Monday, May 3, 2010

आमची घोषवाक्‍यंही मराठीतच!

रवींद्र प्रभुदेसाई,
व्यवस्थापकीय संचालक, पितांबरी प्रॉडक्‍टस्‌ प्रायव्हेट

मराठी टिकविण्याची चर्चा करताना त्याची सुरुवात स्वतःपासून केली पाहिजे. मराठी माणूस जागतिक पातळीवर पोचला, तर त्याची भाषाही मोठी होईल; पण तुम्ही कुठेही गेलात तरी स्वभाषेचा अभिमान बाळगणं, तिच्या वृद्धीसाठी प्रयत्न करणं ही त्यासाठीची पूर्वअट आहे.

मराठी भाषा वैश्‍विक आहे; ती आपल्याला विश्‍वकल्याणाची, आनंदी राहण्याची प्रेरणा देते. सर्व प्राणिमात्रांवर प्रेम करायला शिकवते. मराठी संस्कृती मराठी माणसावर सात्त्विकतेचा संस्कार करते. त्यामुळेच अत्युच्च प्रेरणा देणारी ही मराठी भाषा व संस्कृती जगभर पोचवली पाहिजे. त्यासाठी मराठी माणसांनी आत्मविश्‍वासाने आपल्या गुणांच्या, कर्तृत्वाच्या जोरावर आर्थिक सत्ता आपल्या हाती घेतली पाहिजे. मराठी भाषेची, मराठी माणसांची वेगळी अशी ठळक वैशिष्ट्ये आहेत. मराठी माणूस सर्व क्षेत्रांत आघाडीवर आहे. शिवजी महाराजांसारखा राजा, ज्ञानेश्‍वरांसारखे महाकवी याच संस्कृतीतील आहेत. मराठी भाषा, मराठी साहित्य खूप समृद्ध आहे. इटलीतील एका भाषाशास्त्रज्ञाने मराठी व इतर भाषांच्या अभ्यासातून मराठी भाषेची शास्त्रीय माहिती सांगितली आहे. त्यानुसार मराठी शब्द, मराठीतील वर्णमाला प्रत्यक्ष उच्चारांतून घडते. या उच्चारांमुळे मराठी भाषा बोलल्यामुळे आरोग्यही सुधारते. याला शास्त्रीय आधारही आहे. हेच मराठी भाषेचे वेगळेपण आहे. मराठी ही जगातील एकमेव अशी भाषा आहे. संस्कृत ही मराठी भाषेची जननी आहे. त्यामुळे या भाषेकडेही दुर्लक्ष करून चालणार नाही. तिचाही अभ्यास महत्त्वाचा आहे. पंचमहाभुतांची शक्ती येण्याचे सामर्थ्य मराठी भाषेमध्ये आहे. त्यामुळे मराठी भाषेचा अभ्यास करून तिच्या मुळापर्यंत गेले पाहिजे.यासाठी चांगले मराठी साहित्य, काव्य, संत वाङ्‌मय आठवड्यातून एकदा तरी वाचले पाहिजे. आपल्या पूर्वजांची चरित्रे वाचली पाहिजेत. चांगले संदर्भ ग्रंथ आपल्या घरामध्ये असले पाहिजेत. मराठी भाषेविषयी संशोधने झाली पाहिजेत. नवनवीन मराठी शब्द आणले पाहिजेत. यासाठी मराठी कवी संमेलने, कथा संमेलने भरविली पाहिजेत. मराठी संगीत, नाटकांमधून मराठी समृद्ध होते. त्यामुळे अशी नाटके आली पाहिजेत. विविध विषय हाताळणारे मराठी चित्रपट निर्माण झाले पाहिजेत. हे सर्व करीत असताना इतर भाषांचाही स्वीकार करणे गरजेचे आहे. संकुचित दृष्टिकोन न ठेवता इतर भाषांमधील तत्त्वज्ञान, उपयुक्त माहिती मिळविण्यासाठी हिंदी, इंग्रजी यासारख्या भाषांमध्येही पारंगत असले पाहिजे. हिंदू संस्कृती, मराठी चिरकाल टिकविण्यासाठी इतरांचे अंधानुकरण टाळले पाहिजे. मराठी भाषा सर्वोच्च स्थानावर पोचवली पाहिजे. यासाठी मराठी माणसाने आपले कर्तृत्व सिद्ध करून स्वतः सर्वोच्च स्थानावर पोचले पाहिजे. मराठी माणून आपल्या गुणांच्या जोरावर यशस्वी झाल्यास इतर भाषक आपोआपच आपल्याकडून प्रेरणा घेण्यासाठी आपल्या भाषेचा अभ्यास करतील. मी स्वतः माझ्या उद्योगाच्या माध्यमातून मराठी भाषा जगभर पोचविण्यासाठी प्रयत्नशील आहे. माझ्या पितांबरी या उत्पादनाच्या स्लोगन्सदेखील मी मराठीतूनच बनविल्या आहेत. त्यासाठी मराठीमधूनच जाहिराती तयार केल्या आहेत. मराठी उत्पादन आंतरराष्ट्रीय दर्जावर पोचविण्यासाठी नवनवीन प्रयोग मी राबवीत आहे. माझा बहुतेक सर्व कर्मचारीवर्ग महाराष्ट्रीय आहे. आम्ही हिंदू, मराठी सणांच्याच सुट्या घेतो. दैनंदिन व्यवहारात जास्तीत जास्त मराठीचा वापर करतो. बाहेरच्या राज्यांतील अपवाद वगळता आमचे कामाविषयीचे सर्व पत्रव्यवहार मराठीतूनच केले जातात. म्हणूनच मला असं वाटतं, की मराठी माणसाकडे नेतृत्वक्षमता आल्यास मराठीचा प्रसार वाढेल. त्यासाठी अहंकार, स्वार्थ यासारखे अवगुण बाजूला ठेवून तुकाराम, रामदास, ज्ञानेश्‍वर यासारख्या संतसाहित्यातून प्रेरणा घेत आपल्यातील चांगलं इतरांपर्यंत पोचवलं पाहिजे. आपल्या प्रत्येक कार्याच्या सिद्धीसाठी त्या त्या देवतांचं स्मरण करीत भक्ती व श्रद्धेने मराठी बाणा सर्वदूर नेला पाहिजे. -
शब्दांकन माधवी यादव-पाटील

No comments:

Post a Comment