. हे सगळं व्हायचं असेल तर भाषा समृद्ध व्हायला हवी.
सुरुवातीला जे मला म्हणायचे की एका गाण्यानं काय होणार, त्याचं चुकतच होतं. पण आता वाटतं की, एका अर्थानं ते बरोबरही आहे. एका गाण्यापलिकडं जाऊन काहीतरी केलं पाहिजे, असा उद्देश कदीाचित त्यामागं असू शकतो. हे असं वाटणंही आणि त्याची सुरुवात या गाण्यापासून होणं, ही मराठीच्या चांगल्या भविष्याची जणू नांदी आहे. आधी एका मैदानात होणारा कार्यक्रम आता एका स्टेडियममध्ये होतोय.... लोकांचा प्रतिसाद वाढतोय... इथंच भाषेच्या कक्षा रुंदावतायत असं वाटतं... हे हिमालयाच्या यात्रेचं पहिलं पाऊल आहे. अजून शेकडो मैलांचं अंतर कापायचंय... त्यात तुमचीही साथ हवेय, नव्हे ती असेलच यात्री खात्री आहे... कारण "लाभले अम्हांस भाग्य बोलतो मराठी..."

Wednesday, April 28, 2010

.... माय मानतो मराठी ! (भाग 7)

- राधिका कुंटे.

इन्ट्रो- "लाभले अम्हांस भाग्य बोलतो मराठी..." हे "मराठी अभिमानगीता"चे शब्द आता अनेक "मराठी"प्रेमी
घरांत गुंजत आहेत. कविवर्य सुरेश भटांच्या शब्दांतली ताकद आणि "संगीत" या माध्यमाचा प्रभाव यामुळं "मराठी"प्रेम सगळ्यांपर्यंत अतिशय प्रेमानं आणि एक प्रकारच्या "संगीतमय गांधिगिरी"नं पोहचलंय. सवरशिलेदार कौशल इनामदार यांच्या या "मराठी बाण्या"ला काय प्रतिसाद मिळाला ते वाचूया.
---
अभिमानगीताच्या सीडीच्या प्रकाशनानंतर "मराठीप्रेमीं"कडून तुम्हांला कसा प्रतिसाद मिळाला?

रसिकांकडून आणि "मराठीप्रेमीं"कडून "मराठी अभिमानगीता"ला चांगला प्रतिसाद मिळाला. उदंड प्रतिसाद मिळेल असं वाटलं होतं. पण इतका उदंड प्रतिसाद मिळेल, असं वटलं नव्हतं. "स्टार माझा"नं यु ट्युबवर हे गाणं अपलोड केलं असून त्यावर आलेल्या प्रतिक्रिया अतिशय बोलक्‍या आहेत. खरंतर या गाण्यामुळं मला जो परिणाम अपेक्षित होता की- लोकांना "मराठी" असल्याचा अभिमान वाटावा, तो परिणाम दिसून येतोय. केवळ महाराष्ट्रातूनच नव्हे तर महाराष्ट्राबाहेरूनही या सीडीबद्दल विचारणा होतेय.
अपर्णा सुब्रमण्यम यांनी त्यांच्या ब्लॉगवर यु ट्युबची लिंक दिलेय आणि लिहिलंय की, "जे लोक महाराष्ट्रात राहतात पण त्यांची मातृभाषा वेगळी आहे, जशी माझी मातृभाषा तमीळ आहे, त्या लोकांचं त्यांच्या मातृभाषेवरचं प्रेम वाढणार आहे. माझंही तमीळवरचं प्रेम तीव्र झालंय. माझी आयडेंटिटी माझ्या लक्षात आलेय. त्याबद्दल मी या गीताचे आभार मानते." या गाण्याची लिंक तिनं अनेक दाक्षिणात्यांना फॉरवर्ड केलेय. चेन्नईतले संगीतकार टोनी जोसेफ यांनी मला इमेल केलाय की," हे काही फक्त मराठीचं गाणं नाहीये, तर ते अवघ्या भारताचं गाणं आहे." ज्येष्ठ छायाचित्रकार गौतम राजाध्यक्ष यांनी सांगितलं की, "संगीतातली अशी मोठी कामगिरी जगात घडलेली नाही." पंडित सत्यशील देशपांडे आणि पंडित सुरेश तळवळकर यांनी त्यांची प्रतिक्रिया दिली की, "या गाण्याचं सामाजिक मत्त्व एकीकडं आहेच, पण एक गाणं म्हणून ते त्यांना खूप आवडलं." संगीतातील या दिग्गजांची ही प्रतिक्रिया माझ्यासाठी मोलाची नि आनंददायी ठरली.
लोकांकडून विशेषत: मला तरुणांकडून मराठी प्रेमाची जी अपेका होती, त्यांच्याही अतिशय बोलक्‍या प्रतिक्रिया येत आहेत. "हे खूप चांगलं नि मोठं काम केलंत" असं कौतुक तर अनेकांनी केलंय. शिवाय "आत्ताच्या राजकीय परिस्थितीत भाषेबद्दल एक कडवटपणा आल्यानं ती संघर्षाची ठरतेय. खरंतर लोक जोडणं हे भाषेचं काम आहे. ते या गाण्यानं केलंय..." अशी बोलकी प्रतिक्रियाही काहीजणांनी मला दिली.
या गाण्याच्या सीडीच्या प्रकाशनाच्या दिवशी साऱ्याच मान्यवरांनी मला भरभरून आशीर्वाद दिलेत. ते मी नम्रपणं स्वीकारले. हा एवढा सगळा प्रवास केल्यावर आता असं वाटतं की श डोक्‍यात जात नाही, तर यशामुळं तुमच्यात एक विनम्रता आपोआप येते. यश कधीच एकट्याचं नसतं. त्यात अनेकजणांचा सहभाग असतो. म्हणूनच यश म्हणजे अनेक लोकांचं रसायन आहे, असं मला वाटतं नि आणखीनच विनम्र व्हायला होतं...
खरंतर हा सारा प्रतिसाद हेलावून टाकणारा होता. मला जो मराठीबाबतचा मुद्दा मांडायचा होता तो व्यवस्थित मांडला गेलाय. मराठी डाऊनमार्केट नाही उलट तिच्याआधारे एक विश्‍व उभं राहू शकतं, हेही लोकांना कळू लागलंय. भारत सगळ्यांचा, मुंबई सगळ्यांची तशीच मराठीही सगळ्यांची हा मुद्दा अतिशय चांगल्या तऱ्हेनं आणि प्रेमानं पोहचलाय. तो पोहचवण्याचं माध्यम होतं संगीत... म्हणूनच त्या संगीताचा मोठेपणा नि कविवर्य सुरेश भटांच्या शब्दांतली ताकद यामुळं हे माध्यम प्रभावी ठरलंय. ही एक प्रकारची "संगीतमय गांधिगिरी"च...

मराठी वृत्तवाहिन्यांचा जयजयकार!

हेमंत देसाई
आपले जीवन आज 24 x 7 वृत्तवाहिन्यांनी वेढून टाकले आहे. चित्रपटांचे, टीव्ही मालिकांचे एवढेच काय, राजकीय नेत्यांचे प्रमोशनही याच वाहिन्या प्रभावीपणे करतात. दुय्यमतिय्यम राजकीय कार्यकर्ते नेत्यांना आपण वाहिन्यांमध्ये चमकलो, तरच ज्येष्ठ नेते आपल्याकडे लक्ष देतील, असे वाटत असते. पाच वर्षांपूर्वी दूरचित्रवाणी वृत्तवाहिन्यांना वर्षाला 500 कोटी रुपयांच्या जाहिराती मिळत. आज हा आकडा 1500 कोटी रुपयांवर जाऊन पोचला आहे. एकूण वर्षाला 10 हजार कोटी रुपये कंपन्यामार्फत खर्चिले जातात. त्यातले 15 कोटी वृत्तवाहिन्यांवरील जाहिरातीकरिता वेचले जातात. साक्षरता, सुखसमृद्धीबरोबरच जनतेच्या आकांक्षा वाढत असल्याने लोक अधिकाधिक प्रमाणात या वाहिन्यांकडे खेचले जाणार यात शंका नाही.देशात 10 तरी राष्ट्रीय वृत्तवाहिन्या आहेत. स्थानिक व प्रादेशिक वाहिन्यांची तर गणतीच नको. हिंदीत आज तक, इंडिया टीव्ही, स्टार न्यूज, झी न्यूज, आयबीएन सेव्हन व एनडीटीव्ही इंडिया अशा प्राधान्यक्रमानुसार आघाडीवरच्या वाहिन्या आहेत. इंग्रजीत टाइम्स नाऊ, एनडीटीव्ही 25 x 7 व सीएनएन आयबीएन या अव्वल वाहिन्या आहेत. इंग्रजी बिझनेस वाहिन्यांत सीएनबीसी टीव्ही 18 अग्रेसर आहेत आणि त्यानंतर एनडीटीव्ही प्रॉफिट, ब्लूमबर्ग यूटीव्ही व ईटी नाऊ यांचा नंबर लागतो. हिंदीत सीएनबीसी आवाज पहिला व झी बिझनेस दुसरा. त्यांच्याशिवाय आहेच कोण?टेलिव्हिजन ऑडियन्स मेजरमेंट (टॅम)च्या प्रवक्‍त्याने दिलेल्या माहितीनुसार- प्रादेशिक वृत्तवाहिन्यांची भरधाव प्रगती सुरू आहे. त्यातही महाराष्ट्र, आंध्र, केरळ व प. बंगाल इथे ही प्रगती सर्वाधिक आहे. महाराष्ट्रात तर लोक हिंदी / इंग्रजीमधील राष्ट्रीय बातम्या बघतात आणि स्थानिक बातम्या मराठीतून ऐकणे पसंत करतात. म्हणजे मराठी भाषा नष्ट होत चालली आहे, असा टाहो फोडण्याचे कारण नाही.मुंबईत परप्रांतीयांची संख्या लक्षणीय आहे. हिंदी चित्रपट व हिंदी मालिकांचे हे प्रमुख निर्मिती केंद्र आहे. त्यामुळे या महानगरात हिंदी प्रचलित आहे. मराठी लोक, खासकरून तरुण पोरं-पोरी बोलताना हिंदीचा खूप वापर करतात. तरीदेखील टॅम मीडिया रिसर्च प्रा. लि.च्या पाहणीनुसार ऑक्‍टोबर 2009 मध्ये मराठी वाहिन्यांच्या प्रेक्षकांमध्ये 25 टक्के वाढ झाली. 2007 मध्ये 13 टक्केच वाढ झाली होती. राष्ट्रीय पातळीवर मराठी प्रादेशिक दूरचित्रवाणीची प्रेक्षकसंख्या 2.7 टक्‍क्‍यांवरून दोन टक्‍क्‍यांवर गेली आहे.2009 मध्ये हिंदी एंटरटेन्मेंट, दक्षिणी भाषिक वाहिन्या, हिंदी चित्रपट, तसेच मुलांच्या वाहिन्यानंतर लोकप्रियतेत नंबर लागला तो मराठी वृत्तवाहिन्यांचा. त्यानंतर हिंदी वाहिन्यांचा नंबर लागतो. 2006 मध्ये मराठी वृत्तवाहिन्यांची प्रेक्षकसंख्या जवळपास काहीच नव्हती; पण आता वाहिन्या वाढल्या आहेत.2007 मध्ये मराठीतील पहिली 24 तासांची वृत्तवाहिनी "झी'ने सुरू केली. त्यांनतर "स्टार माझा' व मग "आयबीएन लोकमत' आली. "ईटीव्ही' व "साम'ने मनोरंजन व बातम्या देण्याचा प्रयोग केला. मराठी वृत्तवाहिन्यांनी निवडणुकांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली. पूर्वी "सह्याद्री'ची मक्तेदारी होती. मग ई टीव्ही आला आणि त्यानंतर स्टार, तसेच आयबीएन लोकमत. लोकांना अधिकाधिक पर्याय हवे असतात.विशेष म्हणजे दुसऱ्या व तिसऱ्या स्तरातील नगरांमध्ये केबल व उपग्रह वाहिन्या असलेल्या घरांची संख्या दिवसेंदिवस फुगत चालली आहे. स्थानिक बातम्या पडद्यावरून पाहण्याची जनतेची भूक वाढत चालली आहे. प्रादेशिक बातम्या मराठीतून बघायला लोकांना आवडते.मध्यंतरी प्रसारमाध्यमातील काही भंपक लोक असे म्हणत होते, की म्हणे वाचक प्रेक्षकांना राजकारणात रस नाही. त्यामुळे आपण फक्त टेन्शन खल्लास करण्याच्या जमाडी जम्मत छाप बातम्या देऊ; पण हा युक्तिवाद पूर्णतः बोगस होता. राज्यात सहकारी कारखाने, बॅंका, दूध संघ, कृषी उत्पन्न बाजारपेठा यांचा ग्रामीण व निम्न ग्रामीण जीवनावर अजूनही पगडा आहे. ग्रामपंचायती, जिल्हा परिषदा, नगरपालिका यांचे महत्त्व कायम आहे. उलट जास्तीत जास्त जनतेस राजकीय व लोकशाही प्रक्रियेत सामील व्हायचे आहे. त्यामुळे त्यांना राजकीय घडामोडी व त्याबद्दलच्या बातम्यांत प्रचंड रस आहे. अण्णा, आबासाहेब, दादा, विलासराव, उद्धव, राज यांचे कार्यक्रम, त्यांची वक्तव्ये बघण्या-ऐकण्यात जनतेला रस आहे. त्यामुळेच लोक सर्व प्रकारच्या मराठी वृत्तवाहिन्या बघत आहेत. महाराष्ट्रात मराठी करमणूक, तसेच वृत्तवाहिन्यांनी म्हणूनच 21 टक्के ग्रॉस रेटिंग पॉइंटस्‌ मिळविले आहेत. मराठी लोक हिंदीपेक्षा मराठी वाहिन्या बघणे पसंत करतात, हे ऐकून फक्त राज ठाकरेंनाच नव्हे, तर तुम्हा-आम्हा सर्वांनाच आनंददायी वाटेल.भारतात किमान 18 भाषा आणि 1000 भर तरी बोली आहेत. त्यामुळे देशभर एकच एक वृत्तपत्र वाचले आणि एकच एक वाहिनी बघितली जाईल, हे संभवतच नाही. भारतात इंग्रजी जाणणाऱ्यांची संख्या वाढत असली तरी हे प्रमाण अद्याप मर्यादित आहे. त्यामुळे इंग्रजीतली वृत्तपत्रे लहान शहरांतही पूर्वीपेक्षा जास्त खपतात; पण तरी ही संख्या तसा मर्यादित आहे. उलट राजस्थान पत्रिका, भास्करसारखी दैनिके तुफान खपत आहेत. ही वृत्तपत्रे एकापेक्षा अधिक ठिकाणाहून प्रसिद्ध होतात आणि त्यांनी एक प्रकारे सर्व देशाचे लक्ष वेधून घेतले आहे. त्याचप्रमाणे बहुतेक राष्ट्रीय वाहिन्यांनी प्रादेशिक वाहिन्या चालू केल्या आहेत. स्टार नेटवर्कने बंगाली व मराठी वाहिन्या चालू केल्या. एनडी टीव्हीने चेन्नईत एनडी टीव्ही मेट्रोनेसन सुरू केली. सीएनएन आयबीएनने आयबीएन लोकमत सुरू केले. प्रादेशिक स्तरावरील कंपन्यांप्रमाणेच राष्ट्रीय वाहिन्यांच्या प्रादेशिक वाहिन्या यापुढचा टप्पा असेल तो प्रादेशिक भाषेतील लाईफस्टाईल, ट्रॅव्हल व बिझनेस चॅनेल्सचा, राष्ट्रीय वाहिन्यांनी भाषिक वाहिन्या चालू केल्यामुळे प्रादेशिक केंद्रांमधून होणारे राष्ट्रीय वाहिन्यांवरील कव्हरेजही वाढते. बातम्यांना अधिक खोली लाभते.मराठी करमणूक व वृत्तवाहिन्यांचा पसारा वाढला आहे. त्यामुळे या वाहिन्यांचा राष्ट्रीय वाहिन्यांवरील (म्हणजे मुख्यतः इंग्रजी, हिंदी) प्रभाव वाढू शकेल. केवळ दिल्ली व मुंबईतून उंटावरून शेळ्या हाकण्यापेक्षा यवतमाळ-अकोला, बीड-परभणी, धुळे-जळगाव, सावंतवाडी-रत्नागिरी किंवा सातारा-सांगलीतील घडामोडी तेथे जाऊन तपशिलात कव्हर करणे महत्त्वाचे आहे. तिथल्या अन्याय-अत्याचाराच्या बातम्या देशाच्या कानाकोपऱ्यात पोचू शकतात.मराठी वृत्तवाहिन्यांच्या विस्तारण्याच्या प्रभावामुळे महाराष्ट्राची सुख-दुःखे सर्वत्र पोचतात. आपले औदार्य व संकुचितपणा, इथली श्रीमंती व गरिबी, इथल्या आत्महत्या आणि बलात्कार, इथले आविष्कार स्वातंत्र्य व इथली सेन्सॉरशिप हे सारे देशवासीयांना मोठ्या प्रमाणात माहीत होऊ लागले आहे. वृत्तवाहिन्यांच्या यशामुळे मराठीपणाचा अभिमान वाटतोच; पण सामान्यजन व राजकीय-सामाजिक नेतृत्वात जबाबदारीची जाणीवही उत्पन्न व्हावी, ही अपेक्षा!-

