Monday, May 3, 2010

नाते संस्कृत-मराठीचे

"सं स्कृत भाषा देवे केली, प्राकृत काय चोरापासून झाली?'' संत एकनाथांनी एकेकाळी हा प्रश्‍न उपस्थित केला; त्याला वेगळे संदर्भ होते. मराठीसारख्या प्राकृत भाषेला योग्य तो सन्मान दिला जात नव्हता आणि मूठभर विद्वानांना अवगत असणाऱ्या संस्कृतलाच फक्त महत्त्व होते. मराठीच्या रास्त स्थानाचा आग्रह धरतानाही एकनाथांनी किंवा त्यापूर्वी मराठीतून गीतेचे तत्त्वज्ञान सांगणाऱ्या ज्ञानेश्‍वरांनी संस्कृतला झिडकारले मात्र नव्हते. उलट या दोघांच्याही रचनांमधून संस्कृत भाषेतील शब्दकळेचे मनोज्ञ दर्शन होताना दिसते. मराठी भाषेचे संस्कृतशी असलेले नाते तोडून टाकण्याची भाषा अलीकडे होत असते त्यासंदर्भात हे आठवले.केवळ मराठीच नव्हे; तर बहुतेक भारतीय भाषांचे मूळ हे संस्कृतात असल्याने या सर्व भाषांवर संस्कृतची छाप या ना त्या स्वरूपात दिसते. मग ते शब्द असोत, भाषेची रचना वा व्याकरण असो की लिपी असो, हिंदी आणि मराठी भाषांनी तर संस्कृतची देवनागरी लिपी थेटच स्वीकारली आहे. अर्थात फक्त एवढ्यापुरतेच संस्कृत-मराठीचे नाते मर्यादित नाही. वाङ्‌मयीन परंपरा, काव्यवृत्ते, समास, सांस्कृतिक भोवताल अशा अनेक गोष्टी संस्कृतमधून मराठीत आल्या आहेत. संस्कृत ही उच्चवर्णीयांची, ब्राह्मणांची आणि हिंदूधर्मीयांची भाषा आहे, म्हणून त्या भाषेची परंपरा जाणीवपूर्वक सोडून दिली पाहिजे, तिचा त्याग केला पाहि,जे अशी भूमिका काही जण घेत असतात किंवा मध्यंतरीच्या शैक्षणिक धोरणांमुळे अथवा हेळसांडीमुळे संस्कृतचे अस्तित्व मराठीच्या क्षेत्रातून काहीसे पुसट होत गेल्याने, संस्कृत भाषा हे मराठीसाठी एक ओझेच बनून गेले. या भाषेचे जोखड फेकून द्या, कशाला हवा संस्कृत-मराठीचा संबंध, अशा तऱ्हेची भूमिका डोके वर काढू लागली. ती सोईचीही होतीच. म्हणूनच संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर जेव्हा मराठीचे नवे लेखननियम तयार करण्यात आले, तेव्हा मराठी साहित्य महामंडळाने लेखन थोडे सुलभ करण्याचा प्रयत्न केला. मात्र संस्कृतला पूर्ण झिडकारण्यात आले नाही. कारण या भाषांमधले नाते सहजासहजी पुसून टाकण्याइतके तकलादू नाही.संस्कृतशी मराठीचे असलेले नाते खूप जुने आहे. या नात्याचे ओझे मानण्याचे कारण नाही. उलट संस्कृतला झिडकारून आपण मराठीचेही नुकसान करीत असतो. बरेचसे नुकसान झालेच आहे. संस्कृत भाषा हीच चोरांची भाषा आहे, अशी भावना बाळगली जाते. एके काळी संस्कृत ही उच्चवर्णीयांची मक्तेदारी होती; म्हणून तिच्याकडे पाठच फिरवावी ही भूमिका योग्य नव्हे. तसेच संस्कृत ही केवळ धार्मिक भाषा नाही. या भाषेत तत्त्वज्ञानापासून विज्ञानापर्यंत आणि खेळांपासून भाषेच्या गमतीजमतींपर्यंत अनेक रोचक गोष्टी आहेत. आयुर्वेदासारखे आरोग्याला उपयोगी