Monday, May 3, 2010

मराठी भाषेला मरण नाही...

अजित कडकडे
"अलीकडे पाश्‍चात्यांचे अंधानुकरण करणे ही एक प्रथा झाली आहे. त्यामुळे त्यांच्यासारखे राहण्याच्या नादात त्यांचीच भाषा बोलणे हे मोठेपणाचे लक्षण मानले जाते. प्रत्येक जण या प्रथेत वाहवत चालल्याने भाषेची भेसळ होत आहे. भाषेची ही भेसळ प्रथम थांबविली पाहिजे. मराठी माणसांनी आपल्या प्रांतावर, मराठी माणसांवर व मराठी भाषेवर प्रेम केले पाहिजे. आपली आपल्या मातीवरची, आपल्या लोकांवरची, भाषेवरची निष्ठा डळमळल्यास प्रगती होणे अशक्‍य आहे.''
----------------
मुंबई ही मराठी माणसांचीच आहे, याबद्दल कुणाचेही दुमत नसावे. बाहेरून येणारे लोक नंतर येथे आले आहेत, हे त्यांनी विसरू नये. त्यामुळे मुंबईवर प्रथम मराठी माणसांचा हक्क आहे. आता इथल्या मराठमोळ्या भाषेचा विचार केल्यास ती मूळातच समृद्ध भाषा आहे. अगदी परदेशातही तिने आपला झेंडा फडकवला आहे. थोडक्‍यात, तुम्ही जगात कुठेही गेलात तरी मराठी भाषेला मरण नाही. त्यामुळे तिला कुणाकडूनही अपाय होऊच शकणार नाही. मात्र हे जरी सत्य असले तरी मराठी भाषिकांनी तिचा अभिमान बाळगलाच पाहिजे. त्यांनी मनापासून मराठी भाषेवर निष्ठा ठेवली पाहिजे. माझी जन्मभूमी गोवा आहे. मात्र मी गायनासाठी मुंबईत आलो आणि इथलाच एक भाग बनून गेलो. मी माझे गुरू पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्याकडून मराठीतूनच गायनाचे धडे गिरवले. मराठी गीते, मराठी संगीत शिकताना मला तिची गोडी लक्षात आली. त्यामुळे माझे मराठी भाषेवर अत्यंत प्रेम आहे. या भाषेविषयी मला प्रचंड अभिमान आहे. मुंबई ही महाराष्ट्रातील आहे. त्यामुळे इथे राहणाऱ्या माणसांना प्रत्येक गोष्टीत पहिले स्थान दिले गेले पाहिजे. मराठी माणसांना डावलून इतर लोकांना नोकऱ्या देणे अयोग्य आहे. मराठी माणसांकडे दुर्लक्ष केल्यामुळेच मराठी माणूस मागे पडत आहे. याचा विचार होणे गरजेचे आहे. महाराष्ट्राबाहेरील प्रांतांत ज्याप्रमाणे स्थानिकांना प्राधान्य दिले जाते, त्याचप्रमाणे महाराष्ट्रानेही ही भूमिका घेतली पाहिजे. अलीकडे पाश्‍चात्यांचे अंधानुकरण करणे ही एक प्रथा झाली आहे. त्यामुळे त्यांच्यासारखे राहण्याच्या नादात त्यांचीच भाषा बोलणे हे मोठेपणाचे लक्षण मानले जाते. प्रत्येक जण या प्रथेत वाहवत चालल्याने भाषेची भेसळ होत आहे. भाषेची ही भेसळ प्रथम थांबविली पाहिजे. मराठी माणसांनी आपल्या प्रांतावर, मराठी माणसांवर व मराठी भाषेवर प्रेम केले पाहिजे. आपली आपल्या मातीवरची आपल्या लोकांवरची, भाषेवरची निष्ठा डळमळल्यास प्रगती होणे अशक्‍य आहे. त्यामुळे आपल्या भाषेवर निष्ठा ठेवली पाहिजे. मराठी संगीत, संगीत नाटके, गायन आदी कलांच्या माध्यमातून मराठी भाषा अधिक समृद्ध केली पाहिजे. त्यासाठी संगीत नाटकांना प्रोत्साहन दिले पाहिजे. दैनंदिन व्यवहारात मराठी भाषेचा जास्तीत जास्त वापर केला पाहिजे. सध्या आपल्या रोजच्या बोलण्यात सर्रास इंग्रजी, हिंदी शब्द मोठ्या प्रमाणात येतात. हे टाळण्यासाठी बोलीभाषेत जाणीवपूर्वक मराठी शब्दांचा वापर केला पाहिजे. भाषी कधीच कमी पडत नाही तर आपणच नकळच तिच्याकडे दुर्लक्ष करून तिचा अवमान करीत असतो. याचा गांभीर्याने विचार केला पाहिजे. अर्थात जिथे गरज आहे तिथे इतर भाषांचा वापरही तितकाच महत्त्वाचा आहे. मात्र हे करताना विनाकारण मोठेपणासाठी इतर भाषांच टेंभा मिरविणे अयोग्य आहे, हेही विसरून चालणार नाही.
शब्दांकन ः (माधवी यादव-पाटील).

No comments:

Post a Comment