जागतिक नकाशावर मराठीचं स्थान गौण ः वसंत आबाजी डहाके

संजय पाखोडे

आज जागतिक मराठी भाषा दिवस. आजच्या या जागतिकीकरणात मराठीचे स्थान काय, हा प्रश्‍न सर्वसामान्यांसह सर्वांनाच विचारावासा वाटतो. खरंच झपाट्यानं बदलत असलेल्या या जमान्यात जगाच्या पाठीवर मराठीचे स्थान आहे काय? या सर्व प्रश्‍नांची उत्तरे शोधण्याचा आम्ही प्रयत्न केलाय. महाराष्ट्रातील थोर विचारवंत आणि ज्येष्ठ समीक्षक वसंत आबाजी डहाके यांच्याशी आमचे प्रतिनिधी संजय पाखोडे यांनी मराठी भाषा या विषयावर केलेली ही खास बातचीत. वसंत आबाजी डहाके यांचे आतापर्यंत अनेक कविता संग्रह आणि समीक्षा ग्रंथ प्रकाशित झाले आहेत. त्यांच्या चित्रलिपी या काव्यसंग्रहाला नुकताच साहित्य अकादमीचा पुरस्कारही मिळाला आहे.
----प्रश्‍न ः आज जागतिक मराठी भाषा दिन आहे. अन्य भाषांच्या तुलनेत मराठी भाषेचं आज काय स्थान आहे?
वसंत आबाजी डहाके ः भारतीय भाषांमध्ये मराठी भाषेचं फार महत्त्वाचं स्थान आहे. इलेक्‍ट्रॉनिक माध्यमांच्या या युगात आज किती तरी मराठी वाहिन्या प्रसारित होत आहेत. मराठी चित्रपटांना चांगले दिवस आले आहेत. पूर्वी ज्या चित्रपटगृहांमध्ये फक्त हिंदी आणि इंग्रजी चित्रपट लागायचे, त्या ठिकाणी आता मराठी चित्रपट लागतात. कलात्मक आणि व्यावसायिकदृष्ट्या मराठी चित्रपट, मराठी मालिका यांना चांगले दिवस आले आहेत. थोडक्‍यात, मराठी भाषेचं महत्त्व आता पटायला लागलं आहे. ही भाषा महत्त्वाची आहे याची जाणीव लोकांना व्हायला लागली आहे. महाराष्ट्राविषयी विदेशी नागरिकांना कुतूहल निर्माण झालं आहे. गेल्या काही वर्षांत विदेशी संशोधक मराठीविषयी शोध घेण्याचा प्रयत्न करतोय. महाराष्ट्र आणि मराठी लोकसंस्कृती काय हे जाणून घेण्याची तळमळ विदेशी संशोधकांमध्ये आहे. त्यामुळे मराठी भाषेचं महत्त्व दिवसेंदिवस वाढतच आहे.
----प्रश्‍न ः मराठीविषयी सारखी चिंता असते, की काळाच्या ओघात ही भाषा नष्ट होईल काय? वाचनाचं प्रमाणसुद्धा कमी होत आहे.
वसंत आबाजी डहाके ः ही चिंता लोक उगाच करीत असतात. भाषिक वर्तमानपत्रांची संख्या जर आज बघितली, तर मराठी वर्तमानपत्रांचीच संख्या अधिक असल्याचं लक्षात येतं. महाराष्ट्रातील विविध वर्तमानपत्रांच्या जिल्हा आणि शहर आवृत्या बघितल्या, तर मराठीचा मोठा वाचकवर्ग आजही आहे. म्हणजे मराठी भाषा फक्त बोललीच जात नाही, तर मराठी भाषेचं वाचनाचं प्रमाणही सर्वाधिक आहे. आता मी सातारा, कोल्हापूर आणि गडहिंग्लज या भागात फिरलो. तेथील लोकांनी सांगितलं, की मराठी वाचनाची आवड आहे त्याहून अधिक वृद्धिंगत होत आहे. त्यांनी सांगितलं, की दोन दिवसांपूर्वी लागलेल्या एका पुस्तक प्रदर्शनातून दोन कोटी रुपयांच्या पुस्तकांची विक्री झाली. याचा अर्थ स्पष्ट आहे, की मराठी भाषेत प्रकाशित होणारं साहित्य वाचकांच्या पसंतीला उतरलं आहे आणि वाचकांच्या संख्येत वाढ झाली आहे. हा सर्व अनुभव बघितला, तर मराठी भाषा ही दुय्यम राहिलेली नाही. भारतीय भाषांमध्ये तिचं एक महत्त्वाचं स्थान निर्माण झालं आहे. दहा वर्षांपूर्वी विचारवंतांनी मराठी भाषेविषयी चिंता व्यक्त केली होती; ती परिस्थिती आता बदललेली आहे.
-----प्रश्‍न ः मराठी विषयातून पारंगत अभ्यासक्रम (एम.ए.) पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना भवितव्य नाही, असा विचार विद्यार्थ्यांमध्ये रुजत आहे.
वसंत आबाजी डहाके ः मराठी विषयातून एम. ए. करणाऱ्या विद्यार्थ्यांनी डोळ्यापुढे शिक्षक किंवा प्राध्यापक व्हायचंय हा विचार न ठेवता त्यांच्या शिक्षणाला व्यावसायिकतेची जोड द्यावी. वृत्तपत्रीय शिक्षणाची जोड देऊन मराठीतून प्रकाशित होणाऱ्या वृत्तपत्रांत साहित्यनिर्मिती अथवा जाहिरातीच्या माध्यमातून काही तरी नवं शिकावं, ज्याचा फायदा त्यांना निश्‍चितच मिळेल.
----प्रश्‍न ः आजच्या जागतिकीकरणाच्या युगात मराठी भाषेचं स्थान काय? इंग्रजीच्या तुलनेत मराठी भाषा स्पर्धेत टिकेल काय?
वसंत आबाजी डहाके ः इंग्रजी भाषेला आज जगात महत्त्वाचं स्थान आहे. ज्या देशांमध्ये इंग्रजी भाषा हद्दीबाहेर होती किंवा इंग्रजी भाषा बोलली जात नव्हती, अशा देशांमध्येसुद्धा इंग्रजी भाषेतूनच शिक्षण घेतलं जात आहे, ही वस्तुस्थिती आहे, कारण इंग्रजी भाषा ही आंतरराष्ट्रीय ज्ञान-विज्ञानाची आणि व्यापाराची भाषा झाली आहे. मराठीला इंग्रजीसारखं जागतिक पातळीवर न्यायचं असेल, तर मराठीचे स्थान आपल्याला जगाच्या पाठीवर निर्माण करावं लागेल. जगातल्या बहुतेक भाषांमधली साहित्यनिर्मिती आणि वाङ्‌मय इंग्रजी भाषेत उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे भारतीय भाषांमधील वाङ्‌मयाचंदेखील इंग्रजीत भाषांतर होऊन ते साहित्य इंग्रजीत उपलब्ध आहे; मात्र जागतिक आणि भारतीय भाषांमधील वाङ्‌मय मराठीत पाहिजे त्या प्रमाणात आलं नाही. त्याचप्रमाणे मराठी भाषेतील वाङ्‌मय आणि साहित्यनिर्मितीचं भाषांतर जागतिक आणि भारतीय भाषांमध्ये झालेलं नाही, त्यामुळे मराठी भाषा जागतिक स्तरावर पोहोचू शकत नाही. त्यामुळे आपल्या वाङ्‌मयातील श्रेष्ठत्व जागतिक स्तरावर कळू शकत नाही; मात्र मराठी भाषेतील साहित्यनिर्मितीचं जगातील सर्व भाषांमध्ये भाषांतर व्हायला पाहिजे. त्यामुळे जागतिक नकाशात मराठीचं स्थान गौण आहे ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही.
----प्रश्‍न ः मराठी भाषेवरून सध्या महाराष्ट्रात राजकीय वाद सुरू आहेत. मनसे किंवा शिवसेनेसारखे प्रादेशिक पक्ष आणि कॉंग्रेस, राष्ट्रवादी, समाजवादीसारखे राष्ट्रीय पक्ष मराठीच्या अस्मितेवरून राज्यात भांडतायत.
वसंत आबाजी डहाके ः जवळपास सर्वच राजकीय पक्षांनी मराठी भाषेला आपापल्या जाहीरनाम्यात महत्त्वाचं स्थान दिलं आहे. याचा अर्थ असा, की या सर्व राजकीय पक्षांना मराठीचं स्थान काय हे कळलं आहे. आतापर्यंत हा विषय अजेंड्यावर नव्हता; मात्र लोकांच्या दृष्टीनं हा विषय महत्त्वाचा झाला याची जाणीव सर्वच राजकीय पक्षांना झाली आहे. प्रत्यक्षात हे सर्व राजकीय पक्ष मराठी भाषेकरिता काय करणार हे काहीच स्पष्ट झालेलं नाही. याबद्दल त्यांची ठोस भूमिकाही जाहीर नाही, पण मराठी भाषा महत्त्वाची आहे, याची राजकीय पक्षांना जाणीव झाली हे निश्‍चित आहे. राजकीय लोकांनी भाषेकरिता काही करावं ही अपेक्षा चूकच आहे, कारण भाषेकरिता जे काही करायचं असतं ते अभ्यासकच करतात, परंतु राजकीय लोकांनीही मराठीकडे लक्ष देणं हे एक चांगलं लक्षण आहे.