शास्त्र या भाषेत आहे. संस्कृत व्याकरण हे जर समजून घेतले तर बुद्धीला उत्तम खाद्य मिळते. भाषिक रचना समजण्याचा आनंद काही वेगळाच असतो. केवळ यासाठीच नाही तर मराठीच्या पोषणासाठीही संस्कृत आवश्‍यक ठरते. मराठी शब्दांची व्युत्पत्ती, व्याकरण आणि भाषिक परंपरा संस्कृतचे थोडेफार ज्ञान असेल तर चांगल्या प्रकारे समजू शकतात. मराठीतील जुने साहित्य अभ्यासण्यासाठीही संस्कृत उपयोगी ठरते. संस्कृतकडे दुर्लक्ष म्हणजे मराठीचीही एक प्रकारे उपेक्षाच होय. संस्कृत एकेकाळी उच्चवर्णीयांची भाषा असेलही; पण आधुनिक शिक्षणाने ही भाषा सर्वांना खुली केली आणि दलित वर्गातही संस्कृत भाषेचे विद्वान निर्माण झाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे अशांपैकी एक होते. उगाच जातीचा आणि भावनिक मुद्दा पुढे करून संस्कृतला विरोध करणे अत्यंत अयोग्य आहे.संस्कृत भाषेतील अनेक शब्द मराठीत जसेच्या तसे वापरले जातात. इतरही अनेक भारतीय भाषांमध्ये ते वापरले जातात. प्रमाण मराठीचे नियम तयार करताना संस्कृत शब्दांचे स्थान विशेष लक्षात घेतले आहे. भाषेचे पोषण आणि विकास होण्यासाठी प्रमाणीकरण आवश्‍यकच असते, हे आपण लक्षात घेतले पाहिजे आणि मराठीचे प्रमाणीकरण करताना संस्कृतचा आधार घेणे अपरिहार्य ठरते. भाषेच्या सर्व परंपरा सोडून देऊन भाषेचा विकास करता येत नसतो. संस्कृत भाषेतील अनेक शब्द मराठीत जसेच्या तसे आहेत तरीही असे कैक शब्द आपण मराठीत वेगळ्या प्रकारे लिहितो, म्हणजे तसे अधिकृतपणे स्वीकारण्यात आले आहेत. अशा तऱ्हेचे काही शब्द बघू. ऱ्हस्व, आल्हाद, आव्हान, चिन्ह, वन्हि, जान्हवी, प्रल्हाद, मध्यान्ह हे शब्द मराठीत याच पद्धतीने लिहिले जातात आणि हे सारे मूळ संस्कृत शब्दच आहेत. पण संस्कृतमध्ये ते पुढीलप्रमाणे लिहिले जातात - हृस्व, आह्लाद, आह्वान, चि, व,ि जावी, प्रह्लाद, मध्या. म्हणजे या आणि अशा तऱ्हेच्या इतर अनेक शब्दांबाबत आपण मराठीत त्यांचे स्पेलिंगच बदलून टाकले आहे. हिंदी भाषेत मात्र हे शब्द संस्कृतप्रमाणेच लिहिले जातात. ब्राह्मण हा शब्द तेवढा मराठीत मूळ पद्धतीने लिहिला जातो. खरे तर हाही अपवाद करण्याचे कारण नाही. असो. लिखित भाषेप्रमाणे अर्थाच्या दृष्टीनेही मराठीत काही संस्कृत शब्दांचे अर्थ बरोबर उलटे आहेत; तर काही शब्दांचे अर्थ वेगळे आहेत. इतरही भारतीय भाषांमध्ये हा प्रकार आढळतो. संस्कृतमध्ये परोक्ष आणि अपरोक्ष असे दोन शब्द आहेत, ज्यांचा अर्थ अनुक्रमे आहे अप्रत्यक्ष आणि प्रत्यक्ष. पण मराठीत या शब्दांचा प्रयोग बरोबर उलटअर्थी केला जातो. संहार या शब्दाचा, विध्वंस अशा अर्थासोबतच गोळा करणे असाही एक अर्थ संस्कृतात होतो; तर मराठीत विनाश अशा अर्थानेच फक्त तो वापरला जातो. कटू हा शब्द संस्कृतात कडू आणि तिखट असे दोनही अर्थ (या