Monday, May 3, 2010

मराठी बोलण्याची सवय जिभेला लावण्याची गरज

जगदीश खेबुडकर
मराठी ही आपली मातृभाषा आहे. आईची भाषा म्हणूनच तिच्याकडे पाहिले पाहिजे. त्यामुळे ज्याप्रमाणे आईला विसरू नये, त्याप्रमाणे आईचा दर्जा असणाऱ्या आपल्या भाषेलाही विसरू नये. आपल्या भाषेचा नम्र आदर असला पाहिजे. "मराठी बोलू कौतुके अमृतातेही पैजा जिंके...' असे खुद्द ज्ञानेश्‍वरांनीच आपल्याला सांगितले आहे. त्यांचा वारसा आपण चालविला पाहिजे. मला स्वतःला मराठीविषयी प्रचंड अभिमान आहे. मी मराठी शिक्षक म्हणून 35 वर्षे विद्यार्थ्यांना मराठी शिकविण्याचे काम केले आहे. त्यामुळे मला मराठी भाषेची, मराठी काव्याची विशेष आवड आहे. वेद वाङ्‌मयातील तत्त्वज्ञान सांगणारी सर्व मराठी भाषांतरे मी खरेदी केलेली आहेत. माझे स्वतःचे मराठी वाङ्‌मयाचे छोटे वाचनालय आहे. आज मराठी भाषेकडे दुर्लक्ष होत आहे. त्याला अनेक गोष्टी जबाबदार आहेत. स्वातंत्र्योत्तर काळात झालेले पाश्‍चिमात्यांचे संस्कार आपण आजही सोडलेले नाहीत. ते तसेच आपण चालवीत आहोत. पुढे जाण्यासाठी आयुष्यात मोठे होण्यासाठी इंग्रजी आवश्‍यक आहे, असे उगाचच भासविले जात आहे. त्यामुळे पालक मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेतच घालत आहेत. या विचारप्रणालीमुळे मराठी भाषा गौण मानली जात आहे आणि इथेच मराठी माणूस चुकत आहे. इतर भाषा शिकण्यास माझा कोणताही आक्षेप नाही. प्रगती व गरजेसाठी इतर भाषाही शिका; मात्र त्या सहभाषा म्हणून शिका. मराठी भाषा झाडाचे खोड आणि त्यांच्या फांद्या म्हणजे इतर भाषा हा दृष्टिकोन ठेवा. मराठी भाषा अत्यंत प्रगल्भ, समृद्ध आहे. त्यामुळे तिची उच्चार पद्धतीही वैशिष्ट्यपूर्ण आहे; मात्र आजकाल चुकीचे उच्चार केले जात आहेत. शासनानेही अनुच्चारित अनुस्वार लिहायची गरज नसल्याचा निर्वाळा दिला आहे; मात्र त्यामुळे शब्दांच्या उच्चारावर परिणाम होत आहे. शासनाने विचार करून असे निर्णय घेणे गरजेचे आहे. मराठी ही समृद्ध भाषा असल्यामुळे तिची शुद्धता अबाधित ठेवणे महत्त्वाचे आहे. मराठी बोलीभाषेतील काही बदल ठीक आहेत; मात्र मराठीचा मूळ स्वभाव तसाच राहिला पाहिजे. अलीकडे मराठीवर हिंदी, इंग्रजी भाषांनी आक्रमण केले आहे. त्यामुळे एका 10 शब्दांच्या वाक्‍यात एखाददुसरा शब्द मराठी व सरसकट हिंदी, इंग्रजी घुसडण्याचे प्रमाण अधिक आहे. हे चुकीचे आहे. मराठी भाषा खरेच इतकी दुबळी नाही; मात्र आपणच तिच्याकडे दुर्लक्ष करीत आहोत. मराठी जपण्यासाठी, वाढविण्यासाठी मराठी माणसांनी क्रियाशील राहणे गरजेचे आहे. मराठी ही समृद्ध भाषा आहे. मराठी शब्दांना अनके पर्यायी शब्द आहेत. त्यांची माहिती घेऊन त्यांचा वापर वाढविला पाहिजे. मराठीचा खोलवर अभ्यास झाला पाहिजे. मराठी बोलण्याची सवय जिभेला लावली पाहिजे. वेगळे काम, वेगळा उपक्रम म्हणून मराठीचा अभ्यास झाला पाहिजे. वेगळे कार्य म्हणून ते हाती घेतले पाहिजे. आद्य कर्तव्य म्हणून मराठीच्या वाढीसाठी प्रयत्न केले पाहिजेत. यासाठी प्रथम घरात, कुटुंबात मराठी रुजले पाहिजे. मी अनेक मराठी माणसांना अस्खलित मराठी बोलताना पाहिले आहे. जर इतर भाषक माणसे मराठीत बोलतात, तर आपण मराठी माणसे मराठीत का बोलत नाही? याचा विचार केला पाहिजे. मराठी बोलण्याने कोणतेही नुकसान होत नाही. मग मराठी बोलणे आपण का टाळतोय? मराठीकडे का दुर्लक्ष करतोय? याउलट बोलीभाषेत, व्यवहारात मराठीचा वापर वाढविला पाहिजे. मराठी बोलण्यासाठी आग्रही राहिले पाहिजे. तसेच इतरांनीही मराठीतच बोलावे, असा अट्टहास ठेवला पाहिजे. इतरांना मराठीत बोलण्यास भाग पाडले पाहिजे. सरसकट मराठीचा वापर वाढविल्यास मराठी रुजेल.
(शब्दांकन ः माधवी यादव-पाटील)

No comments:

Post a Comment