Thursday, April 29, 2010

मराठी अभिमानाचे शिवधनुष्य - 1

"माझ्या मऱ्हाटीची बोलू कौतुके, अमृतातही पैजा जिंके" असं वर्णन करणारी मायमराठी आज कोणत्या स्थितीत आहे? एक मातृभाषा म्हणून ती कितीजणांच्या मौखिक सामर्थ्याचा स्वाभिमान ठरून कितीजण तिला अभिमामानं मिरवतात? कुणी तिला डाऊनमार्केट म्हटल्यानं काही "मराठी" टाळक्‍यांचं डोकं सणकलं नि साकारू लागलं मराठी अभिमानगीताचं स्वप्न... नवे सूर लेऊन नि नवा स्वरसाज चढवून हे गीत आपल्या भेटीस येत आहे 27 फेब्रुवारी या मराठी भाषा दिनी ! त्याचं काऊंट डाऊन सुरू झालेय आतापासून.... या गीताचे एक स्वर शिलेदार संगीतकार-गायक कौशल इनामदार यांच्याशी या मराठी अभिमानगीताविषयी साधलेला हा संवाद.
मुलाखत- राधिका कुंटे
--------------------
अभिमानगीताचा जन्म व्हायला नेमकी कोणती घटना कारणीभूत ठरली? कारण एवढं मोठं शिवधनुष्य पेलायला फक्त तात्कालिक कारण पुरेसं होतं, असं वाटत नाही. मराठी भाषेविषयी तुमच्या जाणिवेत-नेणिवेत काही ना काही घडामोडी नक्की घडत असणार. त्याविषयी सांगा.

- कोणतीही घटना घडण्यासाठी एक तात्कालिक कारण असतं आणि एक कारण असतं की जे सतत तुमच्यामध्ये झिरपत राहिलेलं असतं. ते शोधण्याचा प्रयत्न करण्यासाठी थोडंसं भूतकाळात डोकवावं लागेल. माझं शिक्षण झालं इंग्रजी माध्यमातून. माझा बराचसा मित्रपरिवार हा कॉस्मॉपोलिटिन आणि शिक्षणाची काही वर्ष पाचगणीत घालवली, जिथलं वातावरण पूर्णपणं कॉस्मॉपोलिटिन होतं. पण माझ्या घरात मराठी नि संस्कृतचं वातावरण पहिल्यापासून होतंच. आई-वडिल दोघंही चांगलं मराठी वाचणारे. सहावी-सातवीत असताना मी आईच्या मामांनी लिहिलेली म्हणजेच भा. द. खेर यांनी लिहिलेल्या कादंबऱ्या "सेतुबंधन" आणि "कल्पवृक्ष" वाचल्या होत्या. तिथनं मराठी वाचनाची गोडी मला लागली. वाचनाची आवड होतीच. खूप इंग्रजी वाचन तर खूप होतं. पण कॉलेजमध्ये जाईपर्यंत माझ्यावर मराठीचा- मराठी संगीताचा असा कोणताच प्रभाव नव्हता, जितका माझ्यावर हिंदी संगीताचा होता.
भाषेचा काही प्रश्‍न आहे असं काही मला जाणवलं नव्हतं. माझा मराठी शब्दसंग्रह चांगला होता. पण पहिल्यांदा मराठीविषयक जाणिव कॉलेजमध्ये असताना निर्माण झाली. मी कॉलेजला असताना गोनीदांचं "कुणा एकाची भ्रमणगाथा" हे पुस्तक वाचलं होतं. माझ्या जाणत्या वयात वाचलेली ती पहिली कादंबरी. तेव्हा असं वाटलं की, "अरे, हे जे काय सांगताय ते आपल्या आयुष्याशी थेट निगडित आहे आणि आपण मराठी वाचलं पाहिजे. मराठी न वाचून आपलं फार नुकसान होतंय..." याच सुमारास माझी चेतन दातारशी ओळख झाली - नाटकाच्या निमित्ताने. तो रुपारेलची नाटकं बसवायचा. एक वर्ष असा योग आला की, मला एकांकिका लिहावी लागली. तिला बक्षीस मिळालं. दुसऱ्या दिवशी चेतननं मला एनसीपीएला बोलवून घेतलं. म्हणाला,"तुला सर्वोत्कृष्ट लेखनाचं बक्षीस मिळालंय. आता तुला असं वाटतंय का की आपण लेखक झालो?" मला तेव्हा कळलं होतं की काही प्रश्‍नांना उत्तरं द्यायची नसतात. गप्प बसून राहायचं असतं. तसं मी केलं. "तुला लिहायचं असेल तर परंपरा माहिती पाहिजे", असं म्हणत त्यानं शंभर नाटकांची यादी डिक्‍टेट केली. त्यात मराठी-हिंदी नाटकांपासून जागतिक रंगभूमीवरच्या नाटकांचा समावेश होता. त्यानं मला एनसीपीएच्या लायब्ररीची मेंबरशीप बक्षीस म्हणून दिली. आतापासून सुरुवात कर. त्या दिवशी मी पिंटरचं नाटक वाचलं नि त्याची कामाची वेळ संपली. दुसरं नाटक उद्या वाचायचं ठरवून आम्ही एनसीपीएपासून गिरगावपर्यंत चालत चालत गेलो. तेव्हा आम्ही पिंटरच्या नाटकावर तर बोललो, पण "किचकवध" का वाचलं पाहिजे, देवल किती चांगले नाटकककार होते, गडकरींच्या भाषेचं महत्तव काय, तेंडुलकरांनी काय बदल केले, राजीव नाईक काय लिहितो, असा पटच उभारला.
चेतनच्या सल्ल्यानुसार वाचन चालूच होतं. सोबतीला संगीतातले सगळे मित्र होतेच. धडपड चालू होतीच. पुढं माझ्या रचनांचा कार्यक्रम करायचं ठरलं नि माझ्या वडिलांनी त्याला "अमृताचा वसा" असं नाव सुचवलं. सुरेश भटांच्या कवितेतला हा शब्द होता. तेव्हा मी वडिलांना विचारलं की "वसा" म्हणजे काय? ते म्हणाले व्रत ! तेव्हा मला "वा काय नाव सुचलंय", असं बरं वाटलं हतं. पण जेव्हा मी कार्यक्रम केला तेव्हा एका अर्थाने मी माझ्या परंपरेची ओळख करून घेत होतो. कारण त्यात बालकवीपासून ग्रेसपर्यंत अनेक कवींच्या रचनानांना मी नव्यानं चाली लावल्या होत्या. म्हणजे मी आणि माझे मित्र परंपरा समजून घेत होतो. जे चेतननं नाटकाबद्दल सांगितलं होतं, तेच आम्ही एका परीनं कवितांबद्दल- भाषेबद्दल करत होतो. तेव्हापासून कवी, साहित्यिक, गीतकार यांच्याशी माझा संपर्क वाढू लागला. आपला आणि मातृभाषेचा संबंध सखोल हवा, ही जी माझ्या मनात भावना रुजली होती, ती भावना अधिकाधिक फोफावत गेली. रुजली नि वाढतच गेली...

No comments:

Post a Comment