शब्दाचे इतरही अनेक अर्थ आहेत) घेऊन येतो. मराठीत मात्र कटू म्हणजे कडू आणि तिक्त म्हणजे तिखट; तर संस्कृतात तिक्त म्हणजे कडू. मराठीत कटू वचनांनी घायाळ करणे किंवा कटू बोलणे, एखाद्याला झोंबणे असे शब्दप्रयोग केले जातात; तेव्हा मात्र संस्कृतमधील कटू या शब्दाचा तिखट हा अर्थच अभिप्रेत असतो! इतरही भाषांमध्ये अशी उदाहरणे दिसतातच. सत्कार शब्दाचा मराठीतील अर्थ आहे सन्मान; तर बंगालीत सत्कार म्हणजे अंत्यक्रिया. मल्याळीत कल्पना म्हणजे आज्ञा, अपेक्षा म्हणजे विनंती, प्रसंग म्हणजे व्याख्यान, वासना म्हणजे फुलाचा सुगंध. सर्वच भाषांमध्ये संस्कृत शब्दांचे प्रचलित अर्थ असे वेगवेगळे आहेत. शोधले तर अशा खूप गोष्टी सापडतील. भाषेच्या अशा गमतीजमती असतातच. त्यांची माहिती होण्यासाठीही संस्कृतशी थोडी जवळीक हवी.आपण अनेकदा इंग्रजी भाषेतील वचने सहजगत्या वापरतो. वास्तविक संस्कृतमधील सुभाषितांना तोड नाही, त्यातली मार्मिकता आणि अल्पाक्षरी सौंदर्य मराठीजनांना खरे तर परके नाही. संस्कृतची धार्मिकतेशी घातलेली सांगडही या भाषेला मर्यादित करून टाकते. संस्कृतमध्ये विविध विषयांवरील लिखाण असूनही त्याकडे दुर्लक्ष केले जाते. संस्कृत साहित्यविश्व तर अफाट आहेच. मराठीलाही त्याचा वारसा लाभला आहे. हा वारसा जतन करण्याऐवजी त्याची उपेक्षा केली जाते, हे खेदजनक आहे.प्रमाण मराठीसाठी संस्कृतचा आधार पूर्णपणे सोडून देणे योग्य ठरणार नाही. कोणत्याही शब्दाचा विचार हा स्वतंत्रपणे होऊ शकत नाही, कारण प्रत्येक शब्दामागे काही परंपरा, एखादा धागा असतो. भाषेच्या अभ्यासकांनाच नव्हे, तर तिचा वापर करणाऱ्या सर्वांनाच ही जाणीव असली पाहिजे. संस्कृत भाषेसाठी आणि तिच्या मराठीशी असलेल्या संबंधांच्या जपणुकीसाठी प्रयत्न करणे नितांत गरजेचे आहे. अलीकडे उत्तरांचलमध्ये असे प्रयत्न होताना दिसते. तिथे संस्कृतला द्वितीय अधिकृत भाषेचा दर्जा देण्यात आला. तिथे भारतीय जनता पक्षाचे सरकार आहे. संस्कृतला एवढे प्रोत्साहन देण्यामागची त्याची काही विशिष्ट कारणे असतीलही; पण त्यामुळे तिथे संस्कृतकडे अधिकाधिक विद्यार्थी आकर्षित होत असून दलित वर्गातील मुलामुलींचा त्यात मोठा समावेश आहे. संस्कृत व्याकरण, त्या भाषेतील शब्दांचा वापर या गोष्टी नव्या पिढीत या भाषेबद्दल रुची निर्माण करणाऱ्या आहेत. आजच्या पिढीतील निरीश्वरवादी लोकांना किंवा तरुणांना संस्कृतमधील धर्मग्रंथांशी काहीच देणेघेणे नाही. पण एक भाषा म्हणून तिच्यात ते अतीव रस घेतात, असा तिथला अनुभव आहे. संस्कृतमुळे प्रादेशिक भाषांची समजही वाढते, हा फायदा आहेच. एक भाषा म्हणून मराठी अधिक सशक्त व्हावी म्हणून संस्कृतशी असलेली तिची नाळ तुटता कामा नये.
नंदिनी आत्मसिद्ध
nandini atmasidh@rediff.com

No comments:

Post a Comment