महाविद्यालयातील मराठी

ऋतुजा सावंत
आजची पिढी ऐकणारी आहे, पाहणारी आहे, पण वाचणारी नाही. त्यामुळे आधीच इंग्रजी माध्यमातील शिक्षण आणि पाश्‍चात्त्य संस्कृतीचा प्रभाव यामुळे मराठी भाषेची सरमिसळ ही ओघाने होतेच. हिंदी आणि इंग्रजी मिश्रित मराठी महाविद्यालयीन विश्‍वात बोलले जाते. स्वच्छ आणि अस्खलित बोलणारा येथे अपवादानेच आढळतो. पण मराठमोळे सणही येथे तेवढ्याच उत्साहात साजरे केले जातात. म्हणजेच मराठी भाषेपेक्षा महाराष्ट्रीय संस्कृतीची आवड मुंबईतील महाविद्यालयांत दिसून येते.
---
सध्या होत असलेल्या मराठीच्या आंदोलनांमुळे मराठीची जागरूकता वाढली आहे. मोबाईलच्या स्क्रिनसेव्हरवर एखादी मराठी कविता ठेवण्यापासून प्रेमकवितांचे सुलेखन केलेले टी-शर्ट वापरण्याची फॅशन हे त्याचेच प्रतीक. तरुणांचे हे मराठी प्रेम यंदाच्या महोत्सवांदरम्यानही दिसून आले. साठ्ये, रुपारेल यांसारख्या महाविद्यालयांत महाराष्ट्राची संस्कृती जोपासण्याचा प्रयत्न केला होता. एल्फिन्स्टन महाविद्यालयाच्या आजी-माजी विद्यार्थ्यांच्या "पर्णिता' संस्थेतर्फेही महाराष्ट्र उत्सव रवींद्र नाट्य मंदिरात रंगला. तब्बल 86 महाविद्यालयांनी यामध्ये सहभाग घेतला होता. या साऱ्यामागे राजकीय प्रभाव मोठ्या प्रमाणावर जाणवतो. मराठीची आवड अनेकांना असली तरी आत्मियता असणारे थोडकेच आढळतात. भाषेसाठी महाविद्यालयातील मराठी वाङ्‌मय मंडळे प्रयत्नशील असतात. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा आणि मराठीचा त्यांना खऱ्या अर्थाने अभिमान वाटावा याकरिता विविध उपक्रम राबविले जातात. वक्तृत्व, प्रश्‍नमंजुषा, काव्यवाचन स्पर्धा अशा पारंपरिक स्पर्धांबरोबरच बदलत्या काळानुसार अनेक अभिनव कार्यक्रमही होतात. पण एकूणच आजूबाजूचा परिसर आणि शिकण्याचे, ऐकण्याचे साधन बहुतांशी अमराठी असल्याने मराठीच भाषा बोलण्याचा आग्रह अजूनही महाविद्यालयात होताना दिसत नाही. वाचन संस्कृतीही तितकीशी खोलवर रुजलेली नाही. अभ्यासाला नेमलेली पुस्तके आणि संदर्भाची पुस्तके सोडून अवांतर वाचणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी झाली आहे. संगणकाची स्क्रिन एका क्‍लिकसरशी माहितीचे विश्‍व साकारते. म्हणून वाचनालयात बसून तासनतास विविध पुस्तके संदर्भासाठी चाळण्यासही विद्यार्थी तयार नसतात. त्यामुळे चांगली भाषा कानावरही पडत नाही आणि वाचनातही येत नाही. म्हणूनच भाषेची सरमिसळ क्रमप्राप्त आहे. वाङ्‌मय मंडळाला मात्र महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळतो. केवळ मराठी विषय घेतलेलेच नव्हे तर इतर विषयांचे विद्यार्थीही या मंडळाशी संलग्न असतात. इंग्रजी वातावरणात स्वत:ला व्यक्त करण्याचे व्यासपीठ म्हणजे मराठी वाङ्‌मय मंडळ, अशी विद्यार्थ्यांची मानसिकता आहे. रुईया महाविद्यालयात चिपळूणकर व्याख्यानमाला, न. र. फाटक स्मृती व्याख्यानमाला, श्री. पु. भागवत व्याख्यानमाला अशा कार्यक्रमांची माहिती केवळ माहिती फलकावर वाचून विद्यार्थी कार्यक्रमांना गर्दी करतात. विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लागावी आणि वाचकदृष्टी अधिक व्यापक व्हावी याकरिता डी. जी. रुपारेल महाविद्यालयात पुस्तक परीक्षण मंडळ स्थापन करण्यात आले आहे. अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत विद्यार्थी एखाद्या पुस्तकाचे परीक्षण करतात. त्यावर चर्चा होते. तसेच मराठीची आधुनिक तंत्रज्ञानाशी सांगड घालून करिअरविषयक मार्गदर्शन करणाऱ्या अनेक कार्यशाळा येथे घेतल्या जातात. मराठी विषय घेऊन करिअरचे अनेक मार्ग त्यातून सुचविले जातात. या महाविद्यालयात साहित्याचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी भाषेचे खेळ घेतले जातात. मात्र हे प्रयोग केवळ विषय घेतलेल्या 40 ते 50 विद्यार्थ्यांपुरताच मर्यादित राहतात. खरंतर असे प्रयोग प्रथम वर्षापासून घेणे गरजेचे आहे. मात्र वेळेच्या मर्यादेमुळे ते शक्‍य होत नाही, अशी खंत काही मराठी प्राध्यापकांनी व्यक्त केली. के. जे. सोमेय्या महाविद्यालयात तर मराठी भाषा आणि वाङ्‌मय मंडळ आहे. भाषेशी संबंधित विविध उपक्रम येथे राबविले जातात. अनंत भावे, मंगेश पाडगावकर अशा दिग्गज साहित्यिकांनी मंडळाची धुरा आपल्या खांद्यावर घेतली होती. अनेक नवनवे प्रयोग या महाविद्यालयात केले जातात. उद्‌घाटन कार्यक्रमाला एखादी साहित्यविषयक संकल्पना घेऊन कार्यक्रम सादर करतात. विद्यार्थ्यांनी मराठीचा खराखुरा अभिमान बाळगावा यासाठी त्यांना मराठीच्या विविध विषयांवर माहिती गोळा करण्यास सांगितली जाते. या माहितीचे संपादन करून वर्षातून तीन वेळा "आशय' नावाचे हस्तलिखितही काढले जाते. हे हस्तलिखित संदर्भासाठी वाचनालयात असते. तसेच वर्षभरात 12 महाविद्यालयीन आणि 3 आंतरमहाविद्यालयीन स्पर्धा घेतल्या जातात. काळाच्या काहीशी मागे गेलेली कथाकथन स्पर्धाही होते. या उपक्रमांना विद्यार्थ्यांचा प्रतिसाद मिळत असला तरी ते उपक्रम खोलवर रुजताना दिसत नाहीत. त्याची कारणेही समर्पक आहेत. सरमिसळ मराठी भाषा उद्देशपूर्वक बोलली जात नाही. शिकण्याचे माध्यम इंग्रजी असल्याने ते शब्द आपल्या नकळत लक्षात राहतात आणि ओठांवर येतात. यात मराठीची मोडतोड करण्याचा अजिबात उद्देश नसतो. असे बोलण्यात गैर काहीच नाही, पण आपण बोलणाऱ्या इंग्रजी शब्दांचे मराठी शब्द माहीत असणे आवश्‍यक आहे, या मताचा एक तरुण वर्ग महाविद्यालयात आहे; तर अगदी शुद्ध आवर्जून मराठी बोलायला जमणारंच नाही. ते आजच्या जगात शक्‍यही नाही. तसं बोललं तर इतर जण टिंगलटवाळीही करतात. बदलत्या जगानुसार आपण पोशाखापासून राहणीमानापर्यंत सगळ्या गोष्टी बदलल्या, मग या साऱ्यात भाषेत बदल होणं स्वाभाविकच आहे, असे काही तरुणांचे म्हणणे आहे. महाविद्यालयीन तरुणांची मराठी भाषा बिघडण्यामागे आजूबाजूचे अमराठी वातावरण असले तरी मराठी अभ्यासक्रमातही बदल होणे गरजेचे आहे, असे काही प्राध्यापकांचे मत आहे. वर्षांनुवर्षे मराठीच्या अभ्यासक्रमाचे एकच स्वरूप आहे. कालानुरूप त्यात बदल केला तर विद्यार्थ्यांची मराठी भाषा सुधारण्यास नक्कीच मदत होईल. भाषिक कौशल्य वाढीस लागण्यासाठी अनुरूप अभ्यासक्रम तसेच बातमी, कार्यक्रमांचे स्क्रीप्ट लिहिण्याचे तंत्र अभ्यासक्रमात समाविष्ट करावे, अशी मागणी काही प्राध्यापकांनी विद्यापीठाकडे केली होती. मात्र त्यावर अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही. अभ्यासात या गोष्टी आल्या की विद्यार्थी त्या आपोआपच आत्मसात करतात, असे प्राध्यापकांनी सांगितले. उद्याचा नागरिक म्हणून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकडे पाहिले जाते. तो महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारा आहे. त्यामुळे त्याने महाराष्ट्राची मायबोली उत्तम आणि अस्खलित बोलणे गरजेचे आहे. त्यासाठी सर्वच स्तरांतून जोरादार प्रयत्न करायला हवेत. हा लढा सोपा नसला तरी अशक्‍य नाही. कारण मराठीची आवड या तरुणाईत आहे. आवडीचे रूपांतर आत्मियतेत करायचे आहे. मराठी भाषेसाठी विविध उपक्रम काही मूठभर विद्यार्थ्यांपुरता मर्यादित न राहता ते व्यापक प्रमाणावर राबविले पाहिजेत. विद्यापीठापासून प्रसारमाध्यमांपर्यंत साऱ्यांचाच सहभाग त्यासाठी महत्त्वाचा आहे.

मराठीचा जाहीरनामा

मराठी अभ्यास केंद्र
महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेच्या पन्नासाव्या वर्षापर्यंत मराठी भाषा, समाज आणि संस्कृतीपुढले बरेचसे प्रश्‍न सुटायला हवे होते; पण या जाहीरनाम्यातले अनेक मुद्दे पाहिलेत तर गेल्या पाच दशकांतली मराठीची हेळसांड लक्षात येईल.

