Tuesday, April 27, 2010

आंतरभारती अनुवाद सुविधा

राधिका कुंटे

निरनिराळ्या भाषांमधील साहित्य विविध भाषिकांना अनुवादाच्या रूपानं सहजपणं मिळावं, याची साने गुरुजींना तळमळ होती. या आस्थेनंच त्यांनी अनेक ग्रंथांचे अनुवाद केले आहेत. "आंतरभारती" या संकल्पनेचा वेळोवेळी पाठपुरावाही केलाय. त्यांचं नाव सांगणाऱ्या "साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक ट्रस्ट'नं "अनुवाद सुविधा केंद्रा'चा प्रकल्प पुढं नेणं हे स्वाभाविक आहे. सा ने गुरुजींच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचा एक पैलू होता तो शब्दांवरच्या भक्तीचा! त्यांच्या राजकीय- सामाजिक संघर्षात आणि कामगार विकासासारख्या आंदोलनांच्या घडामोडीत सतत व्यग्र राहूनही त्यांचं लिखाण चालूच होतं.

"आंतरभारती'बद्दलचे त्यांचे विचार म्हणजे भारताच्या विविध भाषा आणि संस्कृतीला जोडणारा अनोखा दुवा आहे. सानेगुरुजींची ही आंतर भारतीची संकल्पना नेमकी होती तरी काय? "आंतरभारतीचे माझे स्वप्न' या साने गुरुजींच्या लेखातला काही अंश असा- "माझ्या मनात स्वप्न होते की केव्हा तरी अशी संस्था काढायची, की जी भारताचे ऐक्‍य शिकवील, अनुभवील. आपण भारत म्हणून म्हणत आलो; परंतु या भारताचे आपणास ज्ञान नाही. हे सारे प्रांत माझे, या सर्व भाषा माझ्या, हे सारे माझे भाऊ, सर्वांना भेटेन, सारे अभ्यासीन असे कोठे वाटते? महात्माजी देशातील निरनिराळ्या भाषा वेळात वेळ काढून अभ्यासीत. पू. विनोबाजीही तेच करीत आले. आपणांपैकी कितीकांना ही तहान आहे. मुंबईत रशियन, जर्मन, फ्रेंच वगैरे भाषा शिकण्याची सोय आहे; परंतु अशी संस्था नाही की जेथे सकल भारतीय भाषा शिकता येतील. म्हणून आंतरभारती संस्था स्थापण्याचे माझे कधीपासूनचे स्वप्न आहे.'"साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक ट्रस्ट'तर्फे "आंतरभारती'चा प्रसार करण्याच्या दृष्टीनं डॉ. रामदास भटकळ यांच्या मार्गदर्शनाखाली 7 मे 2006 मध्ये "आंतरभारती सुविधा केंद्रा'ची स्थापना करण्यात आली. निरनिराळ्या भाषांतील लेखक-वाचकांच्या संवादापलीकडं जाऊन प्रत्यक्ष अनुवादाच्या कामाला चालना देण्याचा उद्देश यामागं होता. या संदर्भात डॉ. रामदास भटकळ यांनी सांगितलं की, "प्रत्यक्ष अनुवाद करण्याचं, त्यांचं प्रकाशन करण्याचं काम करणाऱ्या अनेक संस्था आज देशात आहेत. त्याचं काम महत्त्वाचं असलं तरी ते काहीसं अपुरं आहे. तसंच जे काम होतंय, त्याचीही एकमेकांना कल्पना नाही. या अनेक संस्थांना जोडण्याचं काम करण्यासाठी "अनुवाद' या साधनाचं महत्त्व अधोरेखित करणाऱ्या या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. इतर भारतीय भाषांप्रमाणंच मराठीतही अनुवादित ग्रंथांची मोठी उणीव सतत जाणवते. त्यावर मात करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या "साहित्य अकादमी', "नॅशनल बुक ट्रस्ट"सारख्या संस्था आहेतच. अलीकडं काही बिनसरकारी संस्था आणि प्रकाशकही या संदर्भात पावलं उचलत आहेत. तरीही आवश्‍यकतेच्या पाच टक्केही हे काम हाती घेतलं जात नाहीये. प्रत्येक भाषेत प्रसिद्ध होणारी महत्त्वाची पुस्तकं दोन-एक वर्षांत निदान हिंदी-इंग्रजीत आणि एका तरी इतर भाषेत अनुवादित झाल्यास राष्ट्रीय एकात्मतेला बळ चढून लेखन व्यवसायालाही रूप येईल."

केंद्रापुढं प्रारंभी दोन कामं पूर्ण करायचं उद्दिष्ट होतं. एक होतं ते उत्तम ज्ञानभांडार उपलब्ध करून देणारं ग्रंथालय साकारणं. माणगावला तयार होत असलेल्या संदर्भ वाचनालयासाठी साहित्य जमा केलं जात आहे. जुनी नियतकालिके आणि ग्रंथादी साहित्याचे संदर्भ इथं मिळणार आहेत; तर दुसरं होतं माहिती केंद्र अर्थात अनुवादविषयक माहिती सादर करणारी वेबसाईट. शिवाय मराठीसह इतर भाषांतील नवीन पुस्तकांची माहिती आणि अल्पपरिचयही दिला जाणार आहे, अशी माहिती भटकळ यांनी दिली. मराठीला केंद्रीभूत धरून केंद्रानं आपल्या वाटचालीला आरंभ केलेला दिसतो. विंदा करंदीकर यांना 2006 मध्ये मिळालेल्या ज्ञानपीठ पुरस्कारातील रकमेपैकी दोन लाख रुपये त्यांनी "साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक ट्रस्ट'ला देऊन त्यातील व्याजातून मराठीतील उत्तम अनुवादित पुस्तकाच्या प्रकाशनास पुरस्कार द्यावा, अशी विनंती केली होती. त्यानुसार "बाळशास्त्री जांभेकर अनुवाद पुरस्कार' दिला जात असून त्याअनुषंगानं 2001 ते 2008पर्यंत मराठीत प्रसिद्ध झालेल्या सर्व अनुवादित पुस्तकांची यादी "मायमावशी'तून उपलब्ध होते. अनुवादित पुस्तकांपैकी उत्तम साहित्याचं विवेचनही केलं जातं. त्यावर चर्चा होऊन त्यांचे निकष पडताळले जातात. चांगला अनुवाद कशाला म्हणावं, ते शोधलं जातं. या कामी विविध तज्ज्ञ मंडळींचं मार्गदर्शन होतं. शिवाय "वासंती गंगाधर गाडगीळ अनुवाद अभ्यासवृत्ती" या योजनेखाली तीन अनुवादकांना अभ्यासवृत्ती दिलेली असून त्यांनी केलेले अनुवाद तयार झाले आहेत. "म' मराठीचा असं अलीकडं वारंवार म्हटलं जातं; पण डॉ. भटकळ यांच्या मते "म' "मायमावशी'चाही आहे. त्याचंच प्रत्यंतर आपल्याला "मायमावशी' या मुखपत्राच्या मौलिक अंकांमधून दिसतं. "मायमावशी'त पहिल्या वर्षी मराठी, गुजराती भाषांत कोणती (अनुवादित) पुस्तकं प्रकाशित झाली, त्याची यादी दिली होती.

