Monday, May 3, 2010

कविराजांना दिसलेला महाराष्ट्र

डॉ. सुधीर मोंडकर
"महाराष्ट्र' हे नाव उच्चारताच, आमच्या मराठी भाषिक राज्याचा ऐतिहासिक, भौगोलिक नि सांस्कृतिक बाज नजरेसमोर उभा राहतो. पण हाच महाराष्ट्र येथील कविरायांना कसा दिसला? असा त्रिमिती बाज त्यांनी आपल्या काव्यातून रंगवलाय का? की काही वेगळ्या छटा त्यांनी दाखवल्या आहेत?श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांच्या "महाराष्ट्र गीतात' येथील संपन्न भूमीचे दर्शन घडते. गगनभेदी पर्वत, विस्तृत जलायशय, भव्य प्रसाद, संपन्न शेती, चारित्र्यवान माणसांनी वसलेली घरे यांनी महाराष्ट्र बनलाय. विक्रम नि वैराग्य हे याच ठिकाणी नांदतात. जरीपटक्‍याच्या जोडीला भगवा डोलतोय. शक्ती-युक्ती, धर्म-राजकारण यांची विधायक युती झाल्याने महाराष्ट्राची कीर्ति त्रिखंडात पसरलीय. सदर महाराष्ट्र गीताच्या अपूर्व गेयतेमुळे मराठी रंगभूमीवर नांदीचे भाग्य या गीताला लाभले नि ज्याच्या-त्याच्या तोंडी ते घोळू लागले -बहु असोत सुंदर संपन्न की महा।प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा।।कोल्हटकरांचेच पट्टशिष्य राम गणेश गडकरी ऊर्फ गोविंदाग्रज हे आपल्या काव्यात महाराष्ट्र रंगवताना म्हणतात, हा देश दगडासारखा कणखर, फुलासारखा कोमल, करवंदीसारखा काटेरी आणि बकुळप्राजक्तांनी फुललेला आहे. बुद्धी व भक्ती यांच्या युतीने तो फुलला आहे. गोदा, कृष्णा, भीमेच्या जलाने महाराष्ट्राच्या पाषाणदेहाला स्नान घातले आहे. डोंगरदऱ्यात वसलेले शिवशाहीचे गडकोट त्याच्या पराक्रमाची साक्ष देत आहेत, तर संतशाहीर त्याचे गुणगान आपल्या कवनाद्वारे करत आहेत. या काव्याचा प्रभाव एवढा की, 83 व्या मराठी संमेलनात अमिताभ बच्चनसारख्या अमराठी कलाकाराला ह्या गीताच्या पंक्ती सादर कराव्याशा वाटल्या -मंगलदेशा। पवित्र देशा। महाराष्ट्र देशाप्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा।।"महाराष्ट्र लक्ष्मी' ही विनायकांची कविता. भक्तिभावाने महाराष्ट्राचे गुणगान करताना ते म्हणतात -महाराष्ट्र लक्ष्मी माते जगी धन्य वाटे।यशोगीत तिचे गाता मनी हर्ष दाटे।।असा हा महाराष्ट्र परचक्राने ग्रासलेला, पारतंत्र्यात खितपत पडलेला, दुष्काळाने गांजलेला असला तरी संकटातही ताठ कण्याने मान उंच करून पाहतोय. आपल्या जीवनात महाराष्ट्राने जे दिव्य सोसलेय, त्यामुळे त्याचे भवितव्य उज्ज्वल असणार आहे.महाराष्ट्रात परस्परविरोधी भूभाग पाहावयास मिळतात. कोकणभूमी ही आंबा, सुपारी, साग, नारळ यांनी लगडली आहे, तर घाटावरचा भाग कळकीचे बेट, करवंदी-बाभळ-बोरी यांसारख्या वृक्षराईंनी बहरलेला आहे. अशा भूमीचे स्तवन करताना एक शाहीर म्हणतो -हिरवे हिरवे सारे रानकुठे नागवेली पानकसा पिकला गं गहू हरभरा!