महाराष्ट्राचा गेल्या पन्नास वर्षांचा इतिहास हा दुर्दैवाने मराठी भाषेच्या सार्वत्रिक उपेक्षेचा व अवहेलनेचा इतिहास आहे.आज महाराष्ट्रात मराठीच्या प्रश्‍नावर खूप बोललं जातंय. राजकीय पक्षांची त्यावर स्पर्धाही चालू आहे. 1 मे 1960 या दिवशी मराठी राज्य आलं अशी हाळी कै. यशवंतराव चव्हाण यांनी दिली. 1966 साली मराठी माणसांच्या न्याय्य हक्कांसाठी लढणारी शिवसेना जन्माला आली. त्यानंतर त्रेचाळीस वर्षांनीही परप्रांतीयांच्या लोंढ्यांपासून सर्व व्यवहार क्षेत्रातल्या मराठीच्या गळचेपीपासून ते सीमाप्रश्‍नापर्यंत अनेक समस्यांबाबत आजही चर्चा झडताहेत, आंदोलने होताहेत. याचा अर्थ काय होतो?

मराठी भाषा, समाज आणि संस्कृतीचे प्रश्‍न सोडविण्याचे जे मार्ग आपण वापरले त्यांचा पुनर्विचार करायला पाहिजे. प्रतिक्रियात्मक आणि प्रतीकात्मक आंदोलनाच्या जोडीने रचनात्मक आणि विधायक कामं व्हायला पाहिजेत, ही नवी भूमिका आम्ही मांडत आहोत. मराठी भाषा, समाज आणि संस्कृतीचं अर्थकारण आणि राजकारण यांच्या समग्र वेध घेणारं "मराठीकारण' ही आमची विचारसरणी आहे. जोवर या मराठीकारणाला अनुकूल पार्श्‍वभूमी निर्माण होत नाही, तोवर प्रचलित राजकीय पक्षांना मराठीसाठी भूमिका घ्यायला भाग पाडावं, असा आमचा प्रयत्न आहे; मात्र आज ना उद्या आम्ही अपेक्षिलेलं मराठीकारण महाराष्ट्रात उभं राहील, असा आम्हाला विश्‍वास आहे. अशा राजकीय पर्यायाच्या उभारणीची पाऊलवाट म्हणून आम्ही या जाहीरनाम्याकडे पाहतो.

जागतिकीकरणानंतर प्रादेशिक भाषा, संस्कृती यांच्या पुढे अस्तित्वाची आव्हानं उभी राहिली आहेत. मातृभाषेचा आग्रह धरणं अनेकांना प्रतिगामी वाटू लागलं आहे. दुसरीकडे राष्ट्रीय एकात्मतेबद्दल संवेदनशील असणाऱ्यांना प्रादेशिक भाषांचा आग्रह हे देशद्रोही आणि एकात्मता विरोधी वाटतं. भाषिक चळवळी, भाषिक राजकारण यांकडे पाहण्याची पारंपरिक दृष्टी बदलली पाहिजे, असे अभ्यास केंद्राला वाटतं. महाराष्ट्रात आजवर मराठी भाषा, समाज आणि संस्कृतीसाठी काम करणाऱ्या विविध संस्थांनी आणि चळवळींनी अराजकीय दृष्टिकोन स्वीकारलेला दिसतो; मात्र भाषिक चळवळ ही मूलतः राजकीय असली पाहिजे, अशी मराठी अभ्यास केंद्राची स्वच्छ भूमिका आहे. त्यामुळ राजकीय पक्षांशी सक्रिय संवाद ठेवणे अभ्यास केंद्राला आवश्‍यक वाटते. म्हणूनच आजवरच्या विविध आंदोलनांमध्ये राजकीय पक्ष, विद्यार्थी संघटना, पत्रकार संघटना यांना जोडून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे.

राज्याचे भाषाधोरण
1. भारतीय राज्य घटनेतील तरतुदींच्या आधीन राहून व महाराष्ट्र हे मराठी भाषिक राज्य आहे, हे लक्षात घेऊन राज्याचे अधिकृत भाषाधोरण जाहीर करावे. मराठी भाषेचा विकास हा महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाचा एक अविभाज्य व अनिवार्य घटक मानावा. समाजाच्या विविध व्यवहार क्षेत्रांतील तिचे अपेक्षित स्थान निश्‍चित करावे.
2. रस्ते, पाणी, वीज आदी भौतिक संसाधनांप्रमाणे राजभाषा मराठी हीदेखील एक सामाजिक संसाधन मानून तिच्या संवर्धनाची, सक्षमीकरणाची व व्यवस्थापनाची जबाबदारी प्रामुख्याने राज्य सरकारची आहे, अशी भूमिका स्वीकारणे. मराठीच्या विकासाबाबतचे राज्य सरकारचे दायित्व मान्य करणे व त्याबाबत राज्यातील जनतेला उत्तरदायी राहावे.
3. महाराष्ट्र हे विधिवत मराठी भाषिक राज्य असल्यामुळे धर्मनिरपेक्षतेप्रमाणे भाषानिरपेक्ष किंवा सर्वभाषासमभाव अशी भूमिका न ठेवता मराठीच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य द्यावे.
4. मराठीचा आग्रह हा केवळ भावनिक मुद्दा न मानता राज्याच्या विकासाचा अविभाज्य मुद्दा मानावा.
5. जगभरात अवलंबिल्या जाणाऱ्या सक्ती आणि संधी या दोन तत्त्वांचा अवलंब करून शासन आणि लोकसहभाग यांच्या माध्यमातून मराठी भाषेचे निरंतर संवर्धन करणे. मुंबईसह महाराष्ट्राच्या वर्धिष्णू मराठीकरणातून भारताच्या भाषिक व सांस्कृतिक विविधतेचे जतन व संवर्धन करणे.
6. प्रगत व्यवहार क्षेत्रांत भाषेचा विकास आपोआप होत नाही, तो जाणीवपूर्वक करावा लागतो. हे लक्षात घेऊन मराठी भाषेचा विकास हा राज्यातील मराठी व अमराठी भाषकांच्या दयाबुद्धीवर व सदसद्विवेकबुद्धीवर अवलंबून न ठेवता तो निरंतर होत राहील, यासाठी आर्थिक क्षेत्रात असते तशी स्थायी स्वरूपाची जबाबदार विकासयंत्रणा प्रस्थापित करावी.
7. राज्यात त्रिभाषा धोरणाऐवजी मराठी-इंग्रजी अशा द्विभाषा धोरणाचा स्वीकार व्हावा.
8. राज्यातील शिक्षणात मराठीसह इंग्रजी आणि इंग्रजीसह मराठी असे माध्यमविषयक द्विभाषा धोरण स्वीकारावे आणि काटेकोरपणे राबवावे. केवळ इंग्रजी (Only English) अशा भाषाधोरणाला परवानगी देऊ नये.
9. राज्य शासन आणि लोकसहभाग यांच्या माध्यमातून मराठी भाषेचा विकास कितपत होतो आहे, याचे प्रतिवर्षी तज्ज्ञांकरवी मूल्यमापन करणे. मनुष्यबळ विकास निर्देशांकाच्या धर्तीवर राज्याचा मराठी भाषा विकास निर्देशांक जाहीर करणे.
10. राज्याची द्वितीय भाषा म्हणून हिंदी, उर्दू अथवा इतर कोणत्याही भाषेला संपूर्ण राज्यात किंवा राज्याच्या एखाद्या भागात मान्यता देऊ नये.संघराज्य व्यवस्था व स्वायत्तता
11. केंद्र-राज्य संबंधीची पुनर्रचना करून राज्यांना व्यापक स्वायत्तता देण्याचे निकष ठरविण्यासाठी सरकारिया आयोगाच्या धर्तीवर नवीन आयोगाची स्थापना करण्यासाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा करावा.12. महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्‍नाच्या सोडवणुकीसाठी कालबद्ध कार्यक्रम आखावा. तोपर्यंत वादग्रस्त सीमाभाग केंद्रशासित म्हणून घोषित करावा.
13. मराठी भाषेच्या विकासासाठी राज्यभाषा मंत्रालयाची निर्मिती करावी. त्यासाठी स्वतंत्र केबिनेट मंत्री असावा. शासनाच्या भाषाविषयक सर्व यंत्रणा राजभाषा मंत्रालयाच्या अधीन असाव्यात.
14. केंद्र शासनाच्या नोकऱ्यांसाठी ठरवलेले अ, ब, क प्रभागांसंबंधीचे नियम व त्यात वेळोवेळी उत्तर भारतीयांच्या फायद्याच्या दृष्टीने केलेल्या सुधारणा या अयोग्य, स्वैर आणि कुठल्याही तर्कावर आधारित नाहीत. तसेच हे नियम महाराष्ट्राला तोट्याचे व जाचक आहेत. ते बदलण्यासाठी राज्य शासनाने केंद्र सरकारवर दबाव आणावा. आवश्‍यक तर न्यायालयात दाद मागावी.संस्थात्मक यंत्रणा आणि पायाभूत सुविधा
15. राज्य मराठी विकास संस्थेला 200 कोटी रुपयांचा बीज निधी देऊन मराठीच्या भाषाविषयक कामांसाठी सक्षम व प्राधिकृत करावे.
16. तमिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये ज्याप्रमाणे संबंधित भाषांची स्वतंत्र विद्यापीठे आहेत, त्याप्रमाणे महाराष्ट्रातही मराठी भाषा व संस्कृतीच्या अभ्यासासाठी व संशोधनासाठी मराठी विद्यापीठाची स्थापना करावी. महाराष्ट्राच्या विविध प्रांतातील मराठी बोलीभाषा व पोटभाषांना त्या प्रांतातील शिक्षणात व स्थानिक प्रशासन-व्यवहारात प्रमाण मराठीसोबत स्वायत्तता देण्याबाबत आराखडा तयार करण्याचे व त्याच्या अंमलबजावणीचे सर्वाधिकार या विद्यापीठाला द्यावेत.
17. राज्यातल्या सर्व शासकीय आणि खासगी आस्थापनांमध्ये सर्वसामान्य जनतेशी संबंधित सर्व व्यवहारात मराठीचा वापर व्हावा, यासाठी मराठी राजभाषा अधिकाऱ्यांची नेमणूक करावी.
18. विधिमंडळाच्या संयुक्त समितीने या सर्व आस्थापनांना भेटी देऊन तिथे मराठीतून कामकाज होत आहे की नाही, याचे कठोर परीक्षण करून कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी.
19. भाषा संचालनालय व इतर सर्व भाषाविषयक यंत्रणांच्या कार्यालयांचे संगणकीकरण करावे.
20. मुंबईसह महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठांमध्ये "महाराष्ट्र अध्ययन केंद्राची' स्थापना करण्यात यावी. त्यात महाराष्ट्राविषयी सर्व संशोधन मराठी व इंग्रजीतून करण्यात यावे, यासाठी विद्यापीठांतर्गत स्वतंत्र निधीची तरतूद करावी.
21. केंद्र सरकारच्या राष्ट्रीय अनुवाद आयोग (National Translation Mission) सारख्या प्रकल्पांमध्ये सहभागी अथवा राज्यपातळीवर स्वतंत्र अनुवाद महामंडळाची स्थापना करून इंग्रजी व इतर भाषांतील समग्र ज्ञान मराठीत आणावे. मराठीची ज्ञानभाषा म्हणून जडणघडण करण्यासाठी जगात प्रसिद्ध होणाऱ्या प्रत्येक वैज्ञानिक पुस्तकाचे, निबंधाचे मराठी रूपांतर करण्यासाठी या उपक्रमांद्वारे नियोजनबद्ध कार्यक्रम आखण्यासाठी कायमस्वरूपी आर्थिक तरतूद करावी. आधुनिक ज्ञान ही इंग्रजी भाषा जाणणाऱ्यांची मक्तेदारी होणार नाही, याकडे महाराष्ट्र शासनाने जाणीवपूर्वक लक्ष द्यावे व काळजी घ्यावी.नियोजनातून भाषाविकास
22. शिक्षण, प्रशासन, उद्योग, वाणिज्य, विधी व न्याय, विज्ञान व तंत्रज्ञान, जनसंपर्क माध्यमे आदी वेगवेगळ्या वापरक्षेत्रांत मराठी भाषेची सद्यःस्थिती काय आहे, याचा वस्तुनिष्ठ अहवाल तयार करून मराठी भाषेचा कालबद्ध व नियोजनबद्ध रीतीने विकास करावा.
23. लघु व मध्यम कालावधीचे उद्दिष्टलक्ष्यी कृतिआराखडे तयार करून ते राबवावेत. त्याचप्रमाणे गेल्या पंन्नास वर्षांचा भाषिक अनुशेष भरून काढण्यासाठी युद्धपातळीवर कार्यक्रम राबवावेत.
24. राज्याची भाषानियोजन यंत्रणा (Language Planning Agency) म्हणून "राज्य मराठी विकास संस्थे'ला प्राधिकृत करावे.
25. आगामी अर्थसंकल्पापासून भाषानियोजन व भाषाविकासासाठी वेगळी आर्थिक तरतूद करावी. राज्य नियोजन आयोगाने राज्याच्या आर्थिक नियोजनाचा आराखडा तयार करताना त्यात भाषानियोजनाचाही अंतर्भाव करावा.शासनव्यवहारात मराठी
26. लोकभाषेतून राज्य व्यवहार हे तत्त्व स्वीकारून राजभाषा मराठीतूनच राज्याचा सर्व प्रशासनिक व्यवहार केला जावा.
27. राज्य मंत्रिमंडळातल्या सर्व मंत्र्यांनी विधिमंडळात मराठीतूनच बोलावे.
28. शासकीय कामकाजात पूर्णपणे मराठींचा वापर व्हावा, यासाठी विधानसभा व विधान परिषदेच्या सदस्यांच्या संयुक्त समितीद्वारे तालुकास्तरापर्यंत तपासणी करावी.
29. महाराष्ट्र राजभाषा अधिनियम 1961 च्या तरतुदीनुसार वाहन चालविण्याचा परवाना मराठीतून द्यावा.
30 युनिकोड व मराठीतून ओपन सोर्स सॉफ्टवेअर आधारित "इ-गव्हर्नन्स' प्रणाली मराठीतून विकसित करावी. महाराष्ट्रातील जिल्ह्यांचे सर्व प्रशासकीय कामकाज संगणकावर आणण्यासाठी माहिती तंत्रज्ञान खात्यात स्वतंत्र कक्षाची स्थापना करावी.
31. शासनाच्या सर्व विभागांशी निगडित महत्त्वाचे अभिलेख, अहवाल, अर्थसंकल्प, अधिनियम, परिपत्रके, शासननिर्णय, स्थलवर्णनकोश व इतर शासकीय दस्तावेज माहिती युनिकोडच्या मराठीसह इंग्रजीत संग्रहित करण्यासाठी एका स्वतंत्र संकेतस्थळाची निर्मिती करावी. ही माहिती अद्ययावत ठेवून सर्वसामान्यांना उतरवून घेण्याची सोय या संकेतस्थळावर उपलब्ध करून द्यावी.
32. मुंबई व महाराष्ट्रातील दुकाने व आस्थापनांच्या पाट्या व फलक मराठीमध्ये लक्षवेधीपणे असाव्यात. या नियमांची काटेकोर अंमलबजावणी व्हावी व त्यांचे उल्लंघन करणाऱ्या दुकानांचे परवाने रद्द करून दंड ठोठावण्यात यावा.
33. राज्य शासनाच्या सेवेत असणाऱ्या कर्मचाऱ्यांचे व अधिकाऱ्यांचे मराठीत ज्ञान तपासण्याची यंत्रणा प्रस्थापित करावी. त्यासाठी भाषा संचालनालयामार्फत मराठी भाषेच्या परीक्षा घेतल्या जाव्यात. ठराविक मुदतीत परीक्षा उत्तीर्ण न होणाऱ्या कर्मचाऱ्यांची व अधिकाऱ्यांची वेतनश्रेणी, पदोन्नती रोखण्यात यावी.

