Monday, May 3, 2010

मायबोली आणि तिच्या भगिनी

रामदास भटकळ
मायबोली किंवा मातृभाषा हा विषय वाटतो तितका सोपा नाही. माझी मातृभाषा कोंकणी, तर माझ्या नातीची बंगाली. माझ्या शालेय शिक्षणात माध्यम इंग्रजी, तर पर्यायी भाषा मराठी. माझ्या वडिलांची कानडी. माझी मुले, नातवंडे मराठीतच वाढलेली; पण स्वेच्छेने इंग्रजीकडे वळलेली. कर्नाटकातले कुटुंब महाराष्ट्रात राहिले, तर एक मातृभाषा, बेंगळूरुला दुसरे, तर दिल्ली, दुबई, लंडन, मेलबर्नला वेगवेगळे हा गुंता कसा सोडविणार.आपल्याला आई एकच, तशी मायबोली एकच, असे मानले तरी आपल्या आईला बहिणी असू शकतात आणि या मावशाच आपल्या बहिणीला आधार देतात हे जाणले पाहिजे. ज्या माध्यमातून आपण आपल्या परिसरातील आणि परिवारातील मंडळींशी संपर्क साधू शकतो याच नव्हे, तर त्या-त्या भाषेसंबंधी प्रेम आणि जागरुकता राखणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. मी घरात कोंकणी बोलतो, मित्रमंडळीत मराठी, कार्यालयात इंग्रजी, बाजारातील व्यवहारात हिंदी, क्वचित आंतरराष्ट्रीय व्यवहारात किडूकमिडूक जर्मन. या सर्व भाषांविषयी मला प्रेम आहे. मी बहुभाषिक आहे, याचा मला अभिमान आहे; किंबहुना आपण सर्वच भारतीय बहुभाषिक आहोत अशी माझी समजूत आहे.प्रत्येक भाषा ही अनेक भाषांपैकी एक आहे आणि भाषा-व्यवहाराच्या आवश्‍यकतेनुसार त्या त्या भाषेला महत्त्व आहे याची जाण बाळगली पाहिजे. स्वतःच्या गुजरातीबद्दल अखेरपर्यंत अभिमान बाळगणाऱ्या महात्मा गांधींनी निरनिराळ्या लिपींतील आठ भाषा शिकून घेतल्या आणि त्यांचा योग्य तो उपयोग केला. आपल्याला भाषांच्या जडणघडणीचे काम करताना "शुद्धीकरणा'ची कास न धरता "वृद्धीकरणा'ची ईर्षा बाळगली पाहिजे. मी स्वतः मराठी भाषेसाठी काय केले? मी प्रकाशक. इंग्रजी पुस्तकांचे प्रकाशन हा माझ्या पोटापाण्याचा व्यवसाय; परंतु वयाच्या सतराव्या वर्षांपासून तो आता पंचाहत्तरीपर्यंत हौसेपोटी आणि वाङ्‌मयासंबंधीच्या प्रेमाने हजाराहून अधिक मराठी पुस्तके प्रसिद्ध केली. मामा वरेरकर-काका-कालेलकर यांच्या पिढीपासून आजच्या मनस्विनी लता रवींद्र, राही अनिल बर्वेपर्यंत शंभराहून अधिक लेखकांची पुस्तके प्रसिद्ध करण्याची संधी मिळाली. इब्सेन-ओनिल, मोलिअर-आनुई, टागोर-गिरीश कर्नाड अशा अनेकांची पुस्तके मराठीत आणली. विभावरी शिरूरकर, गं. त्र्य. देशपांडे, ऊर्मिला पवार अशा निरनिराळ्या प्रकारच्या लेखकांची मराठी पुस्तके हिंदी-इंग्रजीत प्रसिद्ध केली. माझे बंधू सदानंद भटकळ यांनी वाङ्‌मयकोष तयार केला. आता आंतरभारती अनुवाद सुविधा केंद्राचे काम हाती घेताना फक्त मराठी नव्हे, तर एकूणच आपल्या भाषा कशा समृद्ध होतील याचे भान ठेवले आहे.

No comments:

Post a Comment