Monday, May 3, 2010

वेळ पडल्यास मराठीची सक्ती करा...

अभिनेते संजय मोने
मराठीला कुणी गृहितच धरत नाही, त्यामुळे मराठी भाषेवरून जे राजकारण चालू आहे त्यात काही वाईट आहे असं मला तरी वाटत नाही. हां आता ते योग्य की अयोग्य ही नंतरची गोष्ट आहे. मराठी ही आपली मातृभाषा आहे आणि कोणी तरी तिच्यासाठी लढतंय हे माझ्यासाठी जास्त महत्त्वाचं आहे. राज ठाकरे मराठी भाषेचं राजकारण करतायत असं बोललं जातं; मात्र त्यात शंभर टक्के राजकारण असेल का? राज ठाकरेंना मिळणारा पाठिंबा पाहता ते मराठीचं राजकारण करीत आहेत असं म्हणणं चुकीचं ठरेल. त्यामुळे उगाचंच काही तरी आरोप करून त्याला मोडता घालण्यात काहीच अर्थ नाही. आता त्यांचा मार्ग कसा आहे हे काळ ठरवेल. मुळात राजकारणी लोक निष्क्रिय असतात हा सर्वसामान्य समज आधी बदलला पाहिजे. मला तरी असं वाटतं, की प्रत्येक राजकीय व्यक्तीला काही तरी तळमळ असते, त्यामुळेच तो एखाद्या मुद्द्यासाठी लढा उभारतो; त्यामुळे जे लोक काही करीत नाहीत ते लोकच एखाद्या मुद्द्यावरून राजकारण केलं जातंय असा बोभाटा करतात.मराठीचा वापर वाढलाच पाहिजे. त्यासाठी सक्ती करावी लागली तरी चालेल. सामाजिक स्वच्छतेइतकीच सांस्कृतिक स्वच्छता गरजेची आहे. अर्धवट इंग्रजी, अर्धवट हिंदीत कुणी नम्रतेत बोलत असेल तर त्यापेक्षा मराठीत बोलणारा शुद्ध माणूस मला जास्त आवडेल. भाषावार प्रांतरचना जर आपण केली आहे, तर त्या त्या प्रांतात तीच भाषा बोलली गेली पाहिजे. मला सांगा, नागालॅंडमध्ये तेलगू बोलली तर चालेल का? एखाद्या प्रांतात बाहेरून आलेले लोक जास्त आहेत म्हणून ती भाषा बोलण्यात काय अर्थ आहे? या सगळ्याच्या मुळाशी गेल्यास सध्या मराठी आणि हिंदी हा एवढाच वाद शेवटी उरणार आहे; तर मग राजकारणानेच हा प्रश्‍न सुटू शकेल, सामोपचाराने किंवा समाजकारणाने नाही.मी स्वतः जास्तीत जास्त मराठीत बोलतो. शिवाय बाहेरच्या प्रांतात गेल्यावर मी त्या त्या प्रांतातील भाषा बोलतो. त्यामुळे इतर प्रांतातील लोकांनी महाराष्ट्रात येऊन त्यांची भाषा रेटण्याचा प्रश्‍नच येत नाही. जे काम कुणीही करू शकतं त्या कामासाठी इतर प्रांतातील लोक आणल्यास वाद होणारच. मजूरसुद्धा तुम्ही जर बाहेरून आणले तर दुसरे काय होणार? शिवाय महाराष्ट्रीय नोकरीसाठी खळखळ करतात ही ओरड वेगळीच. आपण जर बाहेरच्या माणसाशी बोललो तर तो आवर्जून सांगतो की महाराष्ट्रात आम्हाला जास्त सुरक्षित वाटतं. इथली माणसं त्यांच्याशी समजूतदारपणे बोलतात. इथले लोक टॅक्‍सीवाल्यांशी हिंदीत बोलतात, कारण ते समजूतदार आहेत. त्यामुळे आम्हाला कुणी समजूतदारपणा शिकवण्याचा प्रयत्न करू नये. जर सर्व महाराष्ट्रीयन लोकांनी केवळ मराठीतच बोलायचं ठरवलं तर मात्र इतरांना अवघड जाईल हे त्यांनी विसरू नये.मी इतक्‍या देशांमधून नाटकांसाठी, कार्यक्रमांसाठी फिरलो, पण इंग्रजीवाचून माझं कधीच अडलं नाही. जपानमध्ये मात्र इंग्रजी येऊनही माझं अडलं, कारण जपानमधील लोक जपानी भाषेतच बोलतात. माझी मुलगीही इंग्रजी शाळेत जाते; मात्र माध्यम म्हणून ती इंग्रजी भाषा शिकते, पण ती बोलते मराठीतूनच. मध्यंतरी मी तिच्या शाळेत गेलो असताना तिच्या शिक्षकांनी मला ती इंग्रजीत बोलत नाही, मराठीतच बोलते असे सांगितले. त्यावर मी त्यांना ती अभ्यासात हुशार आहे ना मग झालं, असं सांगितलं. शिवाय मराठी आहे त्यामुळे ती मराठीतच बोलेलं हे सांगायलाही विसरलो नाही. अर्थात, मी महाराष्ट्रात राहतो, मी मराठी आहे, तर मी मराठीतच बोलेन या जिद्दीने प्रत्येकाने जास्तीत जास्त मराठी बोलले पाहिजे. मराठीचा प्रसार केला पाहिजे.शेवटचा आणखी एक मुद्दा मला इथे आवर्जून सांगावासा वाटतो, की केवळ भारत देशच नाही, तर संपूर्ण जग ज्यांना वंदनीय मानत त्या राष्ट्रपिता महात्मा गांधींचे गुरू गोपाळकृष्ण गोखले हेदेखील मराठीच होत हे सर्वांनी धान्यात ठेवावे. तसेच इतिहासाच्या तीनशे वर्षांच्या राजकारणात दिल्लीनं कधी महाराष्ट्राचं राज्य चालवलं नाही, तर महाराष्ट्रच बहुंताशवेळा दिल्लीचं राज्य चालवतं, हेही विसरून चालणार नाही. यावरूनच महाराष्ट्र व इथली भाषा प्रत्येकाने शिकली पाहिजे आणि ती बोललीही पाहिजे.-
(शब्दांकन ः माधवी यादव-पाटील)

No comments:

Post a Comment