"बिहाराष्ट्र'?

उ त्तर भारतीय तसेच बिहारींच्या आक्रमणाचा मराठी माणसानं किती धसका घेतला आहे, याचा मामला म्हणून इंटरनेटवरून सध्या फिरत असलेली ही गंमत. गंमत म्हणूनच घेण्यासाठी...बिटवा, ई है बंबई नगरिया, हमरे पूरखों ने कुछ साल पहले बडी होशियारी से इस मायानगरी को अपने कब्जे में किया... वैसे ई है बहुत नटखट...लेकिन जैसे कोई भैसन अच्छा दूध देती है, तो उसका सब नखरा हम संभलते है, वैसाही हम इसके लटके-झटके सह लेते है! अब तो ये पूरा "बिहाराष्ट्र' और बंबईया हमरी है... लेकिन कुछ साल पहले ये इलाका "महाराष्ट्र' के नाम से जाना जाता था... और बंबई को "मुंबई' बोलते थे... यहॉं मराठी लोक रहते थे! बहुतही गरीब जात! हमें उनकी जबान समझती नही थी, लेकिन वो खुदही हमरी भासा मे बात करते थे...हमरे पूरखो ने यहॉं बहुत सारी रेलगाडियॉं छोडी... हम गॉंव से बैंसन-बकरा सबकुछ लेकर गाडियॉं भरभरके आये... पूरी बंबई की बस्ती मे कब्जा किया... बहुत मजा आया!बिटवा, ई देखो दद्दरवा...मराठी लोगों का इलाखा माना जाता था उस टाइम....और ये बडा मैदान देख रहे हो? ई है "पाटलीपुत्र पारक'... अब सब अपना है... "बिहाराष्ट्र' के सब बडे नगर अब एकदम अपने जैसे हो गये है, बिटवा...यहॉं का दोन नंबर का सिटी है "छोटा पाटणा'! इसे पहले "पूना' बुलाया करते थे... ये है नया नालंदा...इसे पहले "नासिक' बोलते थे....और औरंगाबाद तो अपने यहॉं भी पहले से था... इसलिए अब इसे हम "दक्षिण औरंगाबाद' बुलाया करते है! सब जगह हमरा राज है...लेकिन बहुत संघर्ष करना पडा... लाठीयॉं खानी पडी... झगडे हुए... लेकिन मराठी लोग बहुत अच्छे थे! ज्यादा बवाल नही मचाया उन्होने...चूपचाप से हम सब लिए बैठ गये... अब कुछ थोडे ही मराठी लोग बचे है यहॉं.... छोटा-मोटा लिखाई-पढाई कर के पेट पाल लेते है... वैसे इस मराठी आदमी को पहचानना बहुत सिंपल है...जो दुसरे का चुल्हा जलाने के लिए खुद के घर को आग लगाता है, वो मराठी...

न्यायालयात मराठी कोसो दूर

नागरिकांना न्याय हा त्यांच्या स्थानिक भाषेत मिळायला हवा, असे म्हटले जात असले तरी न्यायालयीन पातळीवर मात्र अजूनही मराठी कोसो दूर आहे. गावपातळीवर राहणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना आपल्या दाव्यावर-याचिकेवर न्यायालयात काय चर्चा सुरू आहे, याची माहिती मिळायलाच हवी. कारण त्याच्यासाठी तो फक्त दावा नसतो तर जीवनातील एक महत्त्वाचा निर्णय ठरणार असतो. पण त्याची ही अपेक्षा पूर्ण होणे कठीण आहे. जिल्हास्तरावरील न्यायालयांमध्ये मराठी न्यायभाषा मान्यताप्राप्त असली आणि दंडाधिकारी न्यायालये, कुटुंब न्यायालय, औद्योगिक-कामगार न्यायालय व सत्र न्यायालयांमध्ये काही प्रमाणात मराठीत कामकाज होत असते. पोलिसांनी दाखल केलेली कागदपत्रे, तपास अहवाल, जमिनीची कागदपत्रे, दावे यांचे दस्तावेज मराठीतून असल्यामुळे आपोआप मराठीत कामकाज होते. त्याशिवाय अनेक वकील व न्यायाधीशही मराठीतून सुनावणी चालवीत असतात. पण सरसकट असे चित्र आढळून येत नाही. मराठी भाषेचा पुरेसा अभ्यास नसल्यामुळे अशा प्रकारे कामकाज चालविणे शक्‍य होत नसते. तसेच मराठी न्यायभाषा म्हणून मान्यताप्राप्त असली तरी न्यायालयात युक्तिवाद करणाऱ्या वकिलांना इंग्रजीमध्येच बाजू मांडणे अधिक सोईस्कर वाटते. त्यामुळे अशील जरी मराठी असला तरी त्याच्या दाव्यावर मराठीमध्येच सुनावणी होईल, अशी हमी देता येत नाही.मराठीप्रेमी संस्था मागील कित्येक वर्षांपासून मराठीला उच्च न्यायालयात प्रवेश मिळावा यासाठी प्रयत्नशील आहेत. मात्र उच्च न्यायालयातही मराठीच्या वापराबाबत मतभेद आहेत. सध्या जी कागदपत्रे मराठीमध्ये असतात त्यांचा इंग्रजी अनुवाद खंडपीठापुढे दाखल करावा लागतो. त्यानंतरच त्यावर सुनावणी होते. मराठीमधून कामकाज न चालविण्यामागचे एक कारण असेही सांगितले जाते, की न्यायालयीन कामकाजात वापरले जाणारे अनेक शब्द मराठीमध्ये अनुवादित करणे शक्‍य नसते. त्यामुळेही मराठीच्या वापराला नकार दिला जातो. उच्च न्यायालयाच्याच दोन खंडपीठाने मराठी कागदपत्रांच्या वापराबाबत दोन विभिन्न निर्णय दिले होते. तीन वर्षांपूर्वी वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रवेशासंबंधीच्या याचिकेमध्ये न्या. एफ. आय. रिबेलो व न्या. आर. एम. सावंत यांच्या खंडपीठाने, न्यायालयाची अधिकृत भाषा मराठी नसून इंग्रजी आहे, असा निर्वाळा दिला होता. त्यामुळे याचिकेला लावलेल्या मराठी कागदपत्रांचे नंतर इंग्रजीमध्ये भाषांतर करण्यात आले होते. मात्र मागील वर्षी न्या. एस. बी. म्हसे व न्या. डी. जी. कर्णिक यांच्या खंडपीठाने न्यायदान करताना स्थानिक भाषेला अधिक्रम द्यायला हवा, असा निर्णय दिला होता. या दोन भिन्न निर्णयामुळे सध्या मराठीतून कागदपत्रे दाखल करावीत की नाही याचा निर्णय देण्यासाठी पूर्णपीठाची नियुक्ती करण्यात आली आहे. तूर्तास तरी मराठी कागदपत्रांच्या उच्च न्यायालयातील प्रवेशाबाबत याचिका प्रलंबित आहे. त्यामुळे उच्च न्यायालयात मराठीतून सुनावणी कधीपासून सुरू होणार, या प्रश्‍नाचे उत्तर मराठी अजूनही न्यायालयाच्या परवानगीच्या प्रतीक्षेत आहे, असेच म्हणावे लागेल. त्यातल्या त्यात दिलासा देणारी बाब म्हणजे मंत्रालयामध्ये होणारा मराठी भाषेचा वापर. येथून निघणाऱ्या परिपत्रकांवर मराठी भाषेची मोहर असतेच; पण इंग्रजी भाषा अपरिहार्य असण्याच्या प्रस्तावामध्येही मराठी भाषेचे टिप्पण जोडलेले असते.

जरी आज ही राजभाषा नसे...!