गेल्या 200 वर्षांत अनुवादासंदर्भात झालेल्या कामाविषयी लेख प्रसिद्ध करण्यात आले होते. "सध्या आम्ही गुजराती, कोकणी, सिंधी, मराठी या जवळच्या भाषांच्या प्रकल्पांना सुरुवात केलीय. यानंतर दाक्षिणात्य आणि पुढं पूर्व-पश्‍चिम प्रांतांतील भाषांसाठीचे प्रकल्प हाती घेतले जाणार आहेत', असं कार्याध्यक्षा कवयित्री नीरजा यांनी सांगितलं. असं सगळ्या भारतीय भाषांच्या संदर्भात काम झाल्यावर भारतभरातल्या मंडळींना एकत्र आणण्याचा केंद्राचा मानस आहे. "मराठी ही अनेक भाषांपैकी एक आहे, ही जाणीव ठेवायला हवी. ही जाणीव ठेवली नाही, तर प्रगती होणार नाही. म्हणूनच अनुवादाचा पूल जोडला गेला, संवाद साधला गेला तर ते हितावह ठरेल,' असं डॉ. भटकळ सांगतात. ते म्हणतात, ""गांधीजींच्या लेखनाचा एक संदर्भ देतो की, पूर्वी लोक तीर्थयात्रा करीत. मात्र ही यात्रा करताना त्यांना भाषेची अडचण येत असे, असं दिसत नाही. म्हणूनच मला वाटतं की, एकमेकांच्या भाषेतून भाषा वाढते. केवळ भारतीय भाषांपुरता मर्यादित विचार न करता सगळ्याच भाषांचा करायला हवा. म्हणूनच 1 मे 2010 रोजी महाराष्ट्र आणि गुजरात राज्यांच्या सुवर्णमहोत्सवाच्या निमित्तानं केंद्राच्या वतीनं मराठी व गुजराती भाषांत परस्पर अनुवाद कार्यासंबंधीचा एक प्रकल्प हाती घेण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्य गुजराती साहित्य कला अकादमीच्या सहकार्यानं या कामाला सुरुवात झालीय. याच उपक्रमांतर्गत मराठींना गुजराती आणि गुजरातींना मराठी भाषा शिकविली जाणार असून 20 तासांचा छोटा कोर्स ठेवण्यात येणार आहे. गुजराती-मराठीचा एखादा छोटा कोर्स शिकवता येईल का, असं माझ्या मनात आलं. त्यानुसार गुजरात विद्यापीठाशी संपर्क साधला. त्यानंतरच्या विचारविनिमयानुसार हा उपक्रम 20 तासात राबविण्यात येणार असून पुढं इतर भाषांसाठीही तो राबविला जाणार आहे.'' या केंद्राच्या अनुवादांतर्गत उपक्रमात केवळ "साहित्य'प्रकारावर भर न देता तांत्रिक, वैद्यकीय, विज्ञानादी विषयांवरची पुस्तकंही प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. भाषा वाढवायची तर अशा विविध गोष्टी करण्याची गरज आहे. त्यासाठी संगणकामुळं होणारे भाषिक, तांत्रिक बदल लक्षात घेऊन संवाद साधण्याच्या या माध्यमाचा योग्य तऱ्हेनं उपयोग करून घेण्याचा केंद्राचा मानस आहे. त्यासाठी काही उपक्रम हाती घेण्यात आलेत. त्याविषयी डॉ. भटकळ सांगतात की, ""माणगावच्या केंद्रात दृक्‌-श्राव्यविभाग सुरू करण्यात येणार आहे. साने गुरुजींच्या कार्याविषयीचे साहित्य तिथं चित्रित केलं जात असून अनुवादकांचे प्रत्यक्ष अनुभव ध्वनिमुद्रित केले जाणार आहेत. "जनकल्याण प्रतिष्ठान" योजनेखाली निदान दहा अनुवाद तयार होत असून त्यापैकी काही मराठीत; तर काही इतर भारतीय भाषांतून मराठीत होणार आहेत. "शिवाय "बांगला-मराठी साहित्येतर मेलबंधन' या उपक्रमांतर्गत मुंबईतील बंगालीभाषक "निखिल भारत बंग साहित्य संमेलना'चं आयोजन करण्यात येतं. बंगाली व मराठी साहित्याची ओळख एकमेकांना व्हावी, हा त्यामागचा हेतू आहे.

केंद्राच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या मार्गदर्शनाच्या कार्यशाळांत काही निबंध वाचण्यात येतात. त्यावर सांगोपांग चर्चा घडून अनुवादकांना दिशादर्शक मार्गदर्शन मिळतं. अनुवादाचा दर्जा अधिकाधिक सुधारावा, हा उद्देश त्यामागं आहे. "भाषिक देवाण-घेवाण होऊन "भाषा'समृद्ध होण्यासाठी प्रबंध-निबंध सादर करण्याचा प्रकल्प तर आहेच; पण विविध भाषिक महाविद्यालयीन मुलांनी वर्षभरात ठराविक काळानं एकत्र येऊन आपापल्या भाषेतल्या साहित्याविषयी चर्चा केली, विचार मांडले, तरी या भाषिक देवाण-घेवाणीतून बरंच काही हाती गवसू शकतं. गेल्या 50 वर्षांत आहेत ती साधनं नीटसपणं पुढल्या पिढीकडं पोहोचावीत, ती निर्माण करताना कोणत्या अडीअडचणी आल्या, त्यातून काय मार्ग काढला, हे सारं कळण्याची साधनंच आपल्याकडं उपलब्ध नाहीत. ती उपलब्ध करून द्यायला हवीत. त्यासाठी आम्हीही प्रयत्नशील आहोत. हे केंद्र म्हणजे मी एक स्वप्न मानलंय... मंजिले और भी हैं...

(संदर्भ- "मायमावशी"चे अंक, सानेगुजींचे चरित्र- त्र्यं. ग. बापट)-

No comments:

Post a Comment