हा शाळू मक्‍याचा तुरामहाराष्ट्र देश सुंदरा!डॉ. सुधीर फडके विरचित व शाहीर अमर शेखांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या सभांमध्ये आपल्या पहाडी आवाजात पुढील गीत सादर केले-जनतेच्या सत्तेची ज्योत जागती।गर्जा संयुक्त महाराष्ट्र भारती।।मराठी माणूस मग तो कोकणी, घाटावरचा, नागपूर-विदर्भाचा असो सारे महाराष्ट्रासाठी एक होतात. शेतकरी, कामगार हे सारे जाती-धर्माची बंधने तोडून अन्यायाविरुद्ध लढतात. हे केवळ महाराष्ट्रासाठीच नव्हे, तर देशासाठीदेखील! या "अमर' गीताने साऱ्या महाराष्ट्राला जाग आणली नि संयुक्त महाराष्ट्र मिळवण्यास उद्युक्त केले.जानेवारी 1956! संयुक्त महाराष्ट्र चळवळीची ऐन रणधुमाळी. समितीच्या नेत्यांची धरपकड सुरू झाली. आचार्य अत्रे प्रथम मुंबईच्या आर्थर रोड तुरुंगातत व नंतर ठाण्याच्या तुरुंगात. त्यांच्या डोक्‍यात त्या वेळी फक्त "संयुक्त महाराष्ट्र' भरला असल्याने दुसरे काही लिहू म्हटले तरी त्यांना लिहिता येईना. गडकऱ्यांच्या या पट्टशिष्याला "महाराष्ट्र गीताचे' अनुष्टुभ सुचले. चार महिन्यानंतर 5 एप्रिल 1956 ला ते तुरुंगातून सुटले, ते संयुक्त महाराष्ट्राचा लढा यशस्वी करू अशा आत्मविश्‍वासपूर्ण निर्धाराने! "नवयुग'च्या कचेरीत आल्यावर पुढील महाराष्ट्र गीताने उभ्या महाराष्ट्राला वंदन करून आपल्या वृत्तपत्रीय कामकाजाचा त्यांनी श्रीगणेशा केला-महाराष्ट्र तुझ्या पायी असो साष्टांग वंदन।तुझ्यासाठी झिजो माझ्या देहाचे चंदन।।या गीतात महाराष्ट्र म्हणजे संतांचे माहेर नि वीरांची कर्मभूमी. त्याला निर्मून सारी पृथ्वी धन्य झालीय. या भूमीतील काटेकुटे हे फुलांच्या बिछान्यागत, तर कणीकोंडा हा गोड मांड्यासारखा अत्र्यांना वाटतो. अत्र्यांची ही उत्कट महाराष्ट्रभक्ती म्हणजे न्यारी देशभक्तीच होती, असे तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांचे मत होते.संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे भीष्माचार्य सेनापती बापट यांनी महाराष्ट्र नि भारत यांच्यातील अतूट संबंधाचे वर्णन करताना म्हटलेय -महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले। मराठ्याविना राष्ट्र गाडा न चाले।खरा वीर वैरी पराधीनतेचा। महाराष्ट्र आधार या भारताचा।।महाराष्ट्राने पारतंत्र्यास आपला खरा वैरी मानले. त्यामुळे देशमुक्तीसाठी टिळक, सावरकर, आंबेडकर यांनी आपल्यापरिने प्रयत्न केले. 1962 मध्ये चिनी आक्रमणानंतर तत्कालिन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण संरक्षणमंत्री म्हणून दिल्लीला गेले आणि संकटग्रस्त भारताला आधार दिला. "भारते जन्म दुर्लभम्‌। महाराष्ट्रे तु अतिदुर्लभ्‌।।' अशा महाराष्ट्रात आपण जन्मलो, म्हणजे किती भाग्यवान!

No comments:

Post a Comment