इतिहासाचार्य राजवाड्यांनी जी "मुमुर्षू' होऊ घातली आहे, अशी भीती व्यक्त केली होती किंवा कुसुमाग्रजांनी हातात कटोरा घेऊन फाटक्‍या वस्त्रात मंत्रालयाच्या दारात उभी आहे असं म्हणत जिच्या दीनवाण्या अवस्थेचं वर्णन केलं होतं, त्याच मराठी भाषेसाठी "राज'कीय लढाया सुरू असल्या, तरी महाराष्ट्रातल्या प्रशासकीय व्यवहारात तिला मानाचे स्थान आहे का, याचं उत्तर दुर्दैवाने "नाही' असंच द्यावं लागत आहे.मराठी ही राजभाषा असल्याने मुंबई महापालिकेच्या कामकाजात याच भाषेचा वापर व्हावा करावा, असा ठराव मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीत आणि पालिकेच्या सभागृहात संमत झाला आहे. पालिकेचे कामकाज शंभर टक्के मराठी भाषेतून चालावे, असा ठराव झाला असूनही पालिकेतील आरोग्य, शिक्षण, करनिर्धारण आणि संकलन अशा विविध खात्याचे कामकाज सध्या इंग्रजी भाषेतूनच चालत आहे. अजूनही पालिकेचा कारभार शंभर टक्के मराठीतून चालत नाही. "सॅप' कार्यप्रणाली पालिकेत असल्यामुळे या कार्यप्रणालीचा कारभार पूर्णपणे इंग्रजीतून पाहिला जातो. प्रशासकीय अधिकारी बहुतांशी इंग्रजी भाषेचाच वापर करताना दिसतात. पालिकेतील सत्ताधारी शिवसेना-भाजप युतीने आस्थापनांवर मराठी फलक लावण्याची मोहीम उघडली होती. मराठी फलकावरून शिवसेना आणि मनसे यांच्यात श्रेयासाठी स्पर्धा सुरू झाली होती. महाराष्ट्र दुकाने आणि आस्थापना नियमानुसार आस्थापनांवर मराठीत फलक लावलेच पाहिजेत हे बंधनकारक आहे. तरीही या नियमांची अंमलबजावणी मात्र होत नव्हती. मात्र मनसे आणि शिवसेनेच्या दबावामुळे सर्वच आस्थापनांवर मराठी फलक झळकले आहेत. पालिकेतील प्रशासकीय अधिकारी आणि विविध वैधानिक समित्यांच्या अध्यक्षांच्या नावाच्या पाट्या मराठीतूनच लावण्यात आल्या असल्या तरीही मुखी मात्र आंग्लाळलेलीच भाषा असते. परिवहन खात्याला तर अगदी सुरुवातीपासूनच मराठी भाषेचे वावडे आहे. परिवहन आयुक्तांच्या कार्यालयातील बरेचसे काम इंग्रजी भाषेतून चालते. येथून निघणाऱ्या परिपत्रके, जाहीर नोटिसाही बहुतांशी इंग्रजी भाषेत असतात. त्यामुळे मराठीजनांची व अशिक्षित लोकांची चांगलीच अडचण होते. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळात मात्र मराठीचाच प्रामुख्याने वापर केला जातो. आपल्या भाषेत संवाद साधणाऱ्या महामंडळाची नाळ सामान्य माणसापर्यंत बहुधाम्हणूनच जोडली गेली आहे. रेल्वेमधला मराठी टक्का वाढावा म्हणून मनसेसारख्या पक्षाने तोडफोड आंदोलन केले असले, तरीही वरिष्ठ पदांवर काही मोजके अधिकारी वगळता अमराठी भाषिकांची मिरासदार होऊन बसली आहे. त्यामुळे रेल्वेतील मराठी ही केवळ स्थानकावरील उद्‌घोषणेपुरती सीमित राहिली आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या अर्थसंकल्पीय भाषणात रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी यांनी स्थानिक भाषेत रेल्वे भरती परीक्षा घेण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे परीक्षेसाठी का होईना; रेल्वेत मराठीचा शिरकाव होण्याची आशा आहे. रेल्वेची परिपत्रके, माहितीपत्रके इंग्रजी वा हिंदीतूनच असतात. माहितीदेखील हिंदी वा इंग्रजीतूनच मिळते. मुंबईकरांना शिस्त लागावी यासाठी दंडुक्‍याचा धाक देणाऱ्या पोलिस दलाकडून मराठी भाषाप्रेमाची कडवी शिस्त पाळली जात नाही. सरकारी कार्यालयांत मराठीचा वापर अनिवार्य झाला असला, तरी राज्य पोलिस दलाचे मुख्यालय आणि मुंबई पोलिस दलात काम करणारे बहुसंख्य आयपीएस अधिकारी मराठी भाषेचा आजही हातचे राखून वापर करताना दिसतात. सरकारी पत्रव्यवहारात मराठीचा सक्तीने वापर करण्याच्या निघालेल्या अध्यादेशाला वरिष्ठ अधिकाऱ्यांकडूनच हरताळ फासला जात असल्याचे चित्र आहे. मुंबई पोलिस दलात असलेल्या महाराष्ट्र केडरचे परप्रांतीय आयपीएस अधिकारी मराठीतून संभाषण करायला नेहमीच कचरताना दिसतात. प्रसिद्धिमाध्यमांशी बोलताना कित्येक बहुसंख्य अधिकारी इंग्रजी किंवा हिंदी भाषेचाच मोठ्या प्रमाणावर वापर करतात. तर, मराठी भाषा अवगत नसल्यामुळे कित्येक अधिकारी त्यांच्या कनिष्ठांकरवी वेळ मारून नेत असल्याचे चित्र सबंध पोलिस दलात आहे. "माय मराठी इज नॉट सो गुड' या शब्दांनी आपल्या ब्रिफिंगला सुरुवात करणारे आयपीएस अधिकारी मुंबई पोलिस दलात आहेत. महाराष्ट्रात कार्यरत असणाऱ्या अधिकाऱ्याला मराठी येणे सक्तीचे असले तरी ती शिकण्यात त्यांच्याकडून म्हणावा तेवढा रस दाखविला नसल्याचे चित्र आहे. मुंबई पोलिसांकडून काढली जाणारी प्रसिद्धिपत्रके देखील प्रामुख्याने इंग्रजी भाषेत छापली जातात. हीच स्थिती कुलाबा येथे असलेल्या राज्य पोलिस दलाचे मुख्यालयातही आहे. पोलिस दलात अतिशय जबाबदार पदावर असलेल्या या अधिकाऱ्यांकडून व्यवहारात मराठीचा वापर होणे कमी प्रतीचेच समजले जात असावे, अशी स्थिती आहे. प्रसंगी कित्येक अधिकारी व्यवहारात हिंदी भाषेचा उपयोग करतात. पोलिस मुख्यालयात झालेल्या कित्येक पत्रकार परिषदा फक्त इंग्रजी आणि हिंदी भाषेत होतात. हाताखाली असलेल्या मराठी पोलिस अधिकाऱ्यांना तुच्छतेची वागणूक देण्याचे प्रकारही काही वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडून घडत आहेत.अधिकाधिक मराठी भाषिकांशी संपर्क येणाऱ्या महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या मराठी वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्ध होणाऱ्या जाहिराती देखील इंग्रजीतून देण्यात येत असल्यामुळे काही महिन्यांपूर्वीच एका नागरिकाने आक्षेप घेतला होता. याची दखल घेऊन शासनाने म्हाडाला सर्व कारभार मराठीतूनच करायच्या सूचना केल्या; परंतु तरीही आजघडीला म्हाडाचा जास्तीत जास्त 60 टक्‍के कारभारच मराठी भाषेतून चालतो. द्वितीय व तृतीय श्रेणीतील कर्मचारी मराठीचा चांगला वापर करीत असले तरी अधिकाऱ्यांचे मात्र इंग्रजीवरच भारी प्रेम असल्याचे दिसून येते.मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण हे एक सरकारी कार्यालय असले, तरी तेथील वातावरण मात्र एकाद्या कॉर्पोरेट कंपनीसारखे आहे. शासकीय कार्यालयांमध्ये असे वातावरण खूपच कमी वेळा पाहायला मिळते. त्यामुळे या वातावरणानुरूप माणसे येथे वावरत असल्याने येथे मराठीचा वापर खूपच कमी प्रमाणात होतो. येथील चतुर्थश्रेणी कर्मचारी सोडता बहुतेक कर्मचारी बोलताना आणि कामात इंग्रजीचाच अधिक वापर करताना दिसतात.

Tuesday, April 27, 2010

मोडी लिपीच्या पुनरूज्जीनवासाठी!

प्रा. सोनिया राणे
मोडी वाचन म्हणजे इतिसाचा मागोवा आणि भविष्याचा कानोसा आहे. यादवकाल ते आंग्लकाल मोडी लिपीतील मजकूर लिहिणाऱ्यांची भाषा उर्दू, फारशी, इंग्रजीमिश्रीत मराठी असून ती बऱ्याच ठिकाणी अशुद्ध असली तरी ओजस्वी आहे. सरकारने मोडी अभ्यासक्रमात आणून अनेक अज्ञात दस्तऐवजांवर प्रकाश पाडून संशोधनाचे नवे दालन सुरू करावे.

स्वतःला शिवरायांचे पाईक मानणाऱ्यांनी शिवरायांची राजनीती, युद्धनीती व न्यायनीतीचा सखोल अभ्यास व चिंतन केले, तर खऱ्या अर्थाने पुन्हा एकदा मराठ्यांची सत्ता अटकेपार तर जाईलच, शिवाय आपापसातील यादवी संपुष्टात येऊन माणुसकीचा, सुसंस्कृत समाजाचा आदर्श निश्‍चितच समाजापुढे उभा करता येईल. आज शिवरायांची अशी असंख्य आज्ञापत्रे, हुकूमनामे, न्यायनिवाडे, मुद्रा, आपल्याला विविध प्रकारची माहिती देऊ शकतात; मात्र हे सर्व लिखाण, मोडी लिपीत असल्याने या लिपीच्या जाणकारांची आदर्श समाजउभारणीच्या कार्यासाठी गरज आहे. शिवरायांच्या चरित्राची, त्यांच्या कार्याची वस्तुनिष्ठ व निःपक्षपाती भूमिका जेव्हा समाजापुढे येईल तेव्हा आमच्या राज्यकर्त्यांना, विरोधी पक्षाच्या नेत्यांना आपल्यातील कुपमंडुक वृत्तीचे केवळ ज्ञान होऊन समाजविधायक कार्य पुन्हा उभे करता येईल.

मोडी वाचन म्हणजे इतिसाचा मागोवा आणि भविष्याचा कानोसा आहे. यादवकाल ते आंग्लकाल मोडी लिपीतील मजकूर लिहिणाऱ्यांची भाषा उर्दू, फारशी, इंग्रजीमिश्रीत मराठी असून ती बऱ्याच ठिकाणी अशुद्ध असली तरी ओजस्वी आहे.व्याकरणाच्या दृष्टीने हिचा तोंडवळा तिच्या वडीलबहिणीप्रमाणेच असावा यात आश्‍चर्य नाही आणि या अभयान्वये अव्ययाने वाक्‍यांचा प्रारंभ होणे, कर्त्यावाचून वाक्‍यरचना, क्रियापदावाचून वाक्‍य, तृतीयान्त कर्त्याचे वाक्‍य कर्तरी प्रयोगात समाप्त होणे, इ. भिन्न भिन्न प्रयोग या यादवकालीन कागदपत्रात आढळतात. त्या वेळी मराठी व्याकरणशास्त्राचे अस्तित्व नसल्याने याला भाषादोष म्हणता येईल की काय याची शंका वाटते. याच्या उलट इतिहासकालीन मराठी लेखनाचा हा विशेष समजणे योग्य होईल.शक्ती शक्ती म्हणतात ती काही केवळ अक्षरांच्या चित्रविचित्र आकृतीत नसते, तर तिचा वास त्या आकृत्यांचा लिपी म्हणून वापर करणाऱ्यांच्या मनात आणि मनगटात असावा लागतो. त्या जोरावरच यादवकालापासून सर्व पत्रव्यवहार मोडी लिपीतूनच चालत असे. यादवांचा प्रधान हेमांडपंत नावाचा एक विद्वान गृहस्थ होता. त्याने मोडी लिपीला अधिक चालना मिळवून दिली. त्यांची स्मृती या मोडी लिपीने जागृत ठेवली आहे.

शहाजीराजांच्या काळातील मोडी लिपीवर उर्दूचा व फारसीचा प्रभाव जाणवतो. मोडी लिपी ही अधिक विकसित झाली ती याच काळात. शिरोरेघ आखून कागदाच्या डाव्या टोकापासून उजव्या टोकापर्यंत हात न उचलता सलग आणि जलद लिहीत जाणे हे मोडीचे वैशिष्ट्य. या वैशिष्ट्यामुळे व्यक्तीनुसार मोडी अक्षर बदलत असे. शिवकाळात बाळाजी आवजी व पेशवेकाळात चिटणीसी मोडी देखणी व सुवाच्च होती.मोडी लिपी वाचणे, लिहिणे आले म्हणजे सर्व आले असे नसून त्यातील सौंदर्यस्थळांचा शोध आणि बोध त्रोटक स्वरूपाने घ्यावा लागतो. त्यासाठी-1. विविध कालगणना ः कालमापन करणे म्हणजे काल मोजणे. ऐतिहासिक कागदपत्रांतून विविध प्रकारच्या कालगणना किंवा सनावळ्या असतात. इंग्रजी किंवा मराठी कालगणना ज्याप्रमाणे आकड्यांतून मांडण्याची पद्धत आहे, तसा प्रकार जुन्या कागदपत्रांतून उल्लेखिलेल्या सुहूर किंवा अरबी समानसंबंधी नाही. तो सन शब्दात लिहीत. मोडी लिपीच्या जुन्या कागदपत्रांत इसवीसन किंवा जानेवारी, फेब्रुवारी वगैरे महिने नसतात. त्यांच्या जागी चैत्र, वैशाख इ. मराठी किंवा मोहरम, सफर इ. मुसलमानी महिन्यांची नावे आणि शालिवाहन शक, राज्याभिषेक शक किंवा सुहूर, फसली, जुलूस हिजरी सन इ. कालगणनेचे आकडे आढळतात.2. मायना ः ऐतिहासिक पत्रलेखन हे एक इतिहास अभ्यासाचे अव्वल दर्जाचे साधन आहे. पत्राच्या प्रारंभी लिहावयाचा मजकूर या अर्थाने हा शब्द वापरला जात आहे. पत्राच्या सुरुवातीला ज्याच्या त्याच्या योग्यतेप्रमाणे त्याला गौरवून लिहिण्याचा प्रघात होता. त्या व्यक्तीला असलेला सन्मान, त्या व्यक्तीचे खास वैशिष्ट्य, त्याला दिलेली पदवी अथवा त्याचे असलेले सामाजिक स्थान या गोष्टींचा विचार करून त्या व्यक्तीच्या नावापूर्वी जो मजकूर आपण पत्राच्या प्रारंभी लिहितो त्याला मायना असे म्हणतात.

पत्र कोणास कोणी लिहिले आहे, त्यावर मायना अवलंबून असतो. पत्र समाप्तीचा मायना हासुद्धा पत्रलेखक आणि वाचक यांचा सामाजिक दर्जा, वय, संबंध इ. वर अवलंबून असतो. मोडी लिपीतील पत्रांचे मायने डौलदार भाषाशैलीत आढळतात. उदा. स्वस्ती श्री राज्याभिषेक शक... क्षत्रिय कुलावतांत श्रीराजा शिवछत्रपती यांनी आज्ञा केली अैसी जे, श्रीमंत उत्तमगुण परिपूर्ण अखंडित लक्ष्मी प्रसन्न राजमान्य राजश्री गोसावी या मायन्यातून अर्थाचे सामान्यीकरण होऊन पत्रातील मजकुरालाही पुढे मायना हाच शब्द वापरला जाऊ लागला. या मायन्यात पत्रग्राहक वा प्रेषक आपला परिचय करून देत असे."हेमाडपंती मेस्तके' या स्वतंत्र प्रकरणात लेखनाचे मायने दिले आहेत. राज्य कारभारविषयक पत्रलेखन विशिष्ट नियमानुसार मोडी लिपीतच असे.3. रेघी मांडणी ः सातशे वर्षांपूर्वीचा माणूस ढोबळपणे बोलत असे. उदा. ती आळी हाळीच्या अंतरावर आहे. नजरेच्या टप्प्यात टेकाडी आहे. पुरुषभर उंचीएवढे पाणी आहे. बचकभर दाणे, चिमूटभर मीठ, दोन खग अंतर वगैरे, चलन, वजन, अंतर यासंबंधी मापन आणि परिमाणे अष्टमान पद्धतीची होती. वजन आणि मापी असाही प्रकार होता. या सर्वांची लिहिण्याची पद्धत मात्र रेघी मांडणीनुसारच केलेली आढळते. क्वचितप्रसंगी नुसत्या आकड्यातही लिहिलेली आढळते.अ. चलन (रकमा लिहिताना).... रुपये, पावल्या, आणे, पैसे किंवा पै.ब. धान्य, काष्ठ, तेल, तूप.... खंडी, मण, पायली, शेरक. सोने, रुपे, चांदी, केसर.... तोळे, मासे, वाल, गुंजाड. जमिनीची मोजणीसाठी.... चावर, बिघा, पांड, काठ्या, एकर, गुंठे, चौ. यार्डइ. कापड (वस्त्र मोजण्यासाठी).... वार, गज, तसू, अंगुळेई. अंतर मोजण्यासाठी.... योजन, कोस, मैल, दंडरेघी मांडणी करताना (6) अशी अळी काढतात. अळी म्हणजे रिक्त स्थान. ज्या वेळी रिक्त स्थान असते तेथे अळीचा उपयोग करतात. तरीसुद्धा तो कोठे कसा करावा हे अभ्यासानेच कळू शकेल.उदा. एक पैसा ते पावणे सोळा आणे असे आण्याच्या भाषेत बोलावे.4. शब्द संक्षेप योजना ः मोडी लिपी जलद लिखाणासाठी जशी लपेटीदार पद्धत वापरली जाते, त्याचप्रमाणे वारंवार वापरात येणारे शब्दसंक्षिप्त स्वरूपात लिहिण्याची वहिवाट आहे. शब्दसंक्षेप हा वाचकाला अत्यंत गोंधळात टाकणारा प्रकार आहे. त्याबाबत निश्‍चित असा कोणताही नियम नसल्यामुळे हे शब्दसंक्षेप तर्काने किंवा सततच्या अभ्यासाने माहिती करून घ्यावे लागतात.
गेली दहा वर्षे श्री. कृष्णाजी म्हात्रे हे माझे गुरू मोडी लिपीचा प्रचार व्हावा म्हणून मोडी वर्ग चालवत आहेत. या मोडी प्रसाराचे महर्षी कैलासवासी श्री. मनोहर जागुष्ठ्ये सरांचे कार्य म्हात्रे सरांनी अविरत सुरू ठेवले आहे. त्यांच्या कार्याची दखल घेऊन सुप्रसिद्ध इतिहासकार व मराठ्यांच्या इतिहासाची परंपरा सांगणारे पूजनीय बाबासाहेब पुरंदरे यांनीही म्हात्रे सरांच्या या कार्याची मनापासून दखल घेऊन म्हटले आहे "मराठी लेखणी पुन्हा पैठणी नेसू लागली आहे' (मोडी लिपीला त्यांनी पैठणीची उपमा दिली आहे) महाराष्ट्र सरस्वती नक्षत्रांच्या फुलांनी श्री. म्हात्रे यांची दृष्ट काढील यात शंका नाही.अशा या मोडी लिपीचे महत्त्व ओळखून भारतातील अग्रगण्य विद्यापीठ "यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ' यांनी नुकतेच आपल्या अभ्यासक्रमात मोडीला समाविष्ट करण्याचे ठरविले आहे. पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या लिपीचे पुनरुज्जीवन महाराष्ट्राच्या नवउभारणीचे शिल्पकार मानल्या जाणाऱ्या माजी मुख्यमंत्री कै. श्री. यशवंतराव चव्हाण यांच्याच विद्यापीठाने सुरू करून या विद्यापीठाच्या नावाला शोभेल असे कार्य करून दाखविले आहे. यासाठी नुकतेच कार्यभारातून मुक्त झालेल्या कुलगुरू डॉ. श्री. सुधीर गव्हाणे यांचे कौतुक करावे तेवढे कमीच म्हणावे लागेल. श्री. म्हात्रे सरांच्या अथक परिश्रमाचेच हे मूर्त स्वरूप मानावे लागेल.माझे सर्व विद्यापीठांना, शाळांना, महाराष्ट्र शिक्षण मंडळाला, राज्य सरकाराला हे नम्र निवेदन आहे, की त्यांनी मोडी ही अभ्यासक्रमात आणून अनेक अज्ञात दस्तऐवजांवर प्रकाश पाडून संशोधनाचे नवे दालन सुरू करावे. म्हणजे अशा संशोधनामुळे आदर्श असा इतिहास समाजापुढे येईल आणि त्यातून पुन्हा एकदा नवसमाजाची निर्मिती होईल यात तीळमात्र शंका नाही.-

कुठे गेले रेल्वेतले मराठी अनुवादक?

बापू लिमये
रेल्वे म्हणजे मुंबईची जीवनरेखा. ती चालवण्यासाठी मात्र जाणीवपूर्वक महाराष्ट्राबाहेरून "मनुष्यबळ' आयात केलं जातं ही मराठी माणसाची खंत आहे. या जखमेवर मीठ चोळणारी आणखी एक बाब म्हणजे गेली अनेक वर्षे रेल्वेत मराठी अनुवादकाचं पद अस्तित्वात असूनही भरलंच गेलेलं नाही. त्याबद्दल सांगत आहेत बापू लिमये. त्यांनी मध्य रेल्वेच्या महाप्रबंधक कार्यालयात, राजभाषा विभागात आधी मराठी अधीक्षक म्हणून नंतर हिंदी अधीक्षक म्हणून 1960 पासून काम केले आहे. त्यांच्या निवृत्तीपूर्वीच मराठी अधीक्षकाचं पद हिंदी अधीक्षक म्हणून वळतं केलं गेलं. याउलट दक्षिण रेल्वेत आजही तमीळ, तेलगू, मल्याळम आणि कन्नड भाषिक अनुवादक कार्यरत आहेत. मग मराठी भाषेवरच हा अन्याय का? त्यानंतर मराठी माणसाच्या मुंबईत असलेल्या रेल्वेत मराठी अनुवादकाचे पद कधीच भरले गेले नाही. वाचा बापू लिमये यांची खंत...

स्वातंत्र्यपूर्व काळात जीआयपी रेल्वे आणि बीबीसीआय रेल्वे अस्तित्वात होती. स्वातंत्र्यनंतरच्या काळात मध्य रेल्वे विभागली गेली असली तरी पश्‍चिम रेल्वेत कोणताही बदल झालेला नाही. जीआयपी रेल्वे मुंबई -झाशी, मुंबई -नागपूर, मुंबई- जबलपूर व्हाया इटारसी आणि दक्षिणेकडे पुण्यापर्यंत होती. त्याचे मुख्य केंद्र मुंबई होते. मध्य रेल्वेच्या पुणे, भुसावळ, बिलासपूर, जबलपूर आणि झाशी या पाचही विभागात एकूण अडीच लाख कर्मचारी असून त्यापैकी 70 टक्‍के मराठी भाषिक कर्मचारी होते. मध्य रेल्वेचे जनरल मॅनेजर पुसाळकर हेसुद्धा मराठीच होते. आणि ते मराठी भाषेचे आग्रही होते. रेल्वेच्या बहुसंख्य कर्मचारी आणि प्रवाशांच्या तक्रारी मराठी भाषेतूनच येत असत; त्याना त्यांच्याच भाषेत उत्तरे दिले जात होते. मध्य रेल्वेत गुजराती, हिंदी, उर्दू, मराठी या चारही भाषेत पत्रव्यवहार स्वीकारला जात होता. तसा पश्‍चिम रेल्वेतही होता. इंग्रजांना स्थानिक भाषेत काम करणे त्यावेळीही आवश्‍यक वाटले. मात्र आता प्रशासनाच्या उदासीनतेमुळे मराठीला उतरती कळा लागली आहे.
रेल्वे खात्यातील बारीकसारीक तांत्रिक नियम व नियमावली (जनरलस रूल्स ऍण्ड सबसिडरीज)म्हणजेच रेल्वेची गीता. ही गीता सर्वसामान्य रेल्वे कर्मचाऱ्यांना वाचता यावी यासाठी त्याचे स्थानिक भाषेत अनुवादन होणे आवश्‍यक होते. यासाठी 1960 मध्ये रेल्वे प्रशासनाने स्थानिक भाषिक अनुवादकांची जाहिरात देत अनुवादक पदे भरण्यात आली. त्यानुसार मराठी, गुजराती, उर्दू, हिंदी, तमीळ, तेलगू, मल्याळम, कन्नड भाषिक अनुवादक पदे त्या त्या ठिकाणी भरली. यावेळी मध्य रेल्वेसाठी मराठी-हिंदी-इंग्रजी भाषिक अनुवादक म्हणून मराठी अनुवादकांची पदे भरली. या अनुवादकांनी 450 पानांची नियमावली मराठी आणि हिंदी भाषेत अनुवादित केली. उत्तर प्रदेश, बिहार येथून व्यापाऱ्यांच्या उर्दूमधून येणाऱ्या पत्रांचे इंग्रजीत अनुवादन करणे आणि त्याचे उत्तर हिंदीतून पाठविण्यासाठी हे अनुवादक काम करत होते. त्याकाळात महाराष्ट्र अन्य प्रातांपेक्षा जास्त सुशिक्षित असून त्यातील बहुतेक लोकांना इंग्रजीचे ज्ञान होते. यामुळे अनुवादक महाराष्ट्रातूनच भरले गेले. पश्‍चिम रेल्वेकडून गुजराती अनुवादक, दक्षिण मध्य रेल्वेकडे तेलगू व कन्नड अनुवादक आणि तमीळ आणि मल्याळम अनुवादक दक्षिण रेल्वेकडून भरले गेले.
भारतीय राज्य घटनेत इंग्रजी व हिंदी भाषा या संपर्क भाषा असून प्रांतीय 16 भाषा या राजभाषा म्हणून गणल्या गेल्या आहेत. मात्र याची राज्यकर्त्यांना किंवा प्रशासनाला कल्पनाही नसल्यामुळे किंवा मराठीच्या उदासीनतेमुळे स्थानिक भाषांऐवजी हिंदी ही राजभाषा मानली गेली. मात्र तरीही महाराष्ट्र शासनाने त्याला जराही विरोध केला नाही. किंबहूना त्यावेळच्या राज्यकर्त्यांच्याही लक्षात ही गोष्ट आली नाही. यामुळे हिंदीला राजभाषेचा दर्जा देत मराठी, उर्दू, गुजराती अनुवादक हळूहळू बंद करत त्याजागी केवळ हिंदी अनुवादक भरले जाऊ लागले. आणि काही लोकांनी विरोध केला असला तरीही जुने भाषिक विभाग बंद होत गेले आणि 1971 मध्ये मराठी भाषिक अनुवादकांना हिंदी भाषिक अनुवादक म्हणून गणले जाऊ लागले. कारण तोपर्यंत रेल्वेचे सर्व व्यवहार हे हिंदी आणि इंग्रजीतून होऊ लागले होते. रेल्वेच्या प्रत्येक कर्मचाऱ्याला प्रवेश, परिचय आणि प्राज्ञ या तीन प्रशासनिक परीक्षा देणे बंधनकारक केले गेले. या हिंदीच्या तीनही परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्यास वेतनवाढ दिली जायची; मात्र ही परीक्षा नापास होणाऱ्या अधिकारी किंवा कर्मचाऱ्याचे एक वर्षाचे वेतन रोखले जात असे. कार्यालयीन वेळेतच एक तास प्रशिक्षण वर्ग घेतले जायचे. शिकवणी आणि परीक्षा कार्यालयीन वेळेतच व्हायची त्यानंतर टंकलेखन प्रशिक्षण आणि परीक्षा पद्धतीही रुढ करण्यात आली. 1978 मध्ये केंद्रीय मंत्री मधु दंडवते यांनी मराठीची बाजू घेत मध्य रेल्वेचा एक टंकलेखक दिल्लीतील मंत्रालयात नेत जनतेच्या दाव्यांना आणि तक्रारींना मराठीतून उत्तरे देण्याचा पायंडा सुरू केला. मात्र मराठी लोकांची बदललेली मानसिकता आणि इंग्रजीचा वारेमाप वापर यामुळे मराठीचा वापर हळूहळू बंद होत गेला.आज रेल्वेच्या जाहिराती हिंदी किंवा इंग्रजीतून इतर भाषेत अनुवादीत कराव्या लागताना लाखो रुपये मोजावे लागतात. मात्र तरीसुद्धा त्या शुद्ध मराठीत अनुवादीत होतातच असे नाही. जर त्या ठिकाणी मराठी अनुवादक असेल तर हा रेल्वेचा लाखोचा खर्च वाचू शकतो. रेल्वे फलाटांची नावे आणि अधिकाऱ्यांचे नामफलक तयार करणारा मराठी असला तरीही अनुवादक हिंदी असल्यामुळे बऱ्याच नावांमध्ये गोंधळ घातला जात आहे. उदा. ळ चा ल--- -महाराष्ट्र शासनाने नुकत्याच जाहीर केलेल्या सांस्कृतिक धोरणाच्या मसुद्यात केंद्रीय आस्थापनेत मराठी अधिकाऱ्याची नेमणूक व मराठीचा वापर करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. मात्र मराठी अधिकारी त्या पदावर गेल्यानंतर मराठीतून लिहिणार आहे का? -महाराष्ट्र सरकारच्या अधिकाऱ्याला मराठीच्या परीक्षा द्याव्या लागतात. तशाच महाराष्ट्रात नोकरी करणाऱ्या रेल्वेच्या अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना मराठीतून परीक्षा देणे बंधनकारक असावे.-हिंदी आणि इंग्रजीतून होणारे रेल्वेचे रिझर्व्हेशन मराठीतूनही करण्यात यावे. शासनाच्या धोरणानुसार केवळ मराठी अधिकारी न भरता त्यांच्या शिक्षणाची व्यवस्था करावी. त्यांनाही मराठीतून परीक्षा देणे बंधनकारक असावे. कारण आजच्या रेल्वे प्रशासनात दहावीला मराठी विषय न घेतलेले अनेकजण आहेत. -हिंदीचे प्रशिक्षण जसे कार्यालयीन वेळेत दिले जाते तसे इतर भाषिकांसाठी मराठीचेही प्रशिक्षण दिले जावे.-तमीळ, तेलगू, मल्याळम आणि कन्नड विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांप्रमाणेच मराठी भाषिकांना प्रशिक्षण द्यावे. यासाठी प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची शिक्षक म्हणून नियुक्‍ती करावी. -सुरुवातीला असलेल्या अनुवादकांनी रेल्वेचे सर्व नियम मराठीत अनुवादित केलेले असले तरी त्यानंतरच्या काळात आलेले नवे नियम अनुवादित झाले नसल्यामुळे ही मराठीतील नियमावली अपूर्णच आहे. -इंग्रजांनाही स्थानिक अनुवादक भरण्याची कल्पना सुचू शकते मात्र मराठी प्रशासनाची उदासीनता मराठी माणसांवर अन्याय करत आहे. यासाठी राज्यकर्त्यांवर विसंबून न राहता सामान्य माणसांनीच मराठीतून कृती करावी आणि मराठीतूनच उत्तराचा आग्रह धरला जावा. जेणेकरून प्रशासनाला मराठी अनुवादकपद भरण्याचा सुज्ञपणा सुचू शकेल. -हिंदी राजभाषा विभाग असतानाही रेल्वेचे संपूर्ण व्यवहार हिंदीतून चालतातच असे नाही.-नव्या विभागणीनुसार मध्य रेल्वे नागपूर, भुसावळ, पुणे, मुुंबई या चार विभागात विभागली गेली असल्यामुळे मध्य रेल्वेचे क्षेत्र आणखी आकुंचित झाले आहे. यासाठी महाराष्ट्र शासनानेसुद्धा रेल्वे प्रशासनाशी मराठीतून व्यवहार करण्यास सुरुवात करावी व तसाच प्रतिसाद अपेक्षावा.
--- (शब्दांकन- राजलक्ष्मी पुजारी)

गंमत "क'ची आणि "प'ची!

मराठी भाषेची ताकद खालील 2 लेखात पाहा. प्रत्येक शब्द "क' आणि "प' पासून सुरू करून एवढा मोठा परिच्छेद लिहिला आहे. जगातल्या कोणत्या इतर भाषेत अशी ताकद असेल?

के व्हातरी कोल्हापूरच्या कर्तव्यतत्पर केळकर काकांबद्दल काकांच्याच कचेरीतल्या केशवने काकूंसमोर कागाळी केली. काकू कावल्या. काकूंनी कपाटातून कात्री काढून काकांच्या कामाचे कोरे करकरीत कागद कचाकचा कापले. काकांचे कापलेले कागद केशवानेच कचऱ्यात कोंबून काकांच्याच किचनमध्ये "कजरारे-कजरारे' कवितेवर कोळीनृत्य केले. काकूंनी कागद कापल्याचे कळताच काका कळवळले. काकांनीही कमालच केली. काकांनी काकूंचे काळे कुळकुळीत केस कात्रीने कराकरा कापले. काका काय करताहेत काकूंना कळेनाच! काकूंनी कर्कश्‍श किंचाळून कलकलाट केला.काका काकूंची कसली काळीज करणार! काकांना कामाची काळजी. काकूंच्या कर्णकर्कश्‍श कोलाहलातही, केशवाने कचऱ्यात कोंबलेले कागदाचे कपटेन्‌ कपटे काढून काकांनी कचेरीकडे कूच केले. कचेरीच्या कामासाठी काकांनी कंबर कसली. कागदाच्या कापलेल्या कपट्यांचे काकांनी "कोलाज' करून कामकाज कार्यान्वित केले. केशवाचे कारनामे कळताच काकांनी काट्यानेच काटा काढला. काकांनी केशवालाच कोलाजचे काम करण्यासाठी कुथवला. कपटी केशवने काकांवरच कामचुकारपणाचा कांगावा करून कामाचा कंटाळा केला. काकांनी कठोरपणे केशवाला कामावरून काढले. कासावीस काकूंनी कालच्या कडू कारल्याची कोशिंबीर कटाप करून काकांसाठी कच्च्या कैरीची कोय काढून कालवण केले. काकांनीही करुणेने काकूंचे कृत्रिम केस कुरवाळले. केळकरांच्या कोकणस्थ कुटुंबात कर्तव्यापुढे कर्मकांड केव्हाही कनिष्ठच. कर्तव्यदक्ष काकांच्या कार्यकाळात कचेरीने कर्मरूपी किल्ल्याचे कीर्तिशिखर काबीज केले. कामावरून काढलेल्या केशवाने कितीतरी काबाडकष्ट काढल्यावर कोल्हापूरच्या कॉम्रेड कणेकर कॉलेजने केशवाला कबड्डीचा कर्णधार केला. क्रीडापटू केशवाने कबड्डीतच करियर केले. कालच्या कागाळीखोर केशवाला काळानेच केला कबड्डीतल्या किचकट कसरतींचा कर्ता!

कथासार
क्रियेविण करिता कथन, किंवा कोरडेची कीर्तन.कितीक किताब कष्टाविण, काय कामाचे...

परवा पुराण-प्रसिद्ध पखवाज पंडित पुरोहित पंतांची पिवळी पगडी पुरंदरच्या पंधराशेव्या पायरीवरून पुण्यात पर्वतीच्या पाचव्या पायरीपाशी पर्णकुटीपासून पंधरा पावलांवर पहुडलेल्या पंकजच्या पोटावर पटकन पडली. पगडी पडलेली पाहताच पंत पुरंदरच्या पायथ्याशी पोलिसठाण्यात पळाले. पुरंदरच्या पोलिसांनी पंतांना पुण्याच्या पोलिसांकडे पाठवले.पंत पुण्यात पोहोचताच पोलिसांवर पेटले. पंत पेटल्यामुळे पोलिस पटकन पर्वतीकडे पळाले. पांढऱ्या पोषाखातल्या पोलिसांना पाहून पंकज पर्वतीच्या पलीकडे पळाला. पोलिसांनी पंकजचा पिच्छा पुरवला.पळता पळता पंकज पाण्याच्या पॉंडमध्ये पडला. पंतांनीच पाण्यात पोहून पंकजला पकडले. पिवळी पगडीपण पकडली. पोलिसांनी पंकजला पोलिसठाण्याकडे पिटाळले. पकडणारा पोलिस पदपथावर पाय पसरून पडला. पोलिस पडलेला पाहून पंकज पाठीवर पांघरूण पांघरून पळाला.पंतांनी पुरंदरला पोहोचताच पगडीत पंकजचे पैशांचे पाकीट पाहिले. पाकिटातले पुष्कळ पैसे पंतांनी पनवेलला पुत्राला पोस्टाने पाठवले. पंतांच्या पाजी पुत्राने पैशांच्या प्राप्तीतून पोटात पंजाबी पदार्थ पचवले.पंतांना परमेश्‍वरच पावला!पंकजला पकडण्यासाठी पंतांसोबत पुण्यात पोहोचलेली पंतांची पोरगी प्राची पंकजला पहिल्यांदा पाहताच पंकजच्या प्रेमात पडली. प्राचीने पंकज, पोलिसांची पकडापकडी पाहिली. पंकजचा पदपथावरून पोबाराही पाहिला. पानशेतच्या पुराच्या पाण्यामुळे पुनर्वसित पंकज परत पर्णकुटीत पोहोचला.पित्यासमवेत प्राची पुरंदरला परतली; पण पंतांनी पंकजच्या पाकिटातल्या पैशांबाबत पंक्ति-प्रपंच पाळला. पुष्कळ पैसे पुत्राला पाठवले. पंतांच्या पुन्हा पुन्हा पिडणाऱ्या पुराणांच्या पोपटपंचीमुळे प्राची पेटली.पंकजच्या प्रेमाखातर प्राची पुण्यास परतली. प्राचीनेच पंकजवरच्या पोलिसांच्या पंचनाम्याला पाने पुसली. पंकजला पाहायला प्राची परत पर्णकुटीपाशी पोहोचली. पण पर्णकुटीत पहुडलेल्या पंकजचे पाय पळून पळून पांढरे पडलेले! प्राचीने पंकजच्या पायावर पिवळे पुरळही पाहिले.पंकजची परिस्थिती पाहून प्राण पिळवटलेल्या प्राचीने पदर पाण्यात पिळून पंकजचे पाय पुसले. प्राचीचा प्रथमोपचार पाहून पंकजला पोरगी पसंत पडली. पंकजने प्राचीला पर्णकुटीतच पटवले.पंतांना परमेश्वर पावला; पण पंकजला पंतांची पायाळू